Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“आई गेल्यावर फक्त फोटो उरतो आणि भाकरीतली ती चव कायमची निघून जाते”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 8 2 3 9

“आई गेल्यावर फक्त फोटो उरतो आणि भाकरीतली ती चव कायमची निघून जाते”; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र खरोखरच भावस्पर्शी आहे. चित्रात दोनच व्यक्ती आहेत, पण जणू त्यात विश्व सामावलंय. मुलांसाठी आई व आईसाठी मुले विश्वच तर असतात..! खाली बसून जेवणारा मुलगा व जवळ बसून त्याला जेवू घालणारी आई.. कुठल्याही घरात पहा. आधुनिक असो व अडाणी.. शक्यतो आई मुलांना जवळ बसूनच जेवायला घालते. त्याशिवाय तिला मुलं पोटभर खातील याची खात्रीच वाटत नाही. स्वतः अर्धपोटी राहील, पण मुलांचं पोट भरलेलं पाहून तृप्तीचा ढेकर देईल. खरंतर मुलांना जेवू घालताना तिला गणित येतंच नाही असं वाटतं. दोन घास, दोन घास म्हणत कधी वाटीभर खायला लावते तेही कळून देत नाही. तिने कालवलेल्या पिठात फक्त पाणी नसतं तर त्यात आपलेपणाचा ओलावा असतो. तिच्या हाताचा स्पर्श, काळजातली माया व माझी लेकरं पोटभर जेवू देत ही मनापासूनची प्रार्थना असते. ती पानात अन्नासोबत प्रेम वाढते. म्हणून जोपर्यंत आई आहे, तोपर्यंत तिच्या मांडीजवळ बसा. तिच्या हातचं खा. तिला वेळ द्या. कारण आई गेल्यावर फक्त फोटो उरतो आणि भाकरीतली ती चव कायमची निघून जाते.

त्या छोट्याशा घरात असलेलं जुजबी सामान पाहून घराच्या साधेपणाची कल्पना येतेय. पण तरीही ते घर महालाप्रमाणे सुंदर भासतेय कारण तिथे आई आहे. आई असल्यावर घराला घरपण येते. भिंतीना मायेची ओल येते. छताला शितलता लाभते… अन् घराच्या फरशीवरही आपुलकीची ऊब दाटते. आई घराची प्राणशक्ती असते. आई घरातील चैतन्यदायी ज्योत असते, स्वतः जळते पण शितल प्रकाशाने सर्वांची मने प्रसन्न ठेवते.

आईशिवाय जग सुनं वाटतं हे खरंच आहे. शाळेतून आलेल्या मुलाची नजर घरात आधी शोधते ती आईलाच. आई असल्यावर तिच्याशी किती बोलू नि काय सांगू असेच होऊन जाते. सगळ्या गमतीजमती ती अगदी मन लावून ऐकते. आपण कितीही मोठे झालो तरी जिच्या कुशीत विसावण्याचा मोह होतो ते हक्काचं ठिकाण म्हणजे आई. जगात बाॅस म्हणून वावरणारा घरी आला, की आईचा बाळ होतो. कारण मनास हवा असणारा निश्चिंतपणा केवळ तिथेच मिळतो.

जन्माआधीपासूनच जिच्याशी नाळ जुळलेली असते ती म्हणजे आई. उदरात वाढणारा जीव कसा आहे याची काहीच कल्पना नसताना, ज्या जिवाची फक्त अनुभूती घेऊन ती त्याच्यावर जिवापाड प्रेम करायला लागते ती असते आई. आजच्या धावपळीच्या युगात आपण खूप काही मिळवलं, पण ज्या घरात आई नाही तिथे सगळं असूनही काहीच नाही, आणि जिथे आई आहे तिथे काहीच नसलं, तरी सगळं काही आहे.

जगाच्या बाजारात आपण सगळे हिशेब ठेवतो, पण आईच्या दरबारात सगळे हिशेब माफ असतात. त्या परमेश्वरालाही आई म्हणवून घेताना कोण अभिमान वाटत असेल नाही का? ‘माऊली’ या शब्दाहून कुठल्याही श्रेष्ठ शब्दाने भक्ताने त्याला हाक मारावी असे त्याला कधीच वाटत नसेल… होय त्यालाही आईपणाचा मोह सुटला नाही हेच खरे. असाच गोड मोह साहित्यिकांनाही होतोच. ‘मराठीचे शिलेदार’ समूहात चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र पाहून समूहात एवढ्या रचना आल्या की आईच्या महतीसाठी शब्द अपुरे पडतात याचीच अनुभूती आली. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. अशीच तुमची लेखणी बहरत राहो. असा हृदयस्पर्शी विषय देऊन मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्याबद्दल आदरणीय राहुल दादांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे इंदापूर, पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 2 3 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे