भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख व अलिबागचे सुपुत्र अरूण कुमार वैद्य यांचे पुण्यस्मरण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख व अलिबागचे सुपुत्र अरूण कुमार वैद्य यांचे पुण्यस्मरण
बळवंत वालेकर , ज्येष्ठ पत्रकार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: ऑगस्ट हा विशेष आनंदाचा महिना आहे. आपला देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक ज्ञात -अज्ञात भारतीयांनी अथक प्रयत्न केले. ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या , तुरुंगवास भोगला , असहकार पुकारला. म्हणून आपण १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालो व भारतीयांना अत्यानंद झाला .याच महिन्यात दुःखद घटना ही घडली. भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख व अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यावर शीख अतिरेक्यांनी १० आगष्ट १९८६ रोजी गोळ्या झाडल्या आणि वैद्य साहेब शहिद झाले.या शहिदाचा आज दि. १० आगष्ट रोजी ४० वा स्मृतिदिन आहे.
वैद्य कुटुंब मूळ अलिबागचे. त्यांचे पिताश्री श्रीधरपत ( I. C. S.) जिल्हाधिकारी होते. अलिबाग येथेही त्यांनी जिल्हाधिकारीपद भूषविले .अरूणकुमाराचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथे झाले.स्वतः च्या जिल्ह्यात काम करणे जिकिरीचे असते पण नि: पक्षपाती व शालीन असलेल्या श्रीधरपताना स्वजिल्हृयात क़ोणतीही अडचण आली नाही.सनदी अधिका-याच्या सतत बदल्या होत असतात. म्हणून लष्करप्रमुखांचे शिक्षण अलिबाग, मुंबई , पुणे व अन्य ठिकाणी झाले. प्रखर बुद्धी व अचूक निर्णयक्षमता असलेल्या अरूणने सनदी अधिकारी बनून आरामशीर जीवन जगावे अशी आई- वडिलांची इच्छा होती. पण वैद्य साहेबांना मळलेल्या वाटेने जावयाचे नव्हते.रणरणते ऊन ‘ ,कडक थंडी, बर्फाच्छादित प्रदेश व मुसळधार पाऊस यांच्याशी सामना करण्यासाठी ते लष्करात दाखल झाले. शिस्तीचा भोक्ता, अचूक निर्णयशक्ती , कमालीची तडफ , विश्वासार्हता, मनोधैर्य , चिकाटी व कार्यक्षमतेमुळे बढत्या मिळत गेल्या. पराकोटीच्या धैर्यामुळे त्यांना महावीरचक्र , अति विशिष्टसेवा पदक, दुसरे महावीर चक्र इ. पदकाचे ते मानकरी ठरले.तसेच अचूक निर्णय क्षमता पाहून त्यांची भूसेनाप्रमुख ( चीफ आफ द आर्मी) या सर्वोच्चपदी १ आगष्ट १९८३ रोजी नियुक्ती झाली .हा वैद्य कुटुबाचाच नव्हे रायगडचा व महाराष्ट्राचा सन्मान आहे.
इंडस्ट्रीयल हायस्कूलला क्रुतज्ञता भेट:
भूसेनाप्रमुखखपद हे लष्करामधील सर्वोच्च पद भूषवीत असल्यामुळे वैद्य साहेबांची जबाबदारी वाढली होती.आपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी झाल्यामुळे ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टमधये गेले . निनावी फोन व धमक्या सतत येत असल्यामुळे बेचैनी वाढली होती.तरीही ज्या शाळेत शिकलो म्हणून या पदापर्यंत पोचलो , त्या इंडस्ट्रीयल हायस्कूलची व अलिबाग या मात्रुभूमीची ओढ लागली होती. खरे पाहता इंडस्ट्रीयल हायस्कूलचा माजी विद्यार्थी भारताचा लष्करप्रमुख झाल्यामुळे त्या हायस्कूलने या माजी विद्यार्थ्यांस सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन सत्कार आयोजित करावयास हवा होता.
पण – – भारताच्या लष्करप्रमुखाने इंडस्ट्रीयल हायस्कूलच्या मुख्याध्यापकाना आगाऊ कळवून दि.२८ /९ / १९८५ रोजी या हायस्कूलला लष्करप्रमुखांनी लवाजम्यासह सदिच्छा भेट दिली. नियोजित कार्यक्रम फक्त १५ मिनिटांचा होता. त्यावेळी अलिबाग शहराला लष्कराच्या छावणीचे स्वरूप आले होते. को.ए.सो.चे कार्याध्यक्ष अँड.दता पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषणात को. ए. सो.च्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. जुन्या आठवणी सांगताना सेनाप्रमुख भावूक झाले. ते जुजबी मराठी भाषेत म्हणाले ” ४९ वर्षानी मी माझ्या मायभूमीत आलो आहे. शहरात खूप बदल झाला आहे.या शाळेतील गुरुजींनी विशेषत: बागुल सर व राणे सर यांनी शिस्तीचे , वेळेचे व व्यायामाचे महत्त्व पटविल्यामुळे मी भारताच्या सेनाप्रमुख पदापर्यंत पोचू शकलो ” असे छोटेखानी भाषणात त्यांनी सांगितले. त्यानंतर लष्करप्रमुखानी सत्काराचा स्वीकार केला आणि क्रुतज्ञतापूर्वक चांदीच्या ढालीची प्रतिक्रुती व रुपये दहा हजार मूल्यांचा धनादेश शाळेला देऊन ते लवाजम्यासह मार्गस्थ झाले.
वैद्य साहेब लष्करप्रमुख असताना पंजाब प्रांत तोडून वेगळे राष्ट्र निर्माण करण्यासाठी शीखीस्तान चळवळ उभारली गेली. ती चळवळ समूळ नष्ट होण्यासाठी सुवर्ण मंदिरात आपरेशन ब्लू स्टार करणयाची जबाबदारी वैद्य साहेबांवर सोपविली गेली. ती यशस्वी झाली. चळवळ शमली पण लष्करप्रमुख अतिरेक्यांच्या हिटलिसटमधये गेले.. लष्करप्रमुख असेपर्यंत त्यांना शासकीय संरक्षण होते. पण ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होताच शासकीय संरक्षण ( सिक्युरिटी ) काढले गेले. या संधीचा फायदा अतिरेक्यांनी घेतला. धमकीचे फोन येतच होते.
वैद्य साहेब निव्रुत्तीची सायंकाळ पुणे येथे उपभोगीत असताना दि. १० आगष्ट. १९८६ रोजी अतिरेक्यांनी डाव साधला. त्यांच्यावर गोळ्या झाडून अमानूष हत्या करण्यात आली. संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. अलिबागेतही हळहळ व्यक्त केली.
इंडस्ट्रीयलचे अरुणकुमार वैद्य शाळा हे नामकरण:
भारताला लागलेली फुटीरतेची कीड समूळ नष्ट केल्यामुळे शहिद झालेले ते एकमेव लष्करप्रमुख होते.अशा लढाऊ. व करारी माजी विद्यार्थ्यांचे शौर्य व राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर चिरकाल राह ण्यासाठी इंडस्ट्रीयल हायस्कूलचे. माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य माध्यमिक शाळा अलिबाग असे नामकरण व्हावे अशी चर्चा शहरात सुरू झाली. या विषयावर को.ए.सो.च्या पदाधिका- यांशी चर्चा करण्यास कोणी धजेना. सदर लेखक त्यावेळी इंडस्ट्रीयल हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक शिक्षक , शाळा समितीचे सदस्य व को.ए.सो.च्या विकास नियतकालिकाचे संपादक होते.
त्याकाळात को.ए.सो. चे ्पदाधिकारी सायंकाळी अलिबाग येथील रायगड बाजारच्या कार्यालयात भेटत असत., म्हणून सायंकाळी सदर लेखक रायगड बाजारच्या कार्यालयात गेले . तेथे को.ए .सो. कार्याध्यक्ष ॲ ड. दत्ता पाटील , जि.ल्हा परिषद .अध्यक्ष तथा को.ए.सो्. संचालक प्रभाकर पाटील , प्रशासन अधिकारी दि.रा.फुलगावकर व रायगड बाजारचे जनरल मनेजर प्रताप सरनाईक उपस्थित होते. आत प्रवेश करताच जन.मनेजर सरनाईक यांनी विचारले “वालेकर सर ,काय काम आहे , ते सांगा” सदर लेखक म्हणाले भारताचे लष्करप्रमुख तथा इंडस्ट्रीयल हायस्कूलचे माजी विद्यार्थी जनरल अरूणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांकडून हत्या झाली. ते इंडस्ट्रीय हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून गतवर्षी त्यांनी इंडस्ट्रीयलला सदिच्छा भेट दिली.
म्हणून इंडस्ट्रीयल हायस्कूलला माजी लष्करप्रमुख वैद्य यांचे नाव द्यावे अशी गावात चर्चा सुरू आहे.लागलीच जनरल मॅनेजर प्रताप सरनाईक म्हणाले दादा , वालेकर सरांची सूचना चांगली आहे. त्यानंतर जि.प.अध्यक्ष प्रभाकर पाटील म्हणाले दत्ता,(त्यांची भाषा), नाव दिलेच पाहिजे . शेवटी कार्याध्यक्ष ॲड. दत्ता पाटील म्हणाले वालेकर सर ,शाळा समितीचा ठराव को. ए.सो.कडे पाठविण्यास मुख्याध्यापकांना सांगा.
त्यानुसार शाळा समितीचा ठराव को.ए.सो.कडे पाठविण्यात आला. शेवटी संस्थेने शिफारस करून जिल्हा शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) व S.SC. E. Board यांच्याकडे प्रस्ताव पाठविला गेला.आणि मान्यतेनंतर इंडस्ट्रीयल हायस्कूलचे नामांतर
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय अलिबाग असे केले गेले.
जनरल वैद्य हे अलिबागचे भूषण होते.त्याचा आदर्श तरूण पिढीसमोर राहण्यासाठी तैलचित्र लावण्यासाठी सदर लेखकाने शासनाकडे सतत पाठपुरावा केला.महणून पोलिस अधिक्षक. श्री. घारगे यांनी त्यांच्या कार्यालयासमोरील भिंतीवर तैलचित्र लावून त्यांचे अनावरण आगष्ट २०२५ मध्ये केले.
वैद्य साहेबांचा १०, आगष्ट .हा स्मृतिदिन दरवर्षी पत्रकार बळवंत. वालेकर शिशुविहार प्राथमिक शाळेत साजरा करतात. २०२६ साल हे जनरल वैद्य यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे.
जन्म शताब्दी समिती स्थापन:
जनरल वैद्य यांच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अरुणकुमार वैद्य जन्म शताब्दी महोत्सव समिती माजी नगराध्यक्ष प्रशांतशेट. नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली असून त्यात उपनगराध्यक्षा अँड. मानसीताई म्हात्रे , ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, ॲड. रघूजीराजे आन्ग्रे व आदर्श पतसंस्थेचे संस्थापक. सुरेश पाटील यांचा समावेश आहे.. शतक महोत्सवी वर्षानिमित्त जनरल वैद्य साहेबांचा स्मृतिदिन रायगडचे जिल्हाधिकारी श्री किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत आज साजरा होत आहे. जनरल वैद्य यांना मानाचा मुजरा.



