स्वातंत्र्य दिन 1947 आणि 2024 : परिवर्तनाचा प्रवास
प्रशांत शेळके (एक वाटसरू) हिंगणघाट, जि. वर्धा

स्वातंत्र्य दिन 1947 आणि 2024 : परिवर्तनाचा प्रवास
आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
15 ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासातील सुवर्ण पान. ब्रिटिश सत्तेच्या दीर्घ गुलामगिरीतून मुक्त होऊन आपल्या देशाने स्वराज्याचा श्वास घेतला. पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान यांनी स्वतंत्र भारताची घोषणा केली. हा दिवस म्हणजे आनंद, उत्साह, अभिमान आणि आशेचा संगम होता. परंतु त्याच वेळी देशाच्या फाळणीमुळे निर्माण झालेल्या असामाजिक जखमांच्या वेदना, स्थलांतराचे दु:ख आणि नव्या राष्ट्राची उभारणी यासारखी आव्हानेही होती. तेव्हा देश सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या मागे होता. बहुतेक जनता निरक्षर, दारिद्र्यरेषेखाली वावरणारी आणि परंपरागत रूढी-परंपरांनी बांधलेली होती. स्त्रियांना शिक्षण व समान अधिकारांची संधी मर्यादित होती. जातीभेद, अस्पृश्यता, दारिद्र्य आणि सामाजिक असमानता हा मोठा प्रश्न देशापुढे होता. शिक्षणप्रणाली केवळ शहरी भागापुरती मर्यादित होती आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार अत्यंत कमी होता. औद्योगिक क्षेत्र मुख्यतः कापड, लोखंड व कृषीआधारित उद्योगांपुरतेच सीमित होते.
पुढील दशकांमध्ये समाजाने क्रांतिकारक बदल अनुभवले. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळे स्त्रियांना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात संधी मिळू लागली. जातीभेद कमी करण्यासाठी कायदे झाले, आरक्षण धोरणे आली आणि सामाजिक न्यायाचा पाया मजबूत झाला.
2024 मध्ये भारत एक तरुण, डिजिटल आणि प्रगतिशील समाज म्हणून उभा आहे. सोशल मीडिया, मोबाईल आणि इंटरनेटमुळे माहितीचा प्रसार झपाट्याने होतो आहे. आज स्त्रिया संरक्षण दलात, अंतराळ संशोधनात आणि उद्योगसृष्टीत नेतृत्व करीत आहेत.
शिक्षणक्षेत्रातही मोठी क्रांती झाली आहे. 1947 मध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, तर 2024 तो समाधानकारक स्थितीच्या जवळपास आले. परंतु 100% साक्षर हे उदिष्ट गाठता आले नाही. ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालये आणि डिजिटल शिक्षण केंद्रे पोहोचली आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळाली. ऑनलाईन शिक्षण, ई-लायब्ररी आणि तंत्रज्ञानाधारित प्रयोगशाळांनी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान उपलब्ध करून दिले. औद्योगिक क्षेत्रात भारताने 1947 च्या साध्या उत्पादन व्यवस्थेतून 2024 मध्ये उच्च-तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, औषधनिर्मिती, अवकाश संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा आधुनिक क्षेत्रांत जागतिक स्तरावर स्थान मिळवले आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि स्टार्टअप संस्कृतीमुळे नवीन रोजगार निर्मिती झाली. कृषीक्षेत्रात यंत्रिकीकरण, जैवतंत्रज्ञान आणि स्मार्ट शेतीमुळे उत्पादन वाढले.
आज 2024 मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या 77 वर्षांच्या प्रवासात भारताने सामाजिक समानता, शैक्षणिक प्रगती आणि औद्योगिक विकास यात भक्कम पावले टाकली आहेत. तरीही बेरोजगारी, पर्यावरणाचे प्रश्न आणि ग्रामीण-शहरी दरी ही आव्हाने शिल्लक आहेत. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव नाही, तर भविष्याचा मार्ग ठरवणारा प्रेरणादिवस आहे, ज्यामुळे 1947 च्या स्वप्नांना 2047 पर्यंत साकार करण्याची नवी उमेद जागते.
प्रशांत शेळके (एक वाटसरू)
हिंगणघाट, जि. वर्धा
=========





