Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

राग… अनुरागाकडे..!

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

0 5 7 4 4 8

राग… अनुरागाकडे..!

‘नाकावरच्या रागाला औषध काय?’ हे बालगीत लहानपणी अनेकदा ऐकले होते. तेव्हा नाकावरचा राग म्हणजे नेमके काय, हे कळत नव्हते. पण कालांतराने अनुभवाने समजले की, ‘नाकावरचा राग म्हणजे क्षणात रागावणे आणि तितक्याच क्षणात शांत होणे.’ खरे तर ‘राग ही माणसाची नैसर्गिक भावना आहे.’ परिस्थिती मनासारखी घडली नाही, अपेक्षाभंग झाला, अपमान झाला, अन्याय झाला किंवा भावनिक वेदना झाल्या की राग उफाळून येतो. कधी तो अगदी क्षुल्लक कारणावरून येतो, तर कधी मोठ्या प्रसंगातून जन्म घेतो. काही वेळा ‘हा राग लटकाही असतो. प्रिय व्यक्तींमध्ये छोट्याशा कारणावरून रुसवे-फुगवे होतात. मग तो राग आहे की अनुराग, हेच कळत नाही. अशा वेळी प्रेमाचा ओलावा रागाचे रूपांतर आपोआप अनुरागात करतो.

परंतु प्रत्येक राग असा नसतो. काही राग इतका तीव्र असतो की तो आगीसारखा भडकतो. त्या आगीत कधी माणूस स्वतः जळतो, तर कधी दुसऱ्यालाही जाळतो. शेवटी तो स्वतःचाच शत्रू बनतो. माणसाचे एक वैशिष्ट्य आहे. ‘प्रेम व्यक्त करायला तो महिने-वर्षे घालवतो; पण राग व्यक्त करायला क्षणभरही वेळ लावत नाही.’ रागाच्या भरात उच्चारलेले शब्द तलवारीपेक्षाही धारदार असतात. ते शरीरावर नाही, तर थेट मनावर घाव घालतात. उलट ‘प्रेमाने, आपुलकीने आणि आधाराने बोललेले शब्द जखमी मनालाही उभारी देतात’. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. प्रश्न समजण्यात चूक होते आणि उत्तरही चुकीचे मिळते. आपल्याला वाटते की गुंता सुटला; पण प्रत्यक्षात तो आणखी वाढत जातो आणि नात्यांमध्ये नवीन गाठी पडतात.

आयुष्यात दिसते तेच संपूर्ण सत्य नसते. हे समजण्यासाठी अनुभवाची शिदोरी लागते. ‘काही जण राग आला की थोडा वेळ अबोला धरतात’; पण काहीजण कायमचेच नाते तोडून टाकतात. त्यातून कोणाचेच भले होत नाही. राग जिंकतो आणि माणसे हरतात. रागाच्या बाबतीत माझे एक वेगळेच अनुभवविश्व आहे. शक्यतो मला राग येत नाही; पण कुणाच्या शब्दांनी मन दुखावले, तर मी लगेच व्यक्तही होत नाही. ते शब्द मात्र मनाच्या खोल कप्प्यात कायमचे घर करून राहतात. विशेषतः आपलीच जवळची, जीवाभावाची माणसे रागाच्या भरात नकळत काही बोलून जातात, तेव्हा रागापेक्षा दुःख अधिक होते. कारण, परक्यांच्या शब्दांपेक्षा आपल्या माणसांच्या शब्दांची जखम खोल असते. ती काळाच्या ओघातही भरून येते, पण तिची वेदना मात्र मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते.

अलीकडे व्हॉट्सअॅपवर एक सुंदर विचार वाचला. नव्याने घरी आलेल्या सुनेला सासूबाई सांगतात, “कोणावर राग आला तर तो लगेच व्यक्त करू नकोस. चोवीस तास थांब. मग पुन्हा विचार कर.” किती सुंदर संस्कार! त्या चोवीस तासांत रागाचा पारा आपोआप उतरतो आणि निर्णय अधिक संयमाने घेतला जातो. म्हणूनच जिभेवर नियंत्रण, मनात संयम आणि रागावर अंकुश आवश्यक आहे. कारण आपल्या शब्दांनी दुसऱ्याच्या हृदयाला तडा जाऊ नये. शब्द आपले असले तरी त्यांचा अर्थ काढणारे दुसरे असतात. अर्थाचा अनर्थ झाला की गैरसमज निर्माण होतात आणि त्यातूनच राग जन्माला येतो. स्वप्ने पूर्ण झाली नाहीत म्हणून रडत बसायचे नसते; रंग उडाले म्हणून चित्र फाडायचे नसते. त्याचप्रमाणे, एखाद्या क्षणिक रागासाठी आयुष्यभराची सुंदर नाती तोडायची नसतात. शेवटी एवढेच सांगेन..’आयुष्य खूप लहान आहे, ते महान बनवायचे असेल तर राग टाळा, प्रेम वाढवा आणि प्रत्येक नात्यात अनुरागाची फुले फुलू द्या. कारण राग सुख हिरावून घेतो; पण अनुराग जीवनाला आनंद, समाधान आणि मोद देतो.

“रागाच्या ज्वालेत नाती जळून जातात
अनुरागाच्या सरींनी ती पुन्हा फुलून येतात,
संयम, प्रेम आणि क्षमेची धरू या साथ
सुख-समाधान उजळवेल जीवनाची वाट”

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे