‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये
रजत डेकाटे, प्रतिनिधी नागपूर
‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये
राज्यातील अडीच हजार पत्रकार होणार सहभागी
ज्येष्ठ पत्रकार व राजकीय मान्यवरांची उपस्थिती
रजत डेकाटे, प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ ठरले आहे.
पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवणे तसेच पत्रकारितेची गुणवत्ता आणि व्यावसायिकता उंचावण्याचे काम या व्यासपीठातून घडून आले आहे. देशभरातील पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभारलेले हे एक ऐतिहासिक व्यासपीठ आहे.
या क्रांतिकारी चळवळीच्या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचे राज्य अधिवेशन यंदा शनिवार दि. १५ आणि रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, इस्कॉन पंढरपूर येथे सकाळी ९ ते रात्री 11 यावेळेत संपन्न होत आहे. अशी माहिती संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनासाठी इस्कॉनचे सर्वश्री. प्रल्हाद दास महाराज, श्री.परमात्मा दास व श्री.शंकरदास महाराज यांचे सहकार्य लाभणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवरांसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. एकूण अडीच हजार पत्रकारांचा सहभाग अपेक्षित आहे.
पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार असून, विविध मान्यवरांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता अधिक सक्षम आणि अबाधित कशी राहील, यावर या अधिवेशनात सखोल चर्चा होणार आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पत्रकार आणि अनेक राजकीय मंडळी यांना या अधिवेशनासाठी खास निमंत्रित केले आहे.





