कधी भेटशील’? या प्रश्नातच भावनांची गुंफण; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘कधी भेटशील’? या प्रश्नातच भावनांची गुंफण; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण
“पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची,
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची…”
त्या दोन प्रेमी जीवांची ती पहिली भेट. धुंद रात्र, चंद्रा सवे चांदणचुऱ्याने लखलख लेले आभाळ, पानांची सळ सळ, फुलांचा मादक गंध हळुवार वाहणाऱ्या वातलहरी नदीचा शांत प्रवाह, त्यात विहरणारी होडी,नीरवशांतता. अशा एकांतात त्याच्या मिठीत विसावलेली ती.खरंच ही अपूर्व भेट दोघांनीही जपली मनाच्या कुपीत. निघताना त्याचा प्रश्न कधी भेटशील पुन्हा? कदाचित त्यांची भेट पुन्हा कधीच होणार नव्हती. तो सीमेवर लढायला गेला आणि युद्धसमाप्तीनंतर बातमी धडकली तो बेपत्ता झाल्याची.पण ती पहिली भेट तिला जीवनभर संजीवनी देत राहिली.
अगदी पौराणिक काळाचा विचार केला तर या विषयाचा संदर्भ मिळेल. श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासाला निघाले. तेंव्हा अत्यंत अगतिकपणे कौसल्या मातेने रामाला जवळ घेऊन विचारलेला प्रश्न कधी भेटशील रामराया? आपल्या मोठ्या बंधू, वहिनीसह वनवासात जायला निघा लेल्या पती लक्ष्मणाला उर्मिलेचा भावविवश होऊन विचारलेला प्रश्न कधी भेटणार नाथा आता? किती विरहव्यथा भरली आहे या प्रश्नात! पती गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा झालेल्या अहिल्येचा श्रीरामाच्या प्रतिक्षेत आळवलेला प्रश्न कधी भेटशील श्रीरामा? यात दु:ख, करुणा, स्वउध्दाराची तळमळ, रामरायांच्या चरणस्पर्शासाठी आतुरलेपण यांचे दर्शन होते.अगदी स्वातंत्र्य संग्रामा वेळी मंडाले च्या तुरुंगात शिक्षा भोगायला जाणा ऱ्या लोकमान्य टिळकांना त्यांच्या पत्नीने असेच विचारले असेल आता कधी भेटणार?
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नीची अंदमानला पतीला नेले जात असताना अशीच विमनस्क स्थिती होती. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी यांच्या कुटुंबियांनी किती दु:ख,हाल, सोसले असतील याची कल्पना करणे ही दु:खदायक आहे. आपल्या वीर पुत्राला सीमेवर जाण्यासाठी औक्षण करताना त्याची आई, पत्नी यांच्या ओठांवर हाच प्रश्न असतो, आता कधी भेटशील? अगदी प्रियकर प्रेयसी, पतीपत्नी, आईवडील व पाल्य, मित्र मैत्रिणी. सर्वांनाच अशी दुरावण्याची भीती असते.
वास्तविक प्रत्येकाने आपले नातेवाईक, आप्तेष्ट यांना भेटले पाहिजे. आईवडील, मुले यांच्यात प्रत्यक्ष संवाद गरजेचा आहे. भेटीगाठीचे महत्व अगदी अधोरेखित आहे. याच दृष्टीकोनातून आपल्या आदरणीय राहुल सरांनी आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी ‘कधी भेटशील’? हा विचार करायला लावणारा विषय दिला आहे. शिलेदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण अजून रचनेच्या विषयात वैविध्य असावे असे वाटते. तिसऱ्या ओळीच्या कलाटणी कडे जाणीव पूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





