Breaking
अमरावतीआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

फसगत

श्रीमती सुलोचना लडवे ता. जिल्हा अमरावती

0 6 2 9 9 2

फसगत

राधेश्याम हा शहराजवळील एका खेड्यात राहत होता. पत्नी, एक मुलगा व दोन मुली असे त्याचे कुटुंब होते. राधेश्याम एका लहान कंपनीमध्ये मजुरीचे काम करत होता. तो एका पायाने अपंग होता. त्याला काठीचा आधार घेऊन चालावे लागे. तरीही तो त्याला जमणारे काम कंपनीत करत असे. परिस्थिती गरीबीची असली तरी, मजुरी करून हे कुटुंब आपल्या गरजा भागवत होते. मुलगा मोठा होता. त्याने पदवीचे शिक्षण घेतले होते. परंतु तो सुद्धा खाजगी कंपनीत मजुरीचे काम करायचा. मुलगी श्वेता ही दहावीला शिकत होती. दुसरी मुलगी प्रिया नववीमध्ये शिकत होती. त्या दोघीही आईला घरकामात मदत करायच्या. सुटीच्या दिवशी शेतात आई सोबत कामाला जायच्या.

छत्तीसगडवरून आलेला ललनसिंग हासुद्धा त्याच कंपनीत मजुरीचे काम करायचा. राधेश्याम व ललनसिंगमध्ये कधी कधी वार्तालाप होत असे. हळूहळू राधेश्याम व ललनसिंग यांच्यात मैत्री झाली. ललनसिंगचे कुटुंब त्याने सोबत आणलेले नव्हते. मग सुटीच्या दिवसी तो कुठेतरी फिरायला जायचा. एक दिवस राधेश्यामने त्याला आपल्या घरी आणले. कुटुंबातील सदस्यांना त्याचा परीचय करून दिला. राधेश्यामचे मुलं त्याला काका म्हणू लागले. पुढे ललनसिंग जणू त्यांच्या कुटुंबाचा सदस्यच झाला. त्याने सर्वांचा विश्वास जिंकला होता. एका सुटीच्या दिवसी त्याने त्याच्या खोलीवर सत्यनारायणाची कथा आयोजित केली. त्याने राधेश्यामला फोन करून मुली व तुम्ही कार्यक्रमाला या असे सांगितले त्यानुसार राधेश्याम व मुली गेल्या. संध्याकाळी ते घरी परतले. आता ललनसिंगचा नित्यनेम झाला. काम पडताच तो मुलींना बोलवून घ्यायचा व संध्याकाळी मुली घरी सुखरूप यायच्या. शंकेला कुठेही जागा नव्हती.

या संधीचा फायदा घेऊन त्याने राधेश्यामला मुलींना पाठवण्याची विनंती केली. घरी पाहुणे आल्याचे कारण सांगितले. काहीही विचार न करता राधेश्यामने मुलींना ललनसिंगकडे पाठवले. संध्याकाळी मुली घरी येतील या आस्थेने राधेश्याम शांत होता. रात्रीचे आठ वाजले मुली अजून घरी परतल्या नव्हत्या. ललनसिंगला फोन लावला तर त्याने मुलींना ॳॅटोने बसवून दिल्याचे सांगितले. रात्रीचे नऊ, दहा, अकरा वाजले मुलींचा पत्ता नाही. ललनसिंगाचा फोन बंद येत होता. राधेश्यामचा मुलगा चक्रधर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊन आला. तक्रारीत ललनसिंगच्या नावाचा उल्लेख होता. संपूर्ण रात्र कुटुंबाने आणि त्यांच्यासमवेत शेजा-यांनी जागून काढली. दुस-या दिवशी गोंदिया पोलीस स्टेशनमधून शहरातील पोलीस स्टेशनला फोन आला. तुमच्याकडील श्वेता व प्रिया नावाच्या दोन मुली आमच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना रेल्वेमध्ये बसवून देतो तुम्ही त्यांना आईवडीलांकडे पोहचवून द्या.

गोंदिया पोलीसांनी इत्यंभूत माहिती सदर पोलीसांना सांगितली. त्याअगोदर मुलगा चक्रधरने आसपासचा पूर्ण परिसर पिंजून काढला. पण त्याला बहिणींचा थांगपत्ता लागला नाही. माहितीनुसार ललनसिंगने पाहुण्यांच्या निमीत्ताने मुलींना बोलवले होते. प्रत्यक्षात त्याच्याकडे कोणतेही पाहुणे आलेले नव्हते. त्यादिवशी मुली त्याचे घरी पोहचताच तो त्यांना बडनेरा स्टेशनवरून नागपूरकडे जाणा-या गाडीत घेऊन बसला. मुलींना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी बाबांना फोन करा असे वारंवार विनविले, परंतु त्याने ब्र ही ऐकले नाही. नागपूरला गाडी थांबताच तो मुलींना घेऊन उतरला. मुलींनी रेल्वे पोलीसांशी, कुण्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याची कडक निगरानी मुलींवर होती.

त्याने नागपुरातील बदनाम वस्तीत मुलींना फिरवले. काही व्यक्तींसोबत तो काहीतरी व्यवहाराचं बोलतो आहे हे मुलींच्या लक्षात आले. अर्थात त्याचा मुली विकण्याचाच डाव असावा. नागपुरात काहीही काम जमत नाही; म्हणून तो पुन्हा नागपुरच्या स्टेशनवर आला. मुलींनी लघुशंकेला जाण्याचे विचारताच तो प्रसाधनाजवळ उभा राहायचा. आता तो मुलींना छत्तीसगडला जाणा-या गाडीत घेऊन बसला. जवळपास रात्री आठ वाजता गाडी गोंदिया स्टेशनवर आली. मुलींच्या मनाची कालवाकालव जास्तच वाढत होती. स्टेशन येताच श्वेताने पाणी पिण्याचा बहाणा केला. प्रियाला तू गाडीतच बसून राहा असे सांगितले.

प्रिया गाडीत असल्यामुळे तो श्वेताच्या मागे खाली आला नाही. रेल्वे पोलीस समोरच होते. एका पोलीसाला श्वेताने आम्हाला वाचवा, ‘एक भामटा आम्हाला पळवून नेत आहे’, हे चालता चालताच सांगितले व पाणी पिऊन ती गाडीत बसली. लगेच रेल्वे पोलीस गाडीत चढले. त्या ललनसिंग भामट्याला तिथेच बेड्या ठोकल्या.मुलींना सुरक्षितपणे सोडवून त्यांना आपल्या घरी सुरक्षित ठेवले.या सर्व प्रकारात पोलीसांना मुलींनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.दुसरे दिवसी पोलीसांनी मुलींना गाडीत बसवून बडनेरा येथील पोलिसांना उतरून घेण्यास सांगितले. सर्व माहिती कळताच भाऊ चक्रधर सदर ठिकाणी उपस्थित झाला. बहीणभावाची ती भेट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. पण या घटनेवरून कुटुंबाला आणि सर्वांनाच धडा मिळाला. कुणावरही विश्वास ठेवू नये.भावाची तडफड आणि मुलींचे प्रसंगावधान यामुळे येणारे संकट टळले.आणि तो भामटा गजाआड झाला. उत्तम संस्काराशिवाय मानलेले नाते टिकत नाही आणि कधीही रक्ताचे नाते सुटत नाही.अशी फसगत होऊ नये यासाठी प्रत्येक आईवडिलांनी, लेकरांनी सदैव सतर्क राहावे.

श्रीमती सुलोचना लडवे
ता. जिल्हा अमरावती
=====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 9 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे