आधुनिक स्थापत्यशास्त्राचा थक्क करणारा अविष्कार आणि कल्पक अभिव्यक्तीचा संगम”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“आधुनिक स्थापत्यशास्त्राचा थक्क करणारा अविष्कार आणि कल्पक अभिव्यक्तीचा संगम”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
जगातल्या कांही मोजक्याच महान आश्चर्यामध्ये ऐतिहासिक वास्तूकला व शिल्पकलेची नितांतसुंदर उदाहरणे समाविष्ट आहेत. यामध्ये गिझाचा पिरॅमिड, बॅबीलोनची हँगींग गार्डन, रोडसचा कोलोसस, पाचू मिचू पेटरा, चीनची भिंत, भारतातील आग्र्याचा ताजमहाल तसे अजिंठा वेरूळ लेणी यांचा समावेश आहे. लाखो वर्षापूर्वी भारत श्रीलंकेला जोडणाऱ्या रामसेतूचे उदाहरण ही आढळते. काळाच्या ओघात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बळावर मानवाने अशा काही गोष्टी निर्माण केल्या आहेत की आधुनिक जगातील ती वेगळी आश्चर्य ठरताहेत.
जगाच्या पाठीवर केवळ पर्यटनव्यवसायावरच अवलंबून असलेली अर्थव्यवस्था असलेले अनेक देश आहेत. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, युरोपमधील काही देश याची उदाहरणे आहेत. निसर्गाने भरभरून दिलेच आहे त्यात मानवी बुद्धी कौशल्याची भर घालून अशी काही प्रेक्षणीय स्थळे निर्माण केली आहेत, की ज्याकडे जगातील हौशी पर्यटक आवर्जून धाव घेतात. गॅटलींगबर्ग येथील अॅनाकिस्ता पार्क हे एक असेच पर्यटन स्थळ आहे. की जिथे मानवी बुद्धीचा थक्क करणारा अविष्कार अनुभवायला मिळतो.
साधारण पणे दोन तीरांना सांधणारा पूल ही कल्पना चिरपरिचित आहेच. मात्र यालाच कल्पकतेची जोड दिली तर हीच एक हौशी पर्यटकासाठी पर्वणी ठरू शकते. हे त्या देशातील वास्तूशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. अँनाकास्ता पार्क हे एक असेच डोळ्यांचे पारणे फेडणारे अनोखे स्थळ आहे. काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र हेच आहे. एक झुलता पूल दृष्टीपथात येतो. लवचिक जाळीचे सुरक्षा कडे असलेला हा एक अरूंद झुलता सेतू म्हणजे विज्ञानयुगातील नवा अविष्कार आहे. दोन्ही बाजूंना निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर दिसतो. तर या पुलावरून पुढे सरकताना समोर देखणे घुमटाकार प्रवेश द्वार दिसते. हा केवळ एक पूल नसून आधुनिक स्थापत्यशास्त्राचा देखणा अविष्कार आहे. ज्यांची अनुभूती एकदा तरी प्रत्यक्षात अनुभवावी.
आ. राहुल दादा नेहमीच आगळे वेगळे विषय देऊन हायकूकारांना प्रभावीत करतात. स्पर्धेदरम्यान येणारे विषय तर कमालीचे हटके असतात. आणि येथेच रचनाकारांची खरी कसोटी लागते. काव्यप्रकार कोणताही असो. नाविन्य आणि विविधता या समूहाने नेहमीच जपली आहे. आणि त्यातूनच रचनाकारांच्या कल्पकतेला, प्रतिभेला, सूक्ष्म निरिक्षण दृष्टीलाही आगळेवेगळे आयाम लाभतात. ज्यातून वेगळे काही तरी लिहिण्याची प्रेरणा मिळते. खरी सृजनशीलता येथेच प्रत्ययास येते. आजही तमाम हायकूकारांनी याच सृजनशीलतेचा परिचय देत सुंदर हायकू लेखन केले आहे. येत्या सात मे रोजी भव्य दिव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्यात छ. संभाजीनगरीत सर्वांची उपस्थिती अपेक्षित आहे. सर्वाच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©कवी परीक्षक सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



