संतांचे माहेर ‘अलंकापूर’
शशिकांत मधुकर तोटे दारव्हा, जि. यवतमाळ
संतांचे माहेर ‘अलंकापूर’
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त विशेष
भारताला पुण्यभूमी असे म्हणतात, तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरीला अर्थात आजच्या आळंदीला संतांनी पुण्यभूमी म्हटले आहे.
‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र l
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ll
तया आठवितां महा पुण्यराशी l
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी ll’
असा जयघोष करीत माऊली ज्ञानेश्वरांच्या हरिपाठास सुरुवात करून वंदन करतात. आळंदी हे महाराष्ट्राचे धार्मिक भावभावनांचे केंद्रबिंदू आहे. आळंदी श्रद्धा-भक्ती- शक्तीचे ऊर्जा स्त्रोत होय. आळंदी नाव स्मरताच ज्ञानेश्वर माऊलींचे वात्सल्य प्रेमाने ओसांडून जात असलेली दयाघन महाकैवल्य तेजाची संजीवन समाधी एकदम डोळ्यांपुढे उभी राहते. वारकरी संप्रदायात श्रीक्षेत्र पंढरपूर नंतर आळंदीचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
‘यात्रे अलंकापुरा येती l ते आवडती विठ्ठला ll
पांडुरंगी प्रसन्नपणे l केले देणे ज्ञाना ll
भू वैकुंठ पंढरपूर l त्याहुनी थोर महिमा या ll
निळा म्हणे जाणूनि संत l येती धांवत प्रतिवर्षी ll
अशा शब्दात संत निळोबारायांनी आळंदी क्षेत्राचा महिमा गायला आहे.जे वैष्णवजन अलंकापुराला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आणि यात्रेसाठी येतात ते विठ्ठलाला प्रिय आहेत. विठ्ठलाच्या कृपा प्रसादानेच माऊलींना ज्ञानाचे दान मिळाले आहे. ज्याप्रमाणे संतांनी पंढरपूरला भूवैकुंठ मानून महिमा गायला आहे, त्याहूनी थोर महिमा आळंदीचा आहे.असे संत निळोबाराय अभंगातून म्हणतात. हे संतांना माहीत आहे, म्हणून वैष्णव दरवर्षी आळंदीला मोठ्या श्रध्देने येतात व आजही शेकडो वर्षाची परंपरा कायमच आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्र निव्वळ संततीर्थ नसून, देव तीर्थही आहे. आळंदीला पौराणिकदृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे. कृतयुगात आनंदवन, त्रेतायुगात वरुण क्षेत्र, द्वापारयुगात कपिल क्षेत्र,कलियुगात अलंकापुरी (आळंदी) तसेच या व्यतिरिक्त शिवतीर्थ, सिद्धक्षेत्र, अलंकावती, कर्णिका, अलंकापुरी आदी नावाने सुद्धा पुराणांमध्ये आळंदी क्षेत्राची ओळख करून दिल्याचे सांगितले जाते. आळंदी हे अठरा शिवपीठात वरिष्ठ मानले जाते. तसेच देवाधिदेव महादेवांचे कैलासानंतर सगळ्यात प्रिय स्थान म्हणजे अलंकापूर होय आणि ते इथेच सिद्धेश्वर रूपाने अखंड वास्तव्यास आहे.आळंदीची आणि पंढरीशी तुलना करताना संत निळोबाराय एका अभंगातून म्हणतात…
‘एक भूवैकुंठ एक शिवपीठl
महिमा वरिष्ठ दोहींचा ll’
यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आपण साजरी करीत आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने, कर्तव्याने पुनीत झालेल्या आळंदीत अनेक संतांनी सहवास घालविला आहे. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या भावंडांच्या व्यतिरिक्त संत नामदेव, संत चांगदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत सेना, संत जनाबाई, संत सोयराबाई ही संत मंडळी ज्ञानेश्वरांची समकालीन संत मंडळी होती. या संतांनी सुद्धा ज्ञानेश्वरांच्या नेतृत्वाखाली समता, समानता आणि भक्ती परंपरेला समृद्ध केले. जणू त्यांच्यासाठी आळंदी पुण्यभूमीच होती. या वारकरी संतांनी अलंकापुरी पुण्यक्षेत्री येऊन आपली आध्यात्मिक उन्नती साधली आणि या क्षेत्राचा महिमा गायला आहे.
संत नामदेव एका अभंगातून म्हणतात…
‘क्षेत्र महिमा अति अद्भुत l आदि सिद्धेश्वर कुलदैवत
अलंकापुरी पाटणी l’
संत सेना महाराजांनी तर आळंदीला ‘संतांचे माहेर’ म्हटले आहे. तर संत सेना महाराजांनी ज्ञानदेवांना महाविष्णूचा अवतार म्हणून आदर केला आहे.
‘महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर l
चला जाऊं अलंकापुरा l संत जनाच्या माहेरा ll’
तर शांतिब्रह्म संत एकनाथांनी तर
सर्व सुखाची लहरीl ज्ञानाबाई अलंकापुरी ll’ असे म्हटले आहे. संत नामदेवांची दासी म्हणून आपले जीवन भक्ती परंपरेला समर्पित करते. ती ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रसग्रहण केल्यानंतर म्हणते…
‘वाचावी ज्ञानेश्वरी l डोळां पहावी पंढरी ll’
देवापेक्षा भक्त श्रेष्ठ, देवभूमीपेक्षा संतभूमी श्रेष्ठ. अशा भावस्थेतून आपल्या संतांनी आळंदीचा महिमा गायला आहे. “आळंदी हे आद्य विश्व ज्ञानपीठ होय”. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्फुरलेला ‘ग्रामगीता ग्रंथ’ सुद्धा आळंदी पुण्यभूमीची देण होय. आजही आळंदीच्या पावन भूमीतून ज्ञानाचे झरे पाझरत आहे. हे या पुण्यभूमीचं अद्भुत रहस्य आहे. म्हणून संत कळकळीने म्हणतात….
‘ जोडोनियां दोन्ही हात l
जगी जाणवितो मातl
एकदा जा रे अलंकापुरा ll’
शशिकांत मधुकर तोटे
दारव्हा, जि. यवतमाळ



