एकत्रित प्रयत्नांचे फलित: धामणगाव (गवळी) जिल्हा परिषद शाळेची परसबाग नागपूर जिल्ह्यात अव्वल!
भिवापूर /नांद प्रतिनिधी: अखिल रोडे

एकत्रित प्रयत्नांचे फलित: धामणगाव (गवळी) जिल्हा परिषद शाळेची परसबाग नागपूर जिल्ह्यात अव्वल!
भिवापूर /नांद प्रतिनिधी: अखिल रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ भिवापूर: (दि १ एप्रिल) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धामणगाव (गवळी) ने आपल्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून फुललेली ही ‘सेंद्रिय परसबाग’ आता संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे.
सेंद्रिय शेतीतून आरोग्याचा धडा
शाळेतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची ओळख करून देणे, निसर्गप्रेम रुजवणे आणि शालेय पोषण आहारात ताजी व विषमुक्त भाजीपाला पुरवणे हा आहे. मुख्याध्यापक सतीश बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने कचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय खताचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा मोठा संदेश दिला आहे.
नावीन्यपूर्ण ‘गोलाकार’ परसबाग
या परसबागेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा गोलाकार आकार आणि त्यात तयार केलेले १४ वाफे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांपासून ते वांगी, मिरची, टमाटर, बटाटे, मुळा, गाजर, चवळी, भेंडी, फुलकोबी आणि फळभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ऊस, पपई, चिकू, आंबा आणि फणस यांसारखी फळझाडेही डोलत आहेत. शिल्लक भाजीपाल्याची गावात विक्री करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञानाचे धडेही दिले जात आहेत.
वन्यजीवांच्या उपद्रवावर मात
शाळेची संरक्षक भिंत जंगलाला लागून असल्याने माकडांचा मोठा उपद्रव असतो. मात्र, मदतनीस वैशाली लोहंबरे यांच्यासह विद्यार्थी हिमांशू गुरले आणि ईश्वर मीना सुट्टीच्या दिवशीही बागेचे रक्षण करण्याचे कर्तव्य चोख बजावतात.
लोकसहभागातून कायापालट
या यशात शिक्षक अनिल डांगे, संदीप उमाठे, योगेश लोहंबरे, स्वयंपाकी गयाबाई मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे.
नाजूक गुरले, विजय देशमुख, परसराम हाते यांच्यासह अनेक पालकांनी ट्रॅक्टर व शेती साहित्याच्या मदतीने श्रमदान केले, तर ज्ञानेश्वर लोहंबरे यांनी सेंद्रिय खताचा पुरवठा केला. शाळेने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर केला आहे. शासकीय पारितोषिक आणि कौतुक या यशाबद्दल शाळेला तालुका स्तरावर ११ हजार आणि जिल्हा स्तरावर २१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या रकमेचा विनियोग परसबागेच्या अधिक आधुनिकीकरणासाठी केला जाणार आहे.
या यशाबद्दल माजी सभापती माधुरीताई देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर, केंद्रप्रमुख मधुकर मडावी यांच्यासह शिक्षण विभागातील मान्यवरांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे.



