
महाराष्ट्राचा दुष्काळ
एक आर्त हाक… बळीराजाच्या काळजातील वेदना!
जून महिना आला, आभाळाकडे डोळे लागले,
पावसाच्या आशेवर सारे शेतकरी जगले.
जुलै गेला, ऑगस्ट गेला, ढगांनी पाठ फिरवली,
सप्टेंबर-ऑक्टोबर सरले, धरतीची तहान वाढली!
कुठे पाणी नाही प्यायला, कुठे घोटभर आस नाही,
विहिरी कोरड्या पडल्या, नदीत पाण्याचा थेंब नाही.
तलावांचे तळ दिसू लागले, ओढे-नाले झाले रिकामे,
पाण्यासाठी भटकत फिरती, गावोगावी माणसे बिचारी!
शेतकऱ्याच्या शेतामध्ये, पिके उभी होती स्वप्नांची,
पण पावसाच्या अभावाने राख झाली कष्टांची.
बियाणे गेले, खते गेली, मेहनत गेली मातीत,
कर्जाचा डोंगर वाढत गेला, अश्रू आले डोळ्यांत!
जनावरांच्या डोळ्यांमध्ये, भुकेची दिसते वेदना,
चारा नाही, पाणी नाही, कशी सांगावी यातना?
गोठ्यामधली गाय विचारते, मालका कुठे गेला चारा?
मुकी जनावरे पाहून, दगडालाही फुटेल पाझर सारा!
माणसाला नाही धान्य, चुलीमध्ये नाही ज्वाला,
पोटासाठी काम नाही, कसा जगेल गरीब बिचारा?
रोजंदारीच्या शोधामध्ये, गाव सोडून निघाले लोक,
मुलांच्या भुकेपुढे हरला, आई-बापांचा धीर-धाक!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा, जि. धाराशिव
=======



