Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरविदर्भ

सांघिक कामगिरी; डॅा अनिल पावशेकर ✍️

स्तंभलेखक नागपूर

0 5 1 6 5 1

सांघिक कामगिरी; डॅा अनिल पावशेकर ✍️
————————————————-
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा थरारक पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अगदी पहिल्या षटकापासून उत्सुकता आणि थरार याचा अनुभव आलेल्या या लढतीत संयम आणि कॅामन सेन्स वापरत टीम इंडियाने इंग्लंडला चीत केले आहे. पहिले दे दणादण फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला सेम टू सेम दणका देत इंग्लंडने भारतीय गोलंदाजांच्या तोंडाला फेस आणला होता. मात्र पुन्हा एकदा ॲाल आईज ॲान बुमराह कडे वळल्या आणि त्याने अकेला बुमराह क्या करेगा हे जगाला दाखवून दिले. या हाय व्होल्टेज सामन्यात जेवढी मर्दुमकी फलंदाजांनी गाजवली त्याच तोडीचे क्षेत्ररक्षण करत टीम इंडियाने बाजी मारली आहे. बुमराहने टिच्चून केलेले शेवटचे दोन षटक आणि अक्षरचे तीन झेल हे दोन्ही संघातील मुख्य विजयी फरक ठरले.

झाले काय तर वानखेडेची खेळपट्टी म्हणजे रूपानं देखणी, रंगानं चिकनी. फलंदाजांसाठी तर तू पीच बडी है मस्त मस्त, तर गोलंदाजांसाठी माहेरची साडी, संपूर्ण सामनाभर रडारड. मग फलंदाज फायदा तर घेणारच. सध्याचा संजूचा फॅार्म आणि विकेटची साथ पाहता त्याच्यासाठी आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास झाले. तसेही लंघन, उपवास केले की शरीर, मन शुद्ध होते आणि भूक जोमाने लागते. संजूला स्पर्धेच्या सुरवातीला बेंचवर बसवल्याने त्याला सामन्यांचा उपवास घडल्याने तो सध्या गोलंदाजांना कच्चा खात आहे. त्याला हॅरी ब्रुकने जीवदान देत स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. संजूने लावलेल्या ठिणगीचा इशान, दुबे, पांड्या आणि तिलकने वणवा केला आणि इंग्लंडचे गोलंदाजी जंगल त्यात बेचिराख झाले.

सामन्याची खरी मजा उत्तरार्धात आली. ईट का जवाब पत्थरसे काय असते हे इंग्लंडने दाखवून दिले. सुसाट निघालेल्या इंग्लंडला पहिला ब्रेक लावला तो पांड्याने. पीटर सॅाल्ट बाद होताच बुमराहने भाजल्या तव्यावर हॅरी ब्रुकला स्लोअर वन वर फसवले. २०२३ फायनलला जसा रोहीतचा झेल ट्रॅव्हिस हेड ने पकडला, तसंच अक्षरने एक्स्ट्रा कव्हरला जवळपास २० यार्ड उलटे धावत जाऊन हॅरी ब्रुकला झेलबाद केले. अक्षरची ती धाव, तो जीगर, ते डेडीकेशन सामन्याचा टेम्पो सेट करून गेला. उंच उंच टोलवणार्या इंग्लंडला आपला संघ इंच इंच टक्कर देऊ लागला होता. मात्र पांड्या, बुमराहने निर्माण केलेला दबाव वरूण, अक्षर कायम राखू शकले नाहीत. टप्पा, गुगली आणि वेग ही वरूणची आयुधं, मात्र गेल्या चार सामन्यात ती प्रतिस्पर्धी फलंदाजांनी निष्प्रभ केलेली आहे.

भलेही वरूण आणि अक्षरने एक एक बळी मिळवला परंतु ते षटकार रोखू शकले नाहीत, धावगतीला वेसण घालू शकले नाहीत. जेकब बॅथलच्या झंझावातापुढे अडीचशे चे टार्गेट खुजे वाटू लागले होते. भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र समाधानाची बाब म्हणजे आपल्या कडे बुमराहची षटके बाकी होते. ती कधी कशी वापरायची हा मोठा यक्षप्रश्न होता आणि इथेच सूर्याच्या कर्णधार पदाची कसोटी होती. तसेही जेकब जॅक्स जोडीने टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळवत १४ व्या षटकात ४ बाद १७२ गाठले होते. मागील सामन्यातून शहाणपण शिकत अर्शदिपने चौदाव्या षटकात वाईड लाईन पकडली आणि तिच टीम इंडिया साठी लाईफलाईन ठरली. विल जॅक्सने अर्शदिपच्या शेवटच्या चेंडूंवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच भारतीय संघाच्या विजयासाठी आशेचा किरण उजाडला.

२०२४ च्या अंतिम सामन्यात सूर्याने मिलरचा झेल घेतांना जे कौशल्य, जी जिद्द, जी समयसूचकता दाखवली, त्यापेक्षा दहापट कला अक्षरने दाखवली. काय नव्हतं त्या झेलामागे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॅाजी सोबतच मनोविज्ञान पण होतं. उंचावरून डिप होणाऱ्या चेंडूंवर हॅंड आय कॅार्डीनेशन ठेवणं, मैदानातून बाऊंड्रीकडे धावतांना सेंट्रीफ्युगल फोर्स, वाकून झेल घेतांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कव्हर करणं, सोबतच वक्र रेषेत धावतांना फ्रिक्शन झिरो झाले तर बंडी ऊलार होण्याची भीती! या सर्वांवर मात करून बॅलन्स राखत चेंडू बाऊंड्रीच्या आत दुबे कडे फेकणं, निव्वळ अप्रतिम, अद्वितीय, आकर्षक आणि अवर्णनीय! काय ते ॲड्रीनॅलीन रश असेल, ह्रुदयाची धडधड, वरखाली होणारा श्वास, मनाचा थरकाप, शरीराची घामाघूम, मेंटल अवेअरनेस, फोकस, एनर्जी आणि वाढलेली स्ट्रेंथ! भारत इंग्लंड युद्धात बाऊंड्रीवरची ही चकमक पाहण्यासारखी होती.

यांत शिवम दुबेचे पण कौतुक करावे लागेल. एरवी तांडव न्रुत्याशी निगडीत हा शिवम यावेळी मंद स्मित करत जणुकाही अक्षरला म्हणत होता, भिऊ नको मी तुझ्या शेजारी उभा आहे. अगदी शांत चित्ताने दुबेने झेल पकडत आपल्या आशा जीवंत ठेवल्या. या अविश्वसनीय झेलाने सूर्याची कर्णधार पदाची ठाकूरकी कायम राहिली, अभिषेक, वरूणचे अपयश झाकले गेले, गोलंदाजी ची लक्तरे विसरल्या गेली, १४० करोड जनतेत हर्षोल्लास निर्माण झाला, जॅक्स जेकब जोडीची ३९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी संपुष्टात आली, भारतीय संघाला विजयासाठी बुस्टर डोझ मिळाला, कॅचेस विन मॅचेस याचे जीवंत उदाहरण पहायला मिळाले. विल जॅक्स बाद होऊनही आपले संकट टळले नव्हते, कारण मैदानात इंग्लंड कर्णधार सॅम करनने बाजू लावून धरली होती. लंडन ब्रिज इज फॅालिंग डाऊन होत असतानांही बेथेल करन जोडीने वेगवान अर्धशतकी भागीदारी करत सामन्याचा रोमांच वाढवला होता.

इंग्लंडने अडीचशेच्या डोंगराचा पाठलाग करताना थोडाफार उंचवटा बाकी ठेवला होता. जेकब बेथम शांत डोक्याने रक्तहीन क्रांती करत होता. शेवटचे अस्त्र म्हणजे सूर्याकडे बुमराहचे एक षटक बाकी होते. डेथ ओव्हर्स मध्ये अक्षर किंवा हार्दिक ला बुमराहच्या पहिले आणणे जोखमीचे होते. अखेर १८ व्या षटकात बुमराहने चेंडू हातात घेताच अवघ्या देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला. बुमराहने चेंज ॲाफ पेस, स्ट्रेट लाईन, यॅार्कर टाकल्याने इंग्लंडचे फलंदाज मवाळ झाले आणि त्या षटकात फक्त सहा धावा निघाल्या. यानंतर कमाल केली ती कुंगफू पांड्याने. १९ व्या षटकात षटकार खाऊनही त्याने सॅम करनला बाऊंड्रीवर तिलकद्वारे झेलबाद केले. २०२४ फायनलला पांड्याने असेच मिलरला बाद केले होते.

१९ व्या पांड्याच्या षटकांत केवळ ९ धावा निघाल्याने अंतिम षटकात ३० धावांचे टार्गेट उरले होते. अक्षरचे एक षटक बाकी होते पण ती जोखीम घेणे म्हणजे आ बैल मुझे मार होते. अखेर ही शिवधनुष्य शिवम दुबे ने उचलले. २० व्या षटकात पहिल्याच चेंडूंवर जेकबने लॅांग ॲानला फटका हाणत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता फिट ॲन्ड फाईन पांड्या. त्याने क्षणाचाही विलंब न लावता रॅाकेट थ्रो करत जेकबला धावबाद केले. जेकब जमिनीवर लोळताच इंग्लिश संघाचा डोलारा भुईसपाट झाला. वानखेडे मैदानावर आसमंत आनंदात न्हाऊन निघाला, जेकब बाद होताच देशव्यापी धडधड सुखावली, टीम इंडियाची वाटचाल अहमदाबादकडे तर इंग्लिश संघ घरवापसी साठी कामाला लागला.

हे केवळ शारीरिक द्वंद्व नव्हते तर मानसिक कणखरतेचा, नर्व्हचा इथे कस लागला. संजू, पांड्याचा झेल सोडणे आणि क्षेत्ररक्षणातली ढिलाई इंग्लिश संघाच्या मुळावर आली. कर्णधार म्हणून सूर्याचे कौतुक करावे लागेल. दुबेला चवथ्या क्रमांकावर पाठवतांना लेफ्ट राईट कॅाम्बिनेशन सोबत स्पिनचा प्रभाव कमी करणे, बुमराह पांड्याचा योग्य वापर करणे, बाऊंड्रीवर अक्षर पांड्या तिलक ची तैनाती करणे आदी निर्णय टीम इंडियाच्या पथ्यावर पडले. गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की मिळत असतानाही आपल्या क्षेत्ररक्षकांनी जीव ओतून सामना आपल्या बाजूला फिरवला. फलंदाजीच्या वाहत्या गंगेत सगळे हात धुवत असताना अभिषेक मात्र कमनशिबी ठरला. अभिषेक संघासाठी ॲसेट नसून लायबलिटी ठरत आहे. संघासाठी ही एक चिंतेची बाब आहे. फायनल पुर्वी टी ट्वेंटीतील नंबर वन बॅटर आणि बॅालर अभिषेक, वरूण आपल्या फॅार्मसाठी झगडत आहेत. संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीने हे दोघेही झाकून जात आहे, मात्र फायनलला यांना सूर गवसणे गरजेचे आहे. या विजयाचे श्रेय जाते टीम इंडियाच्या सांघिक कामगिरीला. त्यातही संजूची फलंदाजी, बुमराह ची गोलंदाजी, अक्षरचे झेल आणि सूर्याचे नेतृत्व उठून दिसते.
———————————————
दिनांक ०६ मार्च २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
———————————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे