मनाचे ओझे
मनात साठलेलं बोलू की
बोलच मनात साठवू…
कुणीच दिसत नाही आता,
ज्याला मी मन मोकळं सांगू।
आपल्याच लोकांना वेळ नाही,
माझ्या वेदना ऐकायला,
डोळ्यांच्या काठावर दाटलेले भाव,
थोडं तरी समजून घ्यायला।
शब्दही आटून गेलेत
मंदावलेल्या अश्रूंच्या थेंबांसारखे ,
मनही तुटून पडलंय जणू
शस्त्रक्रिया झालेल्या हृदयासारखे।
ज्याची आस असते, तोच आभासी निघतो,
एका बटनाने तो क्षणात नाहीसा होतो…
डोळे शोधतात जवळीक, पण स्क्रीन मात्र थंडगार असते,
मनाची धडधड न ऐकता ती फक्त प्रतिमा दाखवते।
कागदावर शब्द रेखाटता रेखाटता, तेही बधिर झाले,
भावनांच्या तडफेने थकून, तेही नि:शब्द निर्वाणीला गेले।
लिहिताना हातही कंप पावले जणू शब्दांचेच वैरी झाले,
भावनांच्या गर्दीत स्वतःलाच ओळखू न शकणारे झाले।
मनातलं काही उमटत नाही, ओठांवर काही फुलत नाही,
या शांततेच्या आरशात आता स्वतःचंच प्रतिबिंब दिसत नाही।
तरीही… कागद, शब्द, आणि हे कंपणारे हात
हेच आता माझे सोबती, माझं जग, माझीच करामात।
डॉ. राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर



