ॲड. गौतम पाटील यांची यशस्वी घोडदौड; आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व मानद डाॅक्टरेट पदवी बहाल
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

ॲड. गौतम पाटील यांची यशस्वी घोडदौड; आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व मानद डाॅक्टरेट पदवी बहाल
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: दि. ३० मे २०२६ रोजी बँकॉक, थायलंड येथील मॅरियट मार्क्विस क्विन पार्क येथे आयोजीत केलेल्या 36 व्या “वर्ल्ड स्कूल समिट” या दिमाखदार सोहळ्यात ॲड. गौतम पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “आऊट स्टँडिंग एज्यूकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार ऑलिम्पिक मेडल विजेत्या पहिल्या भारतीय कुस्तिपटू साक्षी मलिक यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ॲड. गौतम पाटील यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटी, यू. एस. ए. या विद्यापीठाची मानद “डाॅक्टर आॅफ फिलाॅसाॅफी इन एज्युकेशन” ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे. या प्रसंगी जगभरातील विविध मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. जगभरातील 40 देशांच्या कर्तृत्वान मान्यवरांना या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला.
वर्ल्ड स्कूल समिट हे शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर व्यक्ति, शिक्षक, नवोन्मेषक यांना ज्ञानविनिमय, सहकार्य आणि सन्मानाच्या माध्यमातून सक्षम बनविण्यासाठी कार्य करणारे जागतिक व्यासपीठ आहे. लंडनमधील प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्ससह बँकॉक, भारत, मलेशिया आणि दुबई येथे यशस्वी अधिवेशने आयोजित करून WSS ने शिक्षण क्षेत्रात संवाद, विचारमंथन आणि नव्या शिकण्याच्या संधींसाठी प्रभावी मंच निर्माण केला आहे.
ॲड. गौतम पाटील यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला सन्मान व त्यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या मानद डाॅक्टरेट पदवीमूळे अलिबाग शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲड. गौतम पाटील यांनी वकिली व्यवसायात प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि समाजाभिमुख दृष्टिकोन जपत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. कायद्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा दिली आहे. तरुण पिढीने उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करावे, यासाठी ते विविध माध्यमांतून कार्य करत असतात.
क्रीडा क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्याचा संदेश दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रदान करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय सन्मान व मानद डाॅक्टरेट पदवी हा त्यांच्या कार्याचा गौरव असून, तो अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या यशस्वी वाटचालीमुळे समाजातील युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, “मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते,” हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे.
सन्मान स्वीकारताना ॲड. गौतम पाटील यांनी हा पुरस्कार आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांना समर्पित केला. पुढील काळातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.



