Breaking
ई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

किल्ले महिमानगड; स्वाती मराडे

सहसंपादक

0 4 8 2 9 0

किल्ले महिमानगड

महिमानगड किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. सातारा-पुसेगाव- म्हसवड असा गाडीमार्ग आहे. या गाडीमार्गावर साताऱ्यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आहे. महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे नावाचे गाव आहे. तर उत्तर पायथ्याला महिमानगडवाडी आहे. उकीर्डेकडूनही गडावर जाता येते. पण ती काहीशी अवघड असून तुटक्या तटबंदीमधून गडात शिरते. महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्ग आहे. या मार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची तटबंदी सुरेख दिसते. महिमानगडवाडी किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहे.

वाडीतील मंदिरापासून एक वाट गडावर जाते. या वाटेवरून गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणाने ही वाट दरवाजापर्यंत जाते. गडावर अनेक ढोरवाटा तयार झालेल्या आहेत. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याचे टाके कोरलेले आहे. दुसरे गाळाने पूर्ण भरले आहे. तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मूळ वाटेवर येवू शकतो. येथून गडात शिरणारा मार्ग दिसतो. तो उत्तरेकडून असला तरी तो वळवून आत घेतला आहे. आतील दरवाजा पुर्वाभिमुख दिसतो.

महिमानगडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूला सुबक घडीव दगडी खांब आहेत, या खांबांच्या खालच्या बाजूला देखणे असे हत्ती कोरलेले आहेत. दरवाजाच्या समोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रूपासून संरक्षण दिलेले होते, असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्टय होते. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. डावीकडील वाट गडाच्या माथ्यावर जाते. तर समोरची वाट तटबंदीकडे जाते. या वाटेने तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहळणीसाठी बुरुज आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडीदरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजा ढासळल्याने बंद आहे.

गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगरही दिसतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष, एक कबर, एक हनुमानाचे मंदिर तसेच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. या माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे. असे टाके इतर किल्ल्यांवर आढळत नाही.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे