साद तिची प्रेमाची…प्रतिक्षा व्हॅलेंटाईन डे ची…
सविता पाटील ठाकरे सिलवासा
साद तिची प्रेमाची…प्रतिक्षा व्हॅलेंटाईन डे ची…
ती बिचारी….किती वाट पाहत होती त्याची. पण तो मात्र नेहमी आपल्या कामातच व्यस्त… न राहून आज शेवटी तिने लेखणी हातात घेतलीच….
सांग कधी कळणार तुला…
भाव माझ्या मनातला….
रंग कधी दिसणार तुला… लाजणाऱ्या फुलातला…
कधी रे कळणार तुला?जसं समुद्राचं किनार्याशी ,ढगांचं आभाळाशी, मातीचं जमिनीशी अगदी तसंच माझं नातं आहे तुझ्याशी…पण का अवहेरतोस तू मला ?
माझ्या प्रेमाची किंमत कधी कळणार आहे रे तुला..?
काल रात्री तो पौर्णिमेचा चंद्र पाहत होती मी… किती प्रेमाने वागत होता तो त्या चांदण्यांसवे….साथही देत होता तो त्यांना.. अन् त्याच्या शीतल प्रकाशात चांदण्यांचे सौंदर्य अधिकच खुलवत होता..अगदी तशीच साथ हवी आहे मला तुझी… देशील ना साथ,माझ्या प्रेमाची किंमत आता तरी कळेल ना तुला..?
तू माझं जितेपणाचं स्वप्न आहेस,मला ते स्वप्न सत्यात उतरवायचं आहे त्यासाठी माझ्या प्रेमाची कोणतीही परीक्षा घे तू…मी त्या परीक्षेत पास होईलच…एकमेकांची साथ अन् शेवटपर्यंत हातात हात…ठेवशील ना?एवढेच मला अपेक्षित आहे … पण हे कधी कळणार आहे तुला ?
ऋणानुबंध….ते तर कधीच जुळलेत आपले..बहुतेक वेळा तुला कळतं,पण वळत नाही. तुला कळायलाही हवं अन् वळायलाही हवं त्यासाठी काय करू मी? सांगशील का एकदा तू मला? मनाचं नातं जोडून तर पहा… ओळखशील ना मला? तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेली मी…..
कधी कशी नाही दिसली तुला…?? निदान या व्हॅलेंटाईन डेला तरी…शोध मला… शोध माझ्या प्रेमाला…. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बिचारी त्याची दिवसभर वाट पाहत राहिली…आणि शेवटी त्याला पण तिची आठवण आलीच…..!! प्रेमाच्या या निमित्त दिनामुळे आले बाबा दोघे एकदाचे जवळ..
सविता पाटील ठाकरे
सिलवासा



