पराक्रमी तानाजी
कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, नागपूर

पराक्रमी तानाजी
कोकणात महाडजवळ उमरठे गावात राहणारे ‘तानाजी’ शिवरायांचे साथीदार. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई, दिरंगाई माहितच नव्हती. शिवाय महाराज, जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार, मोठा हिंमतवान गडी! तो अंगाने धिप्पाड होता. ताकदीने भारी होता. बुद्धीने चलाख होता. शिवरायावर त्यांची अलोट भक्ती होती. अजूनही पुरंदरच्या तहात दिलेले तेवीस किल्ले जयसिंगाकडेच होते. त्यातीलच एक कोंढाणा हा मजबूत किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, “शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलाच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे.” शिवरायांचीही तीच तळमळ होती; पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला. शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निवडावे कुणाला ? तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची जोरात तयारी चालली होती. लग्न चार दिवसांवर येऊन ठेपले होते.
तानाजीला वाटले, महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शेलारमामाला सोबत घेतले. तेव्हा शिवराय म्हणाले,”शेलारमामा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या,आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत.” हे ऐकताच तानाजी म्हणाले, “महाराज तानाजी जिवंत असताना असल्या जिवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे !” मला आशीर्वाद द्या.
तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाले. जयसिंगाने कोंढाणा किल्ल्यावर उदेभान हा कडक रजपूत निवडला होता. गडाला दोन दरवाजे होते दोन्ही ठिकाणी मजबूत बंदोबस्त ठेवला होता. तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. तानाजी व त्याचे धाकटे भाऊ सूर्याजी दोन वाटानी निघाले. रातकिडे किरकिरत होते. कडा केवढा उंच वर जाताच त्यांनी दोराचे एक टोक खालच्या झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर कडा चढून गडावर गेले.सूर्याजीने आपल्या मावळयासह कल्याण दरवाजा गाठला.उदेभानला खबर लागली उदेभानचे सैन्य मावळयावर चाल करून आले लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या, ढाली खणाणू लागल्या. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदेभानने त्याच्यावर झेप घेतली दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर.. कुणीही हटेना इतक्यात तानाजीची ढाल तुटली त्यांनी हाताला शेला गुंडाळला शेवटी दोघेही वीर जबर जखमी होऊन धारातीर्थी कोसळले.
तानाजी पडला हे पाहून मावळायाचा धीर खचला, ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत पोहचले. आपला भाऊ पडलेला पाहून सुर्याजीला दुःख झाले. पण ही वेळ दुःख करण्याची नव्हती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला व मावळयांना म्हणाला ” अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे.तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता”. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उडया टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.” घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण तानाजी सारखा शूर मोहरा गेला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळाली त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला शिवराय हळहळले व म्हणाले ” गड आला पण सिंह गेला.” पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. नंतर याच कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ ठेवण्यात आले.
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर
=======



