बी. एल. ओ. चे काम काळजीपूर्वक करा.
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे

बी. एल. ओ. चे काम काळजीपूर्वक करा
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
‘बी. एल. ओ. प्राध्यापकाचा लोहगावात अपघाती मृत्यू’ ही बातमी, दिनांक १५/०४/२०२६ रोजी वर्तमानपत्रात वाचली. हे प्राध्यापक उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीला जात असताना लोहगावला त्यांचा अपघाती मृत्यू झाला. प्रा. ज्ञानेश्वर रोटे हे वडगाव शेरी या मतदारसंघात बी. एल. ओ. म्हणून कार्यरत होते. तातडीच्या बैठकीसाठी ते दुचाकीवरून निघाले असताना, धानोरी – लोहगाव रस्ता येथील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर त्यांच्याच गाडीवरून घसरले व या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी जीवाला चटका लावून गेली. त्यांचे कुटुंब उघडे पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते अतिशय मनमिळावू आणि चोख कामगिरी पार पाडणारे होते. अतिशय हुशार सहकारी होते. अधिकाऱ्यांच्या सततच्या दबावामुळे ही वेळ त्यांच्यावर आली अशी भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.
अशीच काही स्थिती आमची झाली होती. मी व माझी मैत्रीण मनीषा आम्ही दोघी सुद्धा बीएलओ चे काम देण्यासाठी, फोटो अपलोड करण्यासाठी जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये चाललो होतो. पद्मावती पुणे सातारा रोड येथे पंपिंग स्टेशन जवळ आमची गाडी आली आणि आम्हाला मागच्या हत्ती टेम्पो धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, मी मागच्या मागे उडून खाली पडले. आणि मनीषाच्या गुडघ्याला जबरदस्त लागले आणि तिचा छोटा पाच वर्षाचा मुलगा नशिबाने साईबाबांच्या आशीर्वादाने अगदी अलगद उचलून डिव्हायडरवर ठेवल्यासारखे झाले. मला जागेवरून उठताच येत नव्हते. त्यात मागून एक ट्रक आला. लोकांना असे वाटले की, बाईचे डोके उडवेल. लोकांनी गोंधळ घातला, मी जरा शुद्धीवर आले आणि पटकन माझी मान फिरवली व एवढ्या जवळून ट्रक गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल हा विचार आपण सर्वांनी करावा.
अपघाताची बातमी समजताच, माझी मुलगी व जावई येईस्तोवर तेथील नागरिकांनी डॉक्टर नाईक निंबाळकर यांच्या दवाखान्यात नेले. उपचाराअंती समजले की, पाच मणक्यांना इजा झालेली आहे. आता पूर्ण बेडरेस्ट चार ते पाच महिन्यांसाठी असेल. मी तर खूप घाबरले घरामध्ये अनेक अडचणी होत्या सासूबाई जागेवर झोपून होत्या, सासरे ९४ वर्षाचे होते. कसे होणार काही कळत नव्हते. त्यात अधिकाऱ्यांचे फोन चालूच होते. त्यांना खरी परिस्थिती सांगितली, पण त्यांनी एक माणूस घरी पाठवला. खरंच ही अवस्था माझी आहे का? हे पाहण्यासाठी. आलेला अधिकारी तो अगदी अवघडल्या सोफ्यावर बसला होता आणि म्हणाला” सॉरी मॅडम, त्या सरांनी मला पाठवलय म्हणून मी आलो. मी आपली परिस्थिती डोळ्यांनी पाहिली मी त्यांना रिपोर्टिंग करतो काय करायचे ते.” आणि तो मान खाली घालून निघून गेला.
त्यानंतर बी. एल. ओ.मधून माझी सुटका त्यांनी केली खरी, परंतु त्यावर्षीचे जे मानधन होते, माझ चार-पाच हजार रुपये ते काही त्यांनी दिले नाही. मला बरे व्हायला पाच महिन्यांच्या वर गेले आणि आजही अजूनही मला खाली वाकता येत नाही आणि उभ राहता येत नाही. जिन्यांची चढउतार मी जास्त करू शकत नाही. पण साईबाबांच्या कृपेने मला उभे केले आणि माझ्या घरासाठी मला परत काम करता येऊ लागले हे त्या देवाचे उपकार आहेत. परंतु या अपघाताचा भविष्यात, म्हातारपणामध्ये आम्हाला त्याचा खूप त्रास होणार आहे हे मात्र निश्चित. बी एल ओ प्राध्यापकाचा लोहगाव गावात अपघाती मृत्यू हे वाचून मला आमच्या ‘एक्सीडेंट’ची आठवण झाली आणि म्हणून हा लेख लिहिला.
बीएलओ चे काम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू-भगिनींना एकच सांगावेसे वाटते की काम करा, पण ते प्रेशर घेऊन करू नका. काम तर आपल्याला करायची आहेतच. त्यातून काही आपली सुटका होणार नाही. कोणीही सुटका करू देणार नाही, तर आपणच आपली तब्येत सांभाळून, आपल्या गाडीचा वेग सांभाळून कामाला लागावे. आपल्या मागे आपला संसार आहे, कुटुंब आहे याची जाणीव ठेवून काम करावे. तूर्तास इतकेच..!!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
===========



