रणसंग्राम लोकशाहीचा
किरण कमलाकर देशमुख जि.चंद्रपूर
रणसंग्राम लोकशाहीचा
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात लोकशाहीचा सार्वजनिक सण २०२४ नुकताच सोत्साहात संपन्न झाला. देशातल्या लहान-मोठ्या, ज्ञानी-अज्ञानी, माणसं लहान मुलें ही सर्व मंडळी आपापल्या परीने या सणात सहभागी झाले होते. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कशी असते? ती काय करु शकते ?लोकशाहीमध्ये जनतेचे अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे काय असते? हे आपल्या देशातील २०२४च्या सार्वजनिक निवडणूकीने दाखवून दिले. खरं तर या निवडणूकीचे निकाल संपूर्ण जगाला लोकशाही काय असते, लोकशाहीचं महत्व काय ? व लोकशाहीत जनतेचं महत्त्व काय? हे स्पष्ट दाखवून दिलं आहे. तरी पण, भारतीय राजकारण हे आंतरराष्ट्रीय राजकारणापेक्षा किती निम्न स्तराला पोहचलेलं आहे. ही बाब सुद्धां लोकशाही समर्थक देशात, एक महत्त्वाचा व दृष्टिआड न करता येण्याजोगा मुद्दा आहे हे ही लक्षात आलं असेलच.
भारतीय जनता व राजकारणी यांनी खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणूका यांच वास्तविक साधारण जनतेशी असलेल्या रेशीमबंधीय नात्याचे आपण कसे जीवंतपणीच शवविच्छेदन करतो, व जनतेला काही कळू नये म्हणून कसं भ्रमित करतो आणि भ्रमित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाब्दिक फवारा (स्प्रे) चा वापर जनताच मनाप्रमाणे कशी करते हे सगळ्या जगाला दाखवून दिले.
भारतीय जनता आपला अधिकार वापरून राजकारण्यांना वेळोवेळी त्यांची जागा व जनतेची किंमत दाखवून देत आली आहे. याचा प्रत्यय म्हणजे एप्रिल – मे २०२४ मध्ये पार पडलेला भारतीय लोकशाहीचा सार्वजनिक उत्सव. निर्विवाद ! श्री. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मंत्रीमंडळ स्थापन केले आणि आपली दैनंदिन कार्यालयीन कामकाजही चालू केले. तरीही, त्यानुषंगाने एक गोष्ट प्रकर्षाने सुवर्णाक्षरात नोंद करुन ठेवण्यासारखी घडली आहे ती म्हणजे कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेले नाही. ज्यावेळी की, या. पंतप्रधान मोदींनी मागील दहा वर्षात जी कामें केलीत, ती खरोखरच भारताची १९४७ ते २०१४ पर्यंतची ६७ वर्षाच्या कार्यभाराच्या चिंध्या उडवते. खरा राज्यकारभार कसा चालवायचा हे २०१४ ते २०२३-२०२४ पर्यंतच्या कालावधीत स्पष्टपणे निदर्शनास येते.
मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, व पाकिस्तान सारखे देश भारताला झुकवत होते. भारत हा कचखाऊ व घोटाळेबाज राजकारण्यांचा देश म्हणूनच ओळखल्या जात होता. पण श्री. मोदींनी २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलून भारताचे नाव जगामध्ये “अतिविशिष्ट देश” म्हणून जगातील अव्वल पाच देशात नेवून बसवले. जो पाकिस्तान वरचेवर कुरापती काढायचा, त्यांच्याच घरात घुसून त्याच्या थोबाडीत मारुन , आपल्या देशांतर्गत होणारे दहशतवादी हल्ले करण्याच्या त्याच्या खोड्या बंद पाडल्यात. चीनला त्याची जागा दाखवून दिली. भारतीय सैन्याला जागतिक अव्वल दहा शक्तीशाली सेनांमध्ये चौथ्या स्थानी नेऊन ठेवले. भ्रष्टाचार/घोटाळ्याचे नावही गेली दहा वर्षे ऐकायला मिळाली नाहीत. भारताची, मा. मनमोहनसिंग सरकारच्या अर्थमंत्र्यांनुसार कमजोर अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर नेऊन ठेवली. पूर्वी गरीबी हटावचा नारा ऐकू येत होता. परंतु गरीबी हटवल्याची किंवा गरीबी हटवण्याचा प्रयत्न केल्याचे कधी ऐकीवात आले नाही.
२०२४ च्या निवडणूकीत विरोधी पक्षाच्या हातात कोणताच मुद्दा नव्हता, म्हणून त्यांनी संविधान संपवण्याचा/बदलवण्याचा खोटा प्रचार जोरात केला. तसेच एक लाख रुपये व ८,५००/- रुपये दरमहा देण्याचा आणि हिंदूंच्या संपत्तीमध्ये मुसलमानांना अर्धा वाटा देणे, अशा बाबी जाहिरनाम्यात दिल्या होत्या.पण संविधान बदलविण्याचा प्रयत्न या खोट्या प्रचाराला मात्र काही भारतीय जनता बळी पडली. दुसरें म्हणजे मुसलमानांची मतें ही कॉंग्रेसचीच मतें आहे. तसेच हिंदूचे मतदानाला न जाणे आणि किंवा उगाच सत्तेची नशा डोक्यात जाऊ नये म्हणून केलेले कमी मतदान ज्यामुळे भाजपाचे २४२वर व रालोआ चे (एन.डी.ए.) २९३वर उमेदवार निवडून आल्यामुळे मोदींना एकपक्षीय सरकार स्थापन करता आले नाही व मोदींच्या नेतृत्वात रालोआचे सरकार स्थानापन्न झाले.
भारतीय जनतेने इंडी (पूर्व सं.पु.आ. UPA) मधील कोणत्याही पक्षाला शंभर (१००) जागा सुद्धा दिलेल्या नाहीत. यावरुनच अजुनतरी भारतीय बहुसंख्य जनतेचा कॉंग्रेस आघाडीवर विश्वास नसल्याचेच दिसून येते व जी मतं इंडीला दिली त्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की, खबरदार! जर चुकीचे काम कराल किंवा पुन्हा नव्याने निवडणूका (Repolling) झालेत तर तुमचे नामोनिशाण पण मिटू शकते. हा इशारा भाजप व कॉंग्रेस दोघांकरीता पण महत्वाचा आहे. पुढील पाच वर्षे हे सरकार चालेल हे गृहीत धरून केलेला हा ऊहापोह.
किरण कमलाकर देशमुख
जि.चंद्रपूर



