ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या भिवापूर शाखेतर्फे संविधान दिन कार्यक्रम उत्साहात
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या भिवापूर शाखेतर्फे संविधान दिन कार्यक्रम उत्साहात
सविता धमगाये, जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
भिवापूर : भारतीय संविधान लागू झाल्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्त्वात मनुस्मृती दहन केल्याच्या मनुस्मृती दहन दिनानिमित्त ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या भिवापूर शाखेतर्फे आयोजित एक दिवसीय कार्यक्रम भिवापूर शाखा अध्यक्ष संगीता गोवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कांतिलालजी भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या प्रांगणात नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रदीप मून हे प्रमुख वक्ता म्हणून तर सुरेंद्र भैसारे, ज्योती भैसारे, उज्ज्वला उके, रंजनाताई वासे आदी वक्ता उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूर्यकांता गेडाम यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्त्वात केलेल्या मनुस्मृती दहनाचा इतिहास, बाबासाहेबांचे संविधान सभेतील प्रवेश, त्यांचे संविधान निर्मितीतील कार्य, हिंदू कोड बिलाची निर्मिती व ते स्वीकृत न झाल्याची कारणे, संविधानात असलेले मूलभूत अधिकार आणि नागरिकांना दिलेले कर्तव्य इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता गोवर्धन यांनी येणाऱ्या नवीन पिढीतील युवक युवतींना समता सैनिक दलात दाखल होण्याची आवश्यकता असल्याचे व त्यांच्यावर योग्य संस्कार देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित इंदुरकर यांनी केले, तर लताताई बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैशाली खंडाळे, अर्चना मोटघरे व इतर समता सैनिकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात तालुक्यातील ग्रामीण भागातील सैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.