विजिटिंग कार्ड
डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’ ता. जिल्हा नागपूर

विजिटिंग कार्ड
“रामापेक्षा मोठं रामाचं नाव” कहते हैं राम से बड़ा राम का नाम है. ही म्हण केवळ धार्मिक अर्थापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी आयुष्याचं एक गहिरे सत्य सांगते. माणसाची खरी ओळख त्याच्या चेहऱ्यामुळे नाही, तर त्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कार्यामुळे घडत असते. चेहरा काळाच्या ओघात विस्मरणात जातो; पण कर्मातून घडलेलं नाव मात्र स्मरणात कोरलं जातं. सर्वांनाच प्रत्येक चेहरा लक्षात राहतो असं नाही. पण एखाद्याचं नाव, त्याच्याशी जोडलेली कामगिरी, अनुभव किंवा वागणूक, हे मात्र ठसठशीतपणे लक्षात राहतं. म्हणूनच म्हणतात, नाव घडवणं हे आयुष्यभराचं साध्य असतं.
आम्ही डॉक्टर मंडळी हे रोजच्या अनुभवातून प्रकर्षाने पाहतो. बाहेर वेटिंगमध्ये कुणीही आलं की, तो आपला परिचय देतो. एखाद्याला वैयक्तिक भेट घ्यायची असेल, तर तो आपलं विजिटिंग कार्ड आत पाठवतो. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीच्या आधी त्याचं नाव आत येतं. चेहरा बाहेर असतो, पण नाव आणि कामाचं कार्ड आधीच आपल्या हातात असतं. त्या नावाकडे पाहून, त्याच्या व्यवसायाकडे, पदाकडे, ओळखीच्या स्वरूपाकडे पाहून—त्याला आत घ्यायचं की नाही, हे ठरवलं जातं. म्हणजेच, त्या क्षणी निर्णय चेहऱ्यावर नाही, तर नावावर घेतला जातो.
“विजिटिंग कार्ड” हे केवळ कागदाचा तुकडा नसतो. ते एखाद्याचं नातं, व्यवसाय, ओळख आणि गांभीर्य यांचं प्रतिबिंब असतं. कार्डवर कोरलेलं नाव, त्याची डिझाईन, फॉन्ट, कागदाची गुणवत्ता हे सगळं त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतं. नीट, साधं पण दर्जेदार कार्ड असणं म्हणजे “मी स्वतःला आणि माझ्या कामाला गांभीर्याने घेतो” असा मूक संदेश देणं होय.
मला स्वतःला विजिटिंग कार्ड्सचा विशेष छंद आहे. आजही मी अनेक वर्षांची कार्डं जपून ठेवलेली आहेत. ती सगळीच सुंदर आहेत म्हणून नव्हे, तर त्यावर दिलेलं नाव, पत्ता, कार्याचं स्वरूप, मोबाईल क्रमांक हे सगळं एक स्मृती ठरून राहतं. सगळेच नंबर आपण मोबाईलमध्ये सेव करू शकतो असं नाही. पण कधी अचानक एखाद्या व्यक्तीची आठवण झाली, किंवा एखादं काम पडलं, तर ते कार्ड हातात आलं की लगेच संपर्क साधता येतो. त्या कार्डासोबत आठवणीही जाग्या होतात.
याबाबत एक छोटंसं उदाहरण सांगावंसं वाटतं. काही वर्षांपूर्वी एका साध्या, पांढऱ्या रंगाच्या कार्डावर फक्त नाव, व्यवसाय आणि मोबाईल नंबर असलेलं कार्ड मला मिळालं होतं. कोणतीही भपकेदार डिझाईन नाही, पण अक्षर नीट आणि माहिती स्पष्ट. अनेक वर्षांनंतर एका कामानिमित्त त्या व्यक्तीची आठवण झाली. मोबाईलमध्ये नंबर नव्हता, पण ते कार्ड आजही फाईलमध्ये सुरक्षित होतं. फोन लावला, काम झालं, आणि त्या व्यक्तीने म्हटलं “डॉक्टर, एवढ्या वर्षांनीही तुम्ही माझी आठवण व माझं कार्ड जपून ठेवलंत?”
त्या क्षणी जाणवलं कार्ड जपलं गेलं होतं, पण खरं तर नाव जपलं गेलं होतं.
आजच्या काळात डिजिटल विजिटिंग कार्ड्स आले आहेत. एक छोटासा QR कोड स्कॅन केला, की संपूर्ण माहिती मोबाईलमध्ये सेव होते नाव, पत्ता, नंबर, ई-मेल, वेबसाईट, सगळंच. काळ बदलतो आहे, माध्यमं बदलत आहेत; पण ओळखीचं महत्त्व मात्र तसंच आहे. कागदी कार्ड असो वा डिजिटल—नाव आणि कामाची गुणवत्ता हीच खरी ओळख ठरते. जग पुढारलेलं आहे, त्यामुळे आपणही पुढारलेले व्हायला हवं. तंत्रज्ञान स्वीकारताना, माध्यमं बदलताना, एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी.
“चेहरा विसरला जातो, पण नाव लक्षात राहतं,
आणि नाव टिकतं ते केवळ उत्तम कार्यामुळे.”
डॉ. राजेश चंद्रकांत काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
=======



