Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

“उपहासगर्भ विडंबन गांभीर्याने आणि जबाबदारीने करावा लागते”:- भाऊ तोरसेकर

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

“उपहासगर्भ विडंबन गांभीर्याने आणि जबाबदारीने करावा लागते”:- भाऊ तोरसेकर

भगवान दातार लिखित “खमंग-टमंग” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: “अविष्कार किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा सतत जयघोष करणारांनी हे लक्षात ठेवायला हवे की, विचार स्वातंत्र्याबरोबरीनेच जबाबदारीचेही भान तितक्याच गांभीर्याने बाळगावे लागते. विशेषतः उपहासगर्भ विनोद हा दोन गटात संघर्ष पेटेल, दोन राजकीय पक्षात द्वेष पसरेल अशा उद्देशाने केलेला नसावा. विनोदी लेखक, विडंबन करणारे कवी, व्यंगचित्रकार यांना असा निखळ विनोद समोरच्या घटनांमध्ये प्रत्यक्ष समोर दिसतो. म्हणूनच बाळासाहेब ठाकरेंसारखे ध्यंगचित्रकार किंवा आचार्य अत्रेंसारखे विडंबनकार पु.ल. देशपांडेंसारखे विनोदी लेखक यांनी लोकांना खरा आनंद दिला. आजच्या विडंबनकारांनी भांडणं लावणारे, मनं दुखावणारे, व्यक्तीगत आपमान करणारे व्यंग केले तर त्याला विनोद म्हणता येणार नाही. उपहासगर्भ विडंबन गांभीर्याने आणि जबाबदारीने करावे लागते. म्हणूनच भगवान दातार यांच्या निखळ विनोदी आणि निर्वैर राजकीय प्रहसनांचे स्वागत केले पाहिजे ” असे विश्वेषण ज्येष्ठ पत्रकार आणि लोकप्रिय यूट्यूबर, भाऊ तोरसेकर यांनी मांडले.

पत्रकार भगवान दातार लिखित “खमंग-टमंग” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भाऊंच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर ब्रिटीश नंदी म्हणजेच, प्रसिध्द पत्रकार प्रवीण टोकेकर, मेनका प्रकाशनाचे अभय कुलकर्णी आणि लेखक भगवान दातार उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना भाऊ तोरसेकर यांनी आपल्या “प्रतिपक्ष” या यू ट्यूबब चॅनेलच्या माध्यमातून राजकीय विश्लेषणाचा प्रवास उलगडताना अनेक खुसखुशीत किस्से रंगवून सांगितले. मुंबईतल्या मुख्य प्रवाहात पत्रकारितेमध्ये 50 वर्षांचा अनुभव असलेल्या भाऊंनी विविध मान्यवरांच्या सहवासातील आठवणी आणि किस्से यांचा खजिनाच रसिंकांसमोर खुला केला.

आजच्या ईलेकट्राॅनिक माध्यमांतील पत्रकारितेवर आपल्या खास शैलीत रंजक भाष्य करताना घसरत चाललेल्या सामाजिक व राजकीय मूल्यांचा गांभीर्याने परामर्ष घेतला. सकारात्मक आणि नकारात्मक पत्रकारितेमधलं वाढलेलं अंतर सांगताना त्यांनी माध्यमांकडून सामाजिक, राजकीय ट्रॅजिडीची कशी काॅमेडी होऊन जाते, याची अनेक उदाहरणे दिली. विचार स्वातंत्र्यातून नवा विचार पुढे आला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. हल्ली आंदोलने सुध्दा कॅमे-यापुरती होतात. कॅमेरा निघून गेला की आंदोलकही पांगतात! अशाने सच्चे आंदोलन ही संकल्पनाच संपून जाईल. धाडसी पत्रकारितेत स्पष्ट, परखड भाषेचा वापर करून सुध्दा आजपर्यंत आपल्याला कुणाचेही वैर पत्करावे लागले नाही, हे सांगताना त्यांनी निर्वैर विडंबनाचे महत्वं अधोरेखित केले. काही प्रसंगी उत्स्फूर्तपणे विडंबन काव्य कसे सुचते, याचे दाखले देताना “झूम बराबर झूम शराबी” आणि “आओ बच्चो तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्थानकी” या गाण्यावरून लिहीलेल्या विडंबन कविता सादर करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात “खमंग-टमंग” पुस्तकाची प्रस्तावना लिहीणारे प्रसिध्द पत्रकार प्रवीण टोकेकर यांनी आपले मनोगत मांडताना “ब्रिटीश नंदी” या टोपण नावाने लिहीलेल्या आपल्या गाजलेल्या सदर लेखनाचे विविध अनुभव सांगितले. भोवतीच्या वातावरणात सुसंगती शोधणा-यांना जेव्हा विसंगती अनुभवाला येते, तेव्हा विडंबनात्मक लेखनाची निर्मिती होते, असे सांगून त्यांनी तिरकस लेखन करताना काही पथ्य पाळवी लागतात, असे आवर्जुन नमूद केले. ज्याच्यावर व्यंग केले आहे, त्यालाही ते खिलाडूपणे घेता येईल असे लेखन केले तर वैर उत्पन्न होण्याचा प्रश्न येत नाही, विनोद हा मुळातच खूप आनंददायी आणि निर्विष असतो. व्यक्तीगत आपमान करून ओरखाडे काढणारा विनोद हा नवाच ट्रेंड सध्या आला आहे, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. भगवान दातार यांच्या विनोदी लेखन दालनातील प्रवेशाचे त्यांनी मनापासून स्वागत केले.

भगवान दातार यांनी “खमंग टमंग” या फेसबुक पेजला लोकांचा प्रतिसाद मिळाल्याने त्याचे 100 लेख झाल्यावर पुस्तक करण्याचे ठरवले, असे सांगून पुस्तकातील काही खमंग लेखांचा थोडक्यात परिचय करून दिला. प्रकाशक अभय कुलकर्णी यांनी मेनका प्रकाशन परिवाराच्या “जत्रा” मासिकातील वात्रटिका, विनोद, व्यंगात्म लेखनाच्या पार्श्वभूमीवर भगवान दातार यांच्या राजकीय प्रहसनाचे हे “खमंग टमंग” पुस्तक वाचकांच्या हाती देण्याचे ठरवले , असे सांगून दातार यांच्या आगामी गंभीर लेखनास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आला. केतकी दातार हिने सरस्वती वंदना सादर केली. आसामी शाल, श्रीफळ व पुष्प देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, पुस्तक निर्मितीमध्ये सहकार्य केलेल्या व्यक्तींचा या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पत्रकार मल्हार अरणकल्ले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुधीर मोघे यांनी सूत्रसंचालन केले.

गणेश सभागृहात आयोजित या कार्यक्रमास सुप्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ, पत्रकार सारंग दर्शने यांच्यासह अनेक पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. मेनका प्रकावनाच्या स्टाॅलवर खमंग टमंग पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे