गणेशोत्सवानिमित्त आगरी समाज संस्थेतर्फे कपड्यांचे वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

गणेशोत्सवानिमित्त आगरी समाज संस्थेतर्फे कपड्यांचे वाटप
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि. ११ सप्टेंबर) : गणेशोत्सवाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आगरी समाज संस्था, अलिबागने पुढाकार घेत रायगड जिल्हा परिषद शाळा कामार्ले, कामार्ले अंगणवाडी आणि भायमळा अंगणवाडीतील ३६ विद्यार्थ्यांना उत्सवासाठी कपड्यांचे सेट वाटप केले. नवीन कपडे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हा या उपक्रमाचा विशेष क्षण ठरला.
आगरी समाज संस्था अलिबागच्या वतीने सातत्याने विविध अभिनव, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, ‘समाजासाठी काहीतरी करण्याची’ भावना कृतीतून जपण्याचा संस्थेचा प्रयत्न या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. सई कलेक्शनच्या संचालिका सौ. दिपश्री निलेश पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रायगड जिल्हा परिषद शाळा कामार्लेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा ठाकूर यांनी आगरी समाज संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांचे स्वागत केले. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर पद्धतीने सूत्रसंचालनही केले.
यावेळी संस्थेचे सल्लागार श्री. नंदकुमार (बाळा) पाटील, विरवाडी यांनी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. नरेंद्र पाटील सर, पेढांबे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व आपल्या ओघवत्या शैलीत समजावून सांगितले. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमाच्या आयोजनामध्ये आगरी समाज संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम समितीच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी म्हात्रे यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी संस्था, शाळा आणि अंगणवाडी यांच्यात समन्वय साधत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी आगरी समाज संस्था समाजाच्या विकासासाठी आणि एकतेसाठी कटिबद्ध असून, भविष्यातही समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवनवीन आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला श्री निलेश पाटील, सौ. दिपश्री पाटील, सौ. शुभांगी म्हात्रे, श्री. नंदकुमार पाटील, श्री नरेंद्र पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ. मेघा ठाकूर, शिक्षणसेविका श्रीम. सुवर्णा मेंगडे, कामार्ले अंगणवाडी सेविका सौ. सुशीला नागावकर आणि भायमळा अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता नागावकर यांनी मोलाचे व उत्स्फूर्त सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी मनापासून कौतुक केले असून, आगरी समाज संस्थेच्या समाजोपयोगी कार्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे आभार मानले.



