जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
तुषार थळे,प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
तुषार थळे,प्रतिनिधी
अलिबाग: संयुक्त राष्ट्र संघाने निर्धारीत केल्यानुसार, वर्ष २०१५ पासून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने यु. जी. सी. व मुंबई विद्यापीठ यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये दि. २१ जून 2024 रोजी सकाळी ठीक ७:३० वा. महाविद्यालयाच्या जिमखाना विभागामध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड व प्रा. अश्विनी आठवले, जिमखाना समिती प्रमुख डॉ. रवींद्र चिखले, कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. बी. आर. गुरव, तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन. एस. एस. स्वयंसेवक आणि एन. सी. सी. कॅडेट्स व इतर विद्यार्थी सहभागी झाले.
या कार्यक्रमात योगाभ्यास व प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी श्री. दिपक गाटे, पतंजली योगपीठ, जिल्हा रायगडचे युवा भारत प्रभारी, व श्री विजयकुमार शिंदे, महामंत्री, पतंजली योग समिती, रायगड, हे योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ऍड. गौतम पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी ठीक ७:३० वाजता योग दिन कार्यक्रम सुरू झाला. सर्व प्रथम उपस्थित पाहुण्यांचे प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना योगदिन साजरा करण्याची पार्श्वभूमी आणि योगाभ्यासाचे व प्राणायामाचे महत्व विषद केले. आपल्या मनोगताच्या शेवटी प्राचार्या डॉ. सोनाली पाटील म्हणाल्या प्रत्येकाने केवळ योग दिनादिवशी योगाभ्यास न करता आपल्या उत्तम आरोग्यासाठी योगासने नियमितपणे करावीत. त्यानंतर सामूहिक प्रार्थना घेऊन प्रत्यक्ष योगाभ्यसला सुरवात करण्यात आली.
योग प्रशिक्षक श्री दिपक गाटे व श्री विजयकुमार शिंदे यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या ‘आसनांचा’ पद्धतशीर सराव करून दाखवला. “योगाभ्यास” दरम्यान, योग शिक्षक श्री. विजयकुमार शिंदे यांनी विविध “आसनांचा” उपयोग, अनेक रोग बरे करण्यासाठी आणि मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगाची उपयुक्तता देखील सांगितली. योगाभ्यास दरम्यान वेगवेगळी आसने केली गेली ज्यामध्ये ताडासन, वृक्षासन, पद-हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, वज्रासन, उस्त्रासन, मकरासन, भुजंगासन, सालभासन, सेतुबंधासन, उत्तानपदासन, शवासन, कपालभाती, भ्रमारिका व इतर प्राणायामाचे प्रकार यांचे प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याचे आपल्या शरीर व मनाला होणारे फायदे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, एन. एस. एस. स्वयंसेवक, एन. सी. सी. कॅडेट्स यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता 9:00 वाजता झाली.
सर्व सहभागींनी त्यांचे शरीर आणि मन निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी योगासन करत राहतील अशी शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींना अल्पोपहार देण्यात आला. योगाभ्यासाचा नियमित सराव हा सर्वांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही चांगले जीवन प्राप्त करण्यास नक्कीच मदत करेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन. एस. एस. युनिट, एन.सी.सी. युनिट आणि जिमखाना विभाग यांनी संयुक्त विद्यमाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर डॉ. प्रविण गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.





