सृजन मित्र उद्योजकता विकास प्रशिक्षण
विमलाबाई गरवारे प्रशालेतील उपक्रम
सृजन मित्र उद्योजकता विकास प्रशिक्षण
विमलाबाई गरवारे प्रशालेतील उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे. (दि.31 डिसें): प्रतिनिधी: तरूणांनी नोक-या न मागता, नोक-या देणारे व्हावे, असे विधान करून तरूणांनी उद्योजकतेकडे वळावे, असा सल्ला सार्वत्रिकरित्या समाजातील ज्येष्ठ मान्यवरांकडून नेहमी दिला जातो, परंतु तरूणांना त्यांच्या शालेय वयातच उद्योजकतेविषयी आस्था निर्माण व्हावी, आणि पुढे जाऊन मोठेपणी त्यांनी उत्कृष्ट उद्योजक व्हावे, या उद्देशाने विमलाबाई गरवारे प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांसाठी “सृजन मित्र उद्योजकता विकास प्रशिक्षण” असा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रशालेतील ६० विद्यार्थी यात सहभागी झाले.
एकूण ४० तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना समजेल अशा सुलभ पध्दतीने उद्योजकतेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कार्यक्रमाचे नेटके आयोजन पूर्णपणे विद्यार्थिनींनी केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नगरसेविका व “सकस” उद्योगाच्या प्रसिध्द संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री.उजळंबकर यांनी भूषविले. व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री. भारमळ, उपमुख्याध्यापिका सौ.खिरीड तसेच पर्यवेक्षिका मार्गसिद्धा पवार व मार्गदर्शक रविकांत आदरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माधुरीताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजकतेचे महत्व उदाहरणासह स्पष्ट करून रंजक पध्दतीने सांगितले आणि मुलांच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले. ‘उद्योजकतेचा मूलमंत्र’ या पुस्तकाच्या दोन प्रती त्यांनी यावेळी शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिल्या. सहभागी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनीही आपले प्रातिनिधिक मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. हा संपूर्ण उपक्रम खूपच फलदायी ठरल्याचा अभिप्राय प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी व्यक्त करून अशा उपक्रमांना नक्की चांगला प्रतिसाद मिळेल, असे मत नोंदविले.