Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसाहित्यगंध

“विचारांची चिकित्सा हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.”; प्रशांत ठाकरे, सिलवासा

'शनिवारीय काव्यस्तंभ' स्पर्धेचे परीक्षण

0 6 5 0 7 2

“विचारांची चिकित्सा हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.”; प्रशांत ठाकरे, सिलवासा

‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेचे परीक्षण

काही माणसे केवळ आपल्या कर्तृत्वाने मोठी होत नाहीत, तर आपल्या विचारांनी अनेक पिढ्यांच्या भविष्याला आकार देतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे असेच एक व्यक्तिमत्त्व! राष्ट्राचे भविष्य केवळ सत्तेच्या सिंहासनावर घडत नसते, तर ते वर्गखोल्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, संशोधन केंद्रांमध्ये आणि मुक्त विचारांच्या अवकाशात आकाराला येत असते. त्यांनी वर्तमानातील आव्हानांशी झुंज देतानाच भविष्याच्या भारतासाठी ज्ञानाची बीजे रोवली याच विचाराने पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आय.आय.टी.खरगपूर, आय. आय.टी.मुंबई, आय.आय.टी.मद्रास, आय.आय.टी. कानपूर, आय.आय.टी. दिल्ली, एम्स नवी दिल्ली, आय.आय. एम.कलकत्ता, एन सी इ आर टी, डी आर डी ओ, अणुऊर्जा आयोग, सी एस आय आर, राष्ट्रीय नियोजन आयोग, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी यांसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांनी आकार घेतला.

काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या चौकटीत बंदिस्त होत नाहीत तर ती इतिहासाच्या पानांवरून वर्तमानाशी संवाद साधत राहतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या यज्ञात स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या नवनिर्माणाचा भक्कम पाया घालणारे हे नेतृत्व म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व होय. ‘नेहरू म्हणजे केवळ भारताचे पहिले पंतप्रधान नव्हते, तर ते एका नव्या भारताचे स्वप्न पाहणारे स्वप्नद्रष्टे होते’. त्यांच्या विचारविश्वात स्वातंत्र्याला केवळ राजकीय अर्थ नव्हता. त्याला सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता आणि मानवी प्रतिष्ठेची व्यापक परिमाणे होती. त्यांना असा भारत घडवायचा होता, जिथे माणसाची ओळख त्याच्या जातीने, धर्माने अथवा आर्थिक परिस्थितीने नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वाने आणि माणुसकीने ठरावी.

बालपणापासूनच त्यांच्यात ज्ञानाविषयी अपार जिज्ञासा होती. पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव असतानाही भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्याशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग केला आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले. कारावासाच्या भिंती त्यांच्या विचारांना कैद करू शकल्या नाहीत. उलट, तुरुंगवासातच त्यांच्या चिंतनाला अधिक व्यापकता लाभली. राष्ट्रनिर्मितीच्या त्यांच्या संकल्पनेत विज्ञान आणि शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होते. वैज्ञानिक संस्था, उच्च शिक्षणसंस्था, औद्योगिक विकास, धरणे आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून त्यांनी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने धरणे ही केवळ जलसाठ्याची साधने नव्हती, तर विकासाच्या नव्या शक्यतांची प्रतीके होती.

देशाने अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर पडून विवेकाच्या प्रकाशात वाटचाल करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन केवळ गौरवाच्या चष्म्यातून करता कामा नये. नेहरूंच्या धोरणांवर, निर्णयांवर आणि राजकीय भूमिकांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही निर्णयांवर टीका झाली, काही स्वप्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु इतिहासाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करताना त्यांच्या योगदानाबरोबरच त्यांच्या मर्यादांचाही चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. व्यक्तिपूजा नव्हे, तर विचारांची चिकित्सा हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.

आज १४ नोव्हेंबर बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘चाचा नेहरू’ हा विषय दिला होता.नेहरू म्हणजे केवळ बालदिन ही संकल्पना मला अजिबात रुचत नाही. थोडे इतिहासात डोकावले असता १९०० मध्ये मोतीलाल नेहरू यांनी आनंद भवन नावाची स्वतःची भव्य वास्तू राष्ट्राला समर्पित करून त्यागाचे उदाहरण समोर ठेवले आहे. तेव्हा सर्वच कवी, कवयित्रींनी विषयाला योग्य न्याय दिला. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 0 7 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे