“विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

“विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता हवी”; वृंदा करमरकर
सोमवारीय ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण
‘लपवाछपवी’ या विषयाच्या अनुषंगाने मला आमच्या नातेवाईकांकडे नुकताच घडलेला प्रसंग आठवला. त्यांच्या मुलीचे, दीपाचे लग्न ठरले ‘लव्हमॅरेज’. मुलगी एकुलती एक, उच्चशिक्षित. अर्थात लग्न थाटातच होणार होते. मुलगा अनुरूप, दिसायला देखणा, डॉक्टर, श्रीमंत घराणे. साखरपुडा ठरला. पण दोन दिवस आधी बातमी समजली मुलगा डॉक्टर नाहीच; शिवाय त्याला ऐकू येत नाही. बातमी सांगणारे विश्वासातले होते. नेटवर चॅटिंग करताना ओळख झाली मुलामुलीची. शेवटी बारकाईने चौकशी केली, खडसावून विचारल्यावर मुलाकडच्यांनी खोटी माहिती दिल्याचे कबूल केले. ही ‘लपवाछपवी’ दीपाचे आयुष्य उध्द्वस्त करणार होती.
खरेच लपवाछपवी घातकच असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात वावरताना त्याला अनेक नाती, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि भावनांना सामोरे जावे लागते. या सर्व संबंधांचा पाया विश्वास, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेवर उभा असतो. मात्र सत्य परिस्थिती लपविणे, माहिती दडवून ठेवणे किंवा आपल्या सोयीप्रमाणे वास्तवाचा वेगळा अर्थ मांडणे, यालाच व्यापक अर्थाने ‘लपवाछपवी’ म्हणता येते.
राजकीय क्षेत्रातही लपवाछपवीचे स्वरूप विशेष लक्षवेधी आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शासन, प्रशासन आणि सार्वजनिक धोरणांविषयी योग्य व पुरेशी माहिती मिळणे महत्त्वाचे असते. काही वेळा राजकीय पक्ष किंवा नेते आपल्या भूमिकेतील अस्वस्थ करणारे मुद्दे पुढे न आणता केवळ अनुकूल माहितीवर भर देतात. अशा वेळी राजकीय संवादाची पारदर्शकता कमी होण्याचा धोका असतो.
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांइतकीच जबाबदारी नागरिकांची आणि माध्यमांचीही आहे. सरकारी निर्णय, सार्वजनिक निधीचा वापर, विकासकामे आणि धोरणांची अंमलबजावणी याबाबत प्रश्न विचारणे, उपलब्ध अधिकृत माहिती तपासणे आणि विविध स्रोतांमधील माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. माहिती लपविणे आणि दिशाभूल करणे यांपासून लोकशाही चे संरक्षण करण्यासाठी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व महत्त्वाचे ठरते.
शैक्षणिक क्षेत्रही याला अपवाद नाही. काही ठिकाणी गैरप्रकारांवर पडदा टाकण्याची प्रवृत्ती दिसून येते. संस्थेची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सत्य परिस्थिती दडपण्याचा प्रयत्न होतो. अशा लपवाछपवीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. आजच्या डिजिटल युगात लपवाछपवीला आणखी एक वेगळे रूप प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर व्यक्ती किंवा संस्था आपल्या सोयीचे चित्र समाजासमोर मांडू शकतात. त्यामुळे आभासी प्रतिमा आणि वास्तव यांच्यात अंतर निर्माण होऊ शकते.
मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगणे म्हणजेच पारदर्शकता नव्हे. शेवटी, लपवाछपवी काही काळ वास्तव झाकू शकते; परंतु सत्य कायमचे दडवता येत नाही. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुलसरांनी ‘लपवाछपवी’ हा ज्वलंत विषय दिला आहे. शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन! आदरणीय सरा़ंनी मला या काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते.
वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



