मित्रता
डॉ. अविनाश प. परांजपे वानाडोंगरी, ता. हिंगणा जि. नागपूर

मित्रता !
परवाच “ मैत्रीदिन ” साजरा झाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील. सोशल मिडियावर ‘मैत्री’ यावर विविध पोस्ट्सचा नुसता वर्षाव झाला. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो, त्यांना मैत्रीच्या धाग्यात गुंफतो अशी एक प्राचीन समजूत आहे. ती खरीही असावी बहुतेक. अगदी शोले सिनेमा मधील ‘जय-वीरू’च्या गाण्यापासून त्याहीपेक्षा जुन्या सुनील दत्तच्या ‘अहेसान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो’, या गाण्याची उजळणी झाली. ते बघितले आणि माझ्या मनात एक विचार आला.
या एका अतूट बंधनाचा इतिहास काय असावा? मला आढळला तो ऋग्वेदातील मैत्री संबंधातील पहिला उल्लेख. ज्यात असे आहे की सगळ्यात पहिली प्रगाढ मैत्री ही ‘ मित्र आणि वरुण’ या दोन देवतांच्यात होती. इतकी की त्या जोडगोळीला एकाच शब्दात “मित्रावरुण” या एकाच नावाने ऋग्वेदातील अनेक सुक्तात वर्णीले आहे. त्यांच्याच जोडीचे पुढे लघुरुप केवळ ‘मैत्री ’ या एका द्विअक्षरी शब्दात सामावले गेले. नंतर एका संस्कृत श्लोकात या अद्वितीय संबंधाची व्याख्या ही करण्यात आली. ती अशी “ आढ्यतो वापि दरीद्रो वा दु:खित: सुखितोआपिवा! निर्दोश्श्च सदोष्श्च व्यस्य: परमागति:!” अर्थात् धनवान असो की निर्धन, दु;खी असो की सुखी, निर्दोष असो की दोषी प्रत्येक वेळी स्थिरपणे साथीला उभा ठाकलेलाच परममित्र असतो.
आपण प्रागैतिहासिक काळातील उदाहरणे बघितल्यास, आपल्याला श्रीराम- वानरराज सुग्रीव यांची मैत्री दिसून येते. महाभारत काळातील श्रीकृष्णार्जुन आणि कर्ण-दुर्योधन ह्या दोन जोड्या दिसून येतात. ज्यात निर्दोष अर्जुनाच्या साथीला श्रीकृष्ण आणि दोषी असलेल्या दुर्योधनाच्या साथीला केवळ मैत्री निभवायची यासाठी कर्ण उभे ठाकलेले दिसून येतात. नंतर इतिहासकालीन प्रसिद्ध उल्लेख हा सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्याचा मित्र चांदवरदायी या मित्रांच्या जोडीने मोहम्मद घौरी याच्या क्रूरतेचा सूड घेत केलेले बलिदान याचा आहे. अगदी तसाच उल्लेख बादशाहा औरंगजेब याच्या अमानुष अत्याचारांना ‘जुतेकी नोंक पर’ म्हणतात तसे ठोकरून, स्वधर्म आणि स्वराज्य या करीता बलिदान देणार्या मित्रांची जोडी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांचा आहे.
या नंतरचा प्रकर्षाने केला गेलेला उल्लेख छत्रपती शिवरायांनी मैत्री म्हणून महाराज ‘छत्रसाल’ यांना संकटाच्या वेळी मराठे मदतीला येतील असे दिलेले वचनपूर्ती करीता शिवरायांच्या तिसर्या पिढीतील शाहू राजांचे पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवे यांनी रातोरात धाव घेऊन महम्मदखान बंगश याच्या आक्रमणापासून राजा छत्रसाल आणि बुंदेलखंडाचे केलेले रक्षण. यातून मैत्री आणि स्वामीनिष्ठा या दोघाही गुणांचे दर्शन घडते. त्यानंतर राजेशाही प्रकार हळूहळू समाप्तीस लागल्याने दोन राजे लोकांतील दोस्ती एव्हढेच रूप न राहता त्या मैत्री नावाच्या प्रकाराने दोन राष्ट्रांच्या मधील मैत्री असे स्वरूप घेतले.
आपल्या देशाने ‘जागतिक मित्र’ अशी नवीन छवी निर्माण करत कोरोना नावाच्या जागतिक संकटाचे वेळी जगातील जास्तीतजास्त देशांना करोना लस फुकट पुरवली. ह्या जागतिक बाबी सोडल्या, तर आपल्या लोकशाही देशात वेगवेगळे शेकडो राजकीय पक्षांचे जे पीक आले आहे , ते हे पक्ष , निवडणुकी नंतर केवळ सत्ता आणि पैसा या करीता आज ह्याच्या गळ्यात दोस्तीचा हात टाकतात, तर उद्या एकदम विरोधी गटातील पक्ष्याच्या मानेवर मैत्रीचा हात ठेवतात. आणि सोयीच्या आघाड्या युत्या बनवितात. हे प्रकार थेट दिल्ली ते गल्ली सर्रास होतात.
ह्या राजकारण्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, की महोदय, आपण कधीतरी जनतेशी मैत्री करा. नुसते चढाओढीने लोकांना, आज हे फुकट, उद्या ते फुकट, पैसे फुकट करता करता फुकटे बनवू नका. आम्हाला तुमच्या फुकट गोष्टी नकोतच नकोत. कारण भारतीय जनता भिकारी नाही, तर स्वाभिमानी आहे. फुकटदान नकोय आम्हाला. जनतेशी मैत्री करा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. अडचणीवर मात करायची ताकत, हिम्मत आहे जनतेत. केवळ तुमचा “मित्रतेचा” आधार हवाय. मित्र बनून या, आधार द्या,सपोर्ट द्या, पाठिंबा द्या, सुविधा द्या, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्या. पैसा दान देऊन उपकारकर्ते म्हणून येऊ नका.
डॉ. अविनाश प. परांजपे
वानाडोंगरी, ता. हिंगणा जि. नागपूर
=============



