जे. एस. एम. महाविद्यालयात एच.आय.व्ही./एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

जे. एस. एम. महाविद्यालयात एच.आय.व्ही./एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि १२) : जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व टाटा पॉवर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून एच.आय.व्ही./एड्स जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही./एड्सविषयी योग्य माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. पंकज घरत, प्रा. प्रमोद हिवरे तसेच टाटा पावर कंपनीचे पदाधिकारी श्री रमेश ठोसर, श्री आरजीत सिंग व श्री अब्दुल सलाम आणि एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्व सांगितले, तसेच एच. आय. व्ही. / एड्स जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला.
जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष ॲड. डॉ. गौतम पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा देत युवकांनी सामाजिक आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
श्री. रमेश ठोसर यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही./एड्सचे संक्रमण, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज आणि जनजागृतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी एच.आय.व्ही./एड्स जनजागृतीविषयक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत जास्तीत जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एच.आय.व्ही./एड्सविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच आरोग्यदायी आणि जबाबदार समाजनिर्मितीचा संदेश पोहोचला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. पंकज घरत यांनी केले.



