भारताचा राष्ट्रीय रंगोत्सव; सौ.सविता पाटील ठाकरे
भारताचा राष्ट्रीय रंगोत्सव
“उत्सव तीन रंगांचा, आज आभाळी सजला..,
नतमस्तक मी त्या सर्वांपुढे, ज्यांनी हा देश घडविला.”
भारतीय प्रजासत्ताक हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. भारताला प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
इतिहासाच्या पानात अधिक खोलवर न शिरता मी फक्त आधुनिक भारताचा इतिहास सांगते.आधुनिक कालखंडाची सुरुवात १६ व्या शतकात झाली, जेव्हा मुघल साम्राज्याने बहुतेक भारतीय उपखंड जिंकले,१८व्या शतकाच्या सुरुवातीला मराठ्यांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे,मुघलांना हळूहळू ऱ्हासाला सामोरे जावे लागले, मुख्यत्वे ब्रिटीश सरकारच्या वतीने एक सार्वभौम शक्ती म्हणून काम करत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने १८व्या शतकाच्या मध्यापासून ते १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत हळूहळू भारतातील प्रचंड क्षेत्रांवर नियंत्रण मिळवले. पहिल्या महायुद्धानंतर , महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी देशव्यापी लढा सुरू केला. आणि १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा झेंडा लाल किल्ल्यावर फडकला.
“भारताच्या तिरंगा झेंड्यातला सगळ्यांत वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे, मधला पांढरा पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे, त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे.” आणि म्हणूनच तर मोठ्या अभिमानाने आपण म्हणतो, ‘प्राणाहूनही प्रिय असे हा आम्हा तिरंगी झेंडा’
त्याग शौर्य अन क्रांतीचा, पाठ केशरी सदा द्यायचा…
रंग पांढरा मध्ये झळकता, म्हणे मनातून हवी शांतता…
हिरव्याची तर एकच आशा, समृद्धीने नटवा देशा…
प्रगती नाही गती वाचुनी, जाणून घ्यावे चक्रामधूनी…
पण…पण… गेल्या ७७ वर्षात स्वातंत्र्याची गोड फळे चाखत असताना, अनेक वाईट घटनांनी भारतीयांच्या मनाला खूप वेदना दिलेल्या आहेत. केरळ मधील भूस्खलन असो की हातरस मधील चेंगराचेंगरी. मणिपूर मधील हिंसाचार असो की दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन. आसाम मधील पूर असो की अधून मधून सीमेवर धारातीर्थी पडणारा जवान. प्रगतीच्या पथावर चालत असताना आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत प्रदूषण, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, सीमावाद ,दहशतवाद, आतंकवाद, धर्मवाद ही आव्हानेही आम्हास पेलायची आहेत. “सारे जहाँ से अच्छा……” हा जरी आमचा इतिहास असला तरी आरक्षण सारख्या विषयावर आज संपूर्ण देश ढवळून निघत आहे. साऱ्या जगाला मोठ्या अभिमानाने एकतेचा संदेश देऊन डौलाने फडकणाऱ्या तिरंगाच्या डोळ्यातून अश्रू गळू नयेत एवढीच साधी अपेक्षा. .
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
कार्यकारी संपादक साप्ताहिक साहित्यगंध



