‘साखरपेरणी’ करून मनं जपूया ना एकमेकांची; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘साखरपेरणी’ करून मनं जपूया ना एकमेकांची; सविता पाटील ठाकरे
बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे काव्यपरीक्षण
माझ्या शेजारी राहणाऱ्या सीमाताई म्हणजे, माझं हक्काचं व्यासपीठ. आज त्यांच्याकडे त्यांच्या भावाची मुलगी सुलभा आली तिही तब्बल २६ वर्षांनी..! लहानपणी एकदा पाहिलं होतं मी तिला. त्यानंतर ती आजच दिसली. मधल्या काळात सीमाताई आणि त्यांच्या भावामध्ये आई-वडिलांच्या संपत्तीवरून एवढा वाद झाला की तब्बल वीस ते बावीस वर्ष बहिण-भावाने एकमेकांचं तोंडही पाहीलं नव्हतं.
सीमाताई सर्व सुखदुःख माझ्याजवळ व्यक्त करत होत्या म्हणून, मला सारं काही माहिती होतं. सुलभाच्या येण्याने सीमाताईंचं मन भरून आलं, सुलभाने त्यांच्या हातात तिच्या लग्नाची पत्रिका दिली तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली….’आत्या, तुम्हा बहिण-भावाच्या वादात आम्हा मुलांनी काय पाप केले? तुमच्या हातचे बाशिंगही माझ्या नशिबी नसावं काय?’ ताईंना मी खूप समजावलं. खरं होतं सुलभाचं..! हल्ली आपण पाहतो नात्यातला विसंवाद. लहान-सहान गोष्टीवरून एवढ्या टोकावर पोहचतो की आपण रक्ताच्या नात्यालाही क्षणात विसरतो. पण सारं काही विसरून सुलभाने केलेली ‘साखरपेरणी” मात्र माझ्या मनाला अलगद स्पर्शून गेली.
‘साखरपेरणी’..होय गरज आहे हल्ली तिची. जेव्हा विसंवाद वाढत जातो, तेव्हा जवळ येण्यासाठी कोणीतरी केलेली धडपड म्हणजे ‘साखरपेरणी’ होय. संवादाचा तुटलेला पूल जोडण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे, ‘साखरपेरणी’ होय. बाह्य जगात पहा..राजकीय फायद्यासाठी एका पक्षाने दुसऱ्या पक्षासाठी केलेली असो…निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाघोषणांची मतदार राजासाठी केलेली असो…तो किंवा ती आवडते म्हणून जवळ येण्यासाठी केलेली असो. शेजारीपाजारी गैरसमजातून झालेला विसंवाद जोडण्यासाठी असो.. घटस्फोटासाठी कोर्टात लढणाऱ्या नवरा-बायकोमध्ये कधीकधी न्यायाधीशाकडून सहमती व्हावी म्हणून केलेली असो… ही साखर पेरणीच बऱ्याचदा मनोमिलनाचं कारण ठरते.
पण काय हो?? ही साखर पेरणी वरवरच असावी? ‘किती करू मी तुजसाठी सांग अजून साखरपेरणी’, हा असे गोडवा आतूनी गं, नसेच दिखावा वरकरणी. स्वार्थ, हव्यास, मीपणा यात माणूस एवढा बरबटलाय की रक्ताच्या नात्यांची ही त्याला आठवण नसते. अशी ही ‘साखरपेरणी’ आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेच्या निमित्ताने ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर यांच्याकडून आली. नेहमीप्रमाणे सर्व शिलेदार खूप छान व्यक्त झालेत प्रत्येकाने आपापल्या परीने साखरपेरणी केलीच, तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.
हे सर्व जरी खरं असलं… तरी मला स्वतःला असं वाटतं. नुसती आश्वासनं अन् थापा कशास हव्यात साखरपेरणीतून?? जरा हृदयाच्या गाभाऱ्यातून येऊ द्या ना खरे मधुर बोल.. बुद्धी व वाणीच्या जोरावर तर सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव श्रेष्ठ ठरलाय, मग त्या वाणीतून ‘साखरपेरणी’ करून मनं जपूया ना एकमेकांची…!! मनाने श्रीमंत असणारी माणसे ही वंदनीय असतात याचा विसर पडू नये ऐवढीच अपेक्षा… तूर्तास ऐवढेच..!!! भेटू या पुढील काव्यपरीक्षणाच्या निमित्ताने…!!
सौ.सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह



