बंधन; अनिता व्यवहारे
बंधन
अखिल विश्वाला शोभून दिसणारी एकच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्कृती ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. तिचे पारंपारिक पद्धतीने रक्षण करण्यासाठी रूढ झालेले उत्सव आणि ते जोपासण्यासाठी विधात्याने निर्माण केलेली सर्वांगसुंदर कलाकृती म्हणजे स्त्री.
संस्कृतीचे करून जतन,नियमांचेही करिती पालन
मुलाबाळांचे संगोपन, हेच तिचे जीवन…..!
तिच्या जीवनाशीच भारतीय संस्कृती व त्या संस्कृतीतील सण-उत्सव निगडित आहेत. आणि जवळजवळ पन्नास टक्के सण तिच्या रक्षणार्थ करावयाच्या व्रत-वैकल्याचेच असतात. खरंतर विधात्याने निर्माण केलेली सृष्टी आणि तिचा उपभोग घ्यायला त्याने पाठवलेली ही ललना,… की जी निसर्गाला सृजनशील बनवते. एवढच नव्हे तर; दया-क्षमा-शांती यांचा मूलमंत्र देणारी भविष्याला स्वतःच्या ओटीत फुलवणारी भूतकाळाला पदरात झुलव णारी, वर्तमानाला तारणारी अशी युगंधरा निर्मिली तेव्हा परमेश्वराचा हेतू निर्मळ होता पण समाजाने मात्र तिच्या पदकमलात रुढीच्या बेड्या ठोकल्या.
लग्न म्हणजे बंधन नसून तो एक पवित्र संस्कार आहे. दोन अनोख्या जीवांचे मनोमिलन. पण या संस्कारातून स्त्रीचे समर्पणच अपेक्षित. पती म्हणजे आयुष्याचा जोडीदार असे न समजता तो पत्नीच्या समाज हक्काचा राखणदार मानला जातो. मंगळसूत्रा सारखे पवित्र दान आंदण करून तिच्या स्वातंत्र्यावर एक बंधन घातले जाते. आणि एवढं असूनही लग्नानंतर पतीने तिची जबाबदारी स्वीकारण्या ऐवजी तिला त्याच्यासाठी व्रतवैकल्य उपास-तापास करावे लागतात,. .
वडाला सात फेऱ्या मारून सात जन्मी याची सेवा करीन. माझ्या आयुष्या यालाच समर्पित करीन स्वतःचं अस्तित्व दाखवणार नाही तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी कुंकवाचा टिळा कपाळी लाविल ही शपथ तिला घ्यावी लागते.
जाईजुईच्या फुलाप्रमाणे लाघवी आणि नाजूक असं तिचं जीवन. नाजूक काया पण याचं रक्षण करण्यासाठी पती हा एक राखणदार पुरेसा वाटत नाही म्हणून पुन्हा एक निमित्त रक्षाबंधन…! हा सण म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक. पण त्यातूनही परत रक्षणाची याचना. भावाच्या मनगटावर राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे आठवण देण्यासाठीच हा उत्सव. पुढे भाऊबीज तीदेखील बहिणीने भावासाठी करावयाचा एक सोपस्कार. आपल्या संस्कृतीतील हे सर्व व्रतवैकल्य करण ठीक आहे. पण ते सर्व स्त्रीनेच पुरुषांसाठी का करावयाची? अरे, स्त्री ही पुरुषांची गुलाम नसून भागीदार आहेत. साथीदार आहे. इतकंच नाही तर त्याला जन्माला घालण्याचा अधिकार तिचाच आहे.
म्हणजेच संपूर्ण विश्वाचा ती मूलाधार आहे असे असून ही तिचे रक्षण करावे लागतेच ना! पण ही रक्षण करण्याची जबाबदारी समस्त पुरुष वर्गाने स्वतःहून का स्वीकारू नये. आणि जर तसे नसेल तर तिने स्वतः सगळी कर्तव्य पार पाडीत असताना जुलमाचा पिंजरा तोडला आणि आशा आकांक्षा च्या पंखाने उंच उडून विकास केला तर कुठे बिघडले? पण हा समाज या गोष्टीलाही राजी होत नाही. समस्त पुरुष वर्गाने असा विचार करावयास हवा की आपल्या रक्षणार्थ ती व्रत-वैकल्य करते तिच्याकडून आपण राखी बांधून घेतो…मग फक्त तिचेच रक्षण करावयाचे का? समस्त स्त्रीवर्गाचा मी रक्षण कर्ता आहे अशी जाणीव मनामध्ये ठेवावी. मग काय बिशाद आहे आम्हा स्त्री वर्गाकडे मान वर करून पाहण्याची. पुरुष वर्गाचा खरा आधार जेव्हा तिला मिळेल तेव्हाच ती म्हणेल, ‘सुख आले माझ्या दारी, मग काय कमी या संसारी’.
अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=========



