मानवी मनाला भूल पाडणारा, विस्मयकारी नैसर्गिक अविष्कार म्हणजे फूल; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय 'हायकू काव्यस्पर्धे' चे काव्यपरीक्षण

मानवी मनाला भूल पाडणारा, विस्मयकारी नैसर्गिक अविष्कार म्हणजे फूल; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धे’ चे काव्यपरीक्षण
“रंगीबेरंगी फुले पाहून, एक प्रश्न पडतो मला
ज्याने यांना निर्मिले, त्याचा कसा असेल कुंचला”
रंग, सुगंध, मकरंद, सौंदर्य आणि कोमलता यांचा अद्भूत संगम म्हणजे कोणतेही फूल. ज्याची मानवी मनाला पडत आली आहे सतत भूल. अत्यंत अल्पकाळ टिकणारे तरीही कोमेजून जाईपर्यंत सुगंधाचे दान देत राहणारे फूल म्हणजे निसर्गाची अतिशय अद्भूत, सहजसुंदर, कलाकृती. कदाचित सृष्टी निर्मितीनंतर खुद्द सृष्टिलाच स्वतःमध्ये कांही कमी जाणवली असेल तर ती नटण्याची संसाधने… (सृष्टी स्रिलिंगी आहे) तेव्हा तिच्या शृंगारासाठी विधात्याने जी अगणित प्रकारची आभूषणे निर्माण केली ती म्हणजे फुले असतील. किती वैविध्यपूर्णता.. ! किती अगणित आकार.. आणि प्रत्येकाचा सुगंध वेगवेगळा.. आणि विशेष म्हणजे प्रत्येक सकाळी प्रत्येक फुलाचा पुनर्जन्म.. आहे की नाही कमाल..!!रोज ताजातवाना प्रफुल्लित खजाना.. हे केवळ निसर्गच करू शकतो. निसर्गचक्राच्याच निर्मितीचा एक अंश असलेल्या आणि स्वतःला बुद्धिवंत समजणार्या मानवाच्या कल्पनेपलिकडे अजूनही कोसो दूर नैसर्गिक रहस्य आहेत. ज्याची उकल होणे असंभव.
जगाच्या पाठीवर अनेक प्रांत, भौगोलिक परिस्थिती, प्रदेश आणि वातावरणानुसार नाना प्रकारच्या फुलांचे प्रकार पहायला मिळतात. जे मानवी बुद्धीला अचंबित करणारे आहे. ईश्वराच्या प्रथम पूजेपासून ते मानवी कलेवराच्या अंतिम यात्रेपर्यंत फुलांचा सहभाग आहे. स्री आणि फुले यांचा तर निकटचा आणि निकडीचा संबंध. वेळ प्रसंगी गजरा नसला तरी एखादा गुलाब वेणीत खोचल्याशिवाय शृंगार पूर्ण होतच नाही. लाखो रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज सुद्धा वीस रूपयाच्या मोगऱ्याच्या गजर्यानेच परिपूर्ण होतो. शिवाय फूल हे पवित्र प्रेमाचे प्रतिक सुद्धा आहे. अर्थात या विषयावर लिहायचे झाले तर तो एक प्रदीर्घ लेख प्रपंच होईल.
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरिता, समूह प्रमुख आ. राहुल दादांनी दिलेले चित्र अशाच एका फूलाच्या प्रजातीचे आहे. हे फूल म्हणजे निसर्गाचा विस्मयकारक अविष्कार आहे. हिरव्या गर्द लांब पानाच्या आधारावर, फिक्कट गुलाबी, सफेद फुलांचा लांबलचक घोस. वरती एक छोटेसे फुलपाखरू.भान हरपून टाकणारा नैसर्गिक अविष्कार. प्रामुख्याने आग्नेय आशिया प्रांतात याची उत्पत्ती असून.फाॅक्सटेल आर्किड किवा कोपौई फूल या नावाने ओळखले जाणारे हे फूल आसाम अरूणाचल राज्याचे राष्ट्रफूल आहे. या प्रांतात तशीही नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण झालेली आहे. चित्रातील फूल कोल्हयाची शेपूट, सीतेची वेणी, द्रौपदी माला या मराठी नावाने सुद्धा ओळखले जाते.
शिवाय ही वनस्पती एखाद्या दुसर्या झाडाच्या खोडाचा आधार घेत वाढते. जमिनीत लागण करावी लागत नाही. द्राक्षाच्या घसासारखे किंवा कोल्ह्याच्या शेपटीच्या आकाराचे लांब घोस असतात. वर्षा ऋतुत बहरास येणारी ही प्रजाती विशेष सौंदर्यवान असून. एकाच घोसात गुलाबी, पांढरी आणि जांभळे ठिपके असलेली अनेक फुले असतात. जणू काही एखाद्या कसबी कलाकाराने जाडसर असा गुंफलेला सुरेख हारच. आसाम राज्यातील बिहू नृत्य हे खूपच प्रसिद्ध आहे. अशा वेळी मुली आपल्या केसात या फुलाला माळतात. अर्थात कालौघात ही प्रजाती दुर्मिळ होत चालली आहे. मात्र नैसर्गिक कौशल्याचा एक नेत्रसुखद नजारा म्हणून हे फूल मानवी मनाला खूपच मोहित करणारे आहे.
आता आपल्याला अशा विषयावर हायकू लेखन करायचे आहे. तर सर्वप्रथम अशा चित्राचा अभ्यास आणि सखोल माहिती असणे आवश्यक आहे. निसर्ग चित्र असल्याने हायकू लेखनाला खूपच वाव आहे. मात्र या माध्यमातून एक मौलीक संदेश मिळणे खूप महत्त्वाचे आहे. हायकू काव्याच्या माध्यमातून आपण प्रबोधनात्मक विचार पसरवू शकतो. ज्यातून निसर्ग संवर्धन आणि संरक्षणाचा बहुमूल्य संदेश देऊ शकतो. केवळ मनोरंजन हा उद्देश नसून सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक जबाबदारी बांधिलकीची भावना व्यक्त करू शकतो.
अशा अंगाने होणाऱ्या रचना प्रभावी रचनेत गणल्या जातील. किंबहुना अशा स्पर्धेचा उद्देशच असा असायला हरकत नाही. एकाच वेळी भाषा आणि निसर्ग संवर्धनाचे महान कार्य आपण करू शकतो. एक हायकूकार म्हणून स्वतःला वेगळ्या दृष्टिकोनातून आपण मांडायला सिद्ध करायला हवे. दुसरी गोष्ट स्पर्धा म्हंटले की मर्यादा आल्याच. ज्या रचनांची निवड होते त्याच उत्कृष्ट आणि इतर रचना सुमार असा अर्थ होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून सातत्याने काव्य साधना करत रहावे हीच सूचनावजा अपेक्षा..!. सर्वाच्या काव्य वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मला परीक्षणीय मनोगताची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनापासून आभार… !!!
विष्णू संकपाळ, छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह


