Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

“सुपर फोरमध्ये सुपर विजय”; ‘डॅा अनिल पावशेकर’

स्तंभलेखक, क्रीडा समीक्षक, नागपूर

0 4 0 9 0 3

“सुपर फोरमध्ये सुपर विजय”; ‘डॅा अनिल पावशेकर’

स्तंभलेखक, क्रीडा समीक्षक, नागपूर

आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकचा सहा गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. साखळी फेरी पाठोपाठ पाकला पुन्हा दणका देत भारताने पाकवर हुकूमत गाजवली आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गील जोडीने पाक गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत सामना पुन्हा एकदा एकतर्फी केला. पूर्वार्धात आपल्या गचाळ क्षेत्ररक्षण आणि बेरंग गोलंदाजीने पाकला चांगलाच ॲडव्हांटेज मिळाला होता परंतु उत्तरार्धात भारतीय फलंदाजांनी धाडसी फलंदाजी करत पाकला चारी मुंड्या चीत केले.

झाले काय तर सूर्याचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय योग्यच होता आणि पांड्याने झकास सुरुवात पण केली होती. मात्र पहिल्या सामन्यानंतर सूर्याने जी नो शेकहॅन्ड्स पॅालीसी खेळली होती ती या सामन्यात सुद्धा दिसून आली. मात्र यावेळी शेकहॅन्ड्स पाक खेळाडूंसोबत नव्हते तर ते उडलेल्या झेलांसोबत होते. अभिषेक ने दोन तर कुलदीपने एक झेल सोडून प्रारंभी जो दबाव पाकवर निर्माण करता आला असता, तो गमावला. भलेही आक्रमक फखर झमन लवकर बाद झाला परंतु जीवदान मिळाल्याने पाक फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी बुमराह अॅंड कंपनीला ठोकून काढले.

पाकने मागील सामन्यातील चुकांचा बोध घेत यावेळी वेगळी रणनिती आखली होती. अनुभवी फखर झमनला सलामीला धाडले आणि त्यांनी यावेळी बुमराहला लक्ष्य केले होते. कारण मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात हे त्यांना चांगले माहीत होते. बुमराहचा बेरंग होताच पाकने दहा षटकांत नव्वदी ओलांडून चांगली सुरुवात केली होती. अखेर नियमित गोलंदाजांना पाक फलंदाज भीक घालत नाही हे लक्षात येताच सूर्याने पार्ट टाईम शिवम दुबेला आक्रमणाला लावले आणि दुबेने पाक संघाची नांव कशी डुबेल याची काळजी घेतली.

अकराव्या षटकात सईम अयुब बाद होताच पाकची बुलेट ट्रेन चक्क पॅसेंजर गाडी झाली. अकरा ते सतराव्या षटकापर्यंत दुबेसहीत फिरकीपटूंनी अचूक मारा करत पाक फलंदाजांना वेसण घातले. मात्र डावाच्या अखेरीस पाक फलंदाजांनी फटकेबाजी करत धावसंख्या १७१ पोहचवली. अर्थातच ही धावसंख्या नक्कीच चांगली होती आणि यावेळी पाक संघात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफचा समावेश झाल्याने ही लढत मध्यंतरापर्यंत फिप्टी फिप्टी अशी होती. उत्तरार्धात पाक गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांतील जुगलबंदी रंगणार अशी चिन्हे दिसत होती.

मात्र अभिषेक आणि शुभमन जोडीचा इरादा काही वेगळा होता. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूंवर षटकार ठोकत अभिषेकने झिरो टॅालरन्स, नो मर्सी पॅालिसी दाखवून दिली. दोघांनीही पाक गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की करत चोपून काढले. त्याने सहा चौकार आणि पाच षटकारांसह उंच उंच लढत दिली तर शुभमनने खणखणीत आठ चौकार ठोकत पाकचा इंच इंचाचा हिशोब चुकता केला. या दोघांच्या झंजावाताने पाक गोलंदाजीचा पालापाचोळा झाला आणि दहा षटकाच्या आतच भारताने शंभरी गाठली.

खरेतर यानंतर सामन्यातली चुरस निघून गेली होती . भलेही शुभमन, सूर्या, अभिषेक आणि संजू सॅमसन उर्वरित धावा काढतांना बाद झाले परंतु पाकला सामन्यात परतता आले नाही. पाकतर्फे हॅरिस रौफने थोडीफार जिद्द आणि ॲग्रेशन दाखवले परंतु बाकी गोलंदाज म्हणजे चिनी कम होते. जसा आपल्या कडे बुमराह प्रभाव पाडू शकला नाही, तसेच त्यांचा हुकमी गोलंदाज शाहीन आफ्रिदी निष्प्रभ ठरला. तर सईम अयुब, अब्रार आणि अश्रफ हे गोलंदाज अभिषेक शुभमनला शरण गेले.

पाक संघाचे काय चुकले तर त्यांनी फलंदाजीत चांगली सुरुवात करूनही त्याचे मातेरे केले. विशेषतः भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल आणि एक धावबाद ची लयलूट करूनही ते १७१ पर्यंत थबकले. शिवाय त्यांनी ४२% डॅाट बॅाल खेळल्याने स्वतःवर दबाव निर्माण करून घेतला. तर आपले दोन तीन गडी बाद होताच आक्रमक क्षेत्ररक्षण लावून एकेरी धावबंदी करून फलंदाजांची कोंडी निर्माण करता आली असती. तसेच सईम अयुब ऐवजी हॅरिस रौफला लवकर गोलंदाजीला लावले असते तर काही अंशी त्याचा फायदा झाला असता.

आपल्या संघाबाबत बोलायचे झाले तर क्षेत्ररक्षण सुमार होते आणि पहिल्या दहा षटकात पाक फलंदाजांना आपले गोलंदाज काबूत ठेवू शकले नाहीत. तर फिरकीपटू दबाव निर्माण करत असताना अक्षरला केवळ एक षटक दिले गेले. फलंदाजीत अभिषेक शुभमनने धडाकेबाज फलंदाजी केली पण सूर्या, सॅमसन फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मात्र तिलक वर्माने एक बाजू लावून धरत पाकवर सुपर फेरीत सुपर विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

दिनांक २२ सप्टेंबर २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे