संगीतमय रोमांचक ‘विजय गाथा’
संस्कार भारती व पवित्रम् संस्थेचा उपक्रम
संगीतमय रोमांचक ‘विजय गाथा’
संस्कार भारती व पवित्रम् संस्थेचा उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.दि.10ऑ (प्रतिनिधी) संस्कार भारतीची “साहित्यविधा शाखा” आणि “पवित्रम् संस्था” प्रस्तुत विजय गाथा हा मंचीय संगीतमय रोमांचक कार्यकम स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने नुकताच सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ संस्कारभारतीचे अध्यक्ष पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आला. संस्थेच्या सचिव मैत्रेयी बापट यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय विचारांचा प्रसार कलेच्या माध्यमातून करण्याचा संस्कारभारतीचा उद्देश स्पष्ट केला. “पवित्रम्” संस्थेचे सचिव डाॅ.सुजित निलेगावकर यांनी कार्यक्रमाची भूमिका मा॔डून व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देणा-या त्यांच्या “पवित्रम् ॲप” ची माहिती दिली.
कारगिल युध्दची ही ‘विजय गाथा’ कारगिलची भूमी आपली आत्मनिवेदनातून मांडते आहे,अशा सूत्रातून देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून उलगडण्यात आली. पाकीस्तानी सैन्याचे क्रौर्य आणि त्यावर कॅ. विक्रम बात्रासह त्यांच्या संपूर्ण चमूचे शौर्य यांची ही शब्द चित्रमय रोमांचक कहाणी “युधस्य कथा रम्यः” अशी प्रभावीपणे प्रस्तुत झाली. आनंद भूवन, जय हिंद, सरणार कधी रण, वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्, अजिंक्य भारत अजिंक्य जनता, उत्तुंग आमुची उत्तर सीमा, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, ही लोकप्रिये गाणी रसिकाःच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सादर झाली. “जयोस्तुते” प्रार्थनेने या संगीतमय कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संहिता लेखन अक्षय संत आणि स्वानंद गोडबोले यांनी केले होते. सादरकर्ते कलाकार होते,प्रांजल, सिध्देश,नेहा,पार्थ, श्रीया, स्वरदा, श्रीजा, ओंकार आणि अनय. प्र.ल.गावडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास संस्कार भारती आणि पवित्रम् संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.



