हिंदू देवता: शोध, चिंतन व स्वैर कल्पना विलास
डॉ. अविनाश प . परांजपे. वानाडोंगरी, जि.नागपूर

हिंदू देवता: शोध, चिंतन व स्वैर कल्पना विलास
मी मागील लेखात क्रमांक 9 ते क्रमांक 27 असे देवांचे प्रकार विदित केलेत. पुन्हा एकदा विवेचित करितो की हे व ह्यातील प्रत्येक प्रकार हा यासाठी देव मानला आहे, की त्या त्या प्रकारात ‘दिव्यत्व‘ आढळते. ज्यात दिव्यत्व आढळले तो ‘ देव’ असे समजल्या गेले. देव म्हणजे ईश्वराचा अंश, पूर्ण ईश्वर नाही.
28.मानवास उपयुक्त फळझाडे:- आंबा, नारळ, केळी [कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार]
29.जीवाच्या भयामुळे (मृत्यु )म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार –(मारू नये म्हणून कृतज्ञता) :- नाग, (गरुड), वाघ, सिंह
30.अभ्यास, संशोधन ,या नंतर सजीवांच्या उत्क्रांतीचे ज्ञान प्राप्त झाल्यावर सृष्टीचे मूल उगमस्त्रोत व त्यांतील नैसर्गिक बदल व मानवी उत्क्रांतीचे पाऊल दर्शविणारे उत्तुंग व्यक्तिमत्व, कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार:- दशावतार [मत्स्य,(जलचर ), कूर्म(जल+भूमिचर ), वराह(कर्दमचर ), नृसिंह (मानवपूर्व अर्धमानव ) , वामन( खुजा मानव ) , परशुराम (पूर्ण मानव + प्रगति संशोधक ) ,राम (पूर्ण मानव + आदर्श सुसंस्कृत समाज ), कृष्ण (पूर्ण मानव + नैतिकता गमावलेला हिंस्त्र समाज ), बुद्ध( पूर्ण मानव + शांतीची आवश्यकता असलेला समाज ), कल्की(भविष्य कालीन समाज ) ].
३१. अभ्यास, संशोधन यानंतर मूल कणांचे ज्ञान प्राप्त झाल्यावर सृष्टीचे मूल कण, कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार:-– ब्रम्हा, विष्णु, शिव [महेश]
३२. अभ्यास, संशोधन ,या नंतर ज्ञान प्राप्त झाल्यावर सृष्टीतील मूलशक्तीस्त्रोत, कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार:- आदिशक्ती – हिचे मुख्यत:
तीन रुपात त्रिभाजन केलेले असावे.
अ ) महाकाली,- [ महेश – महेश यांच्यातील आकर्षण शक्ती (Force to make and keep bunch of protons )
ब) महालक्ष्मी,- विष्णु व महेश यांच्यातील
आकर्षण शक्ती (Force of Attraction between Electrons and protons),
क) महासरस्वती -.गुरुत्व शक्ती (embedded force in neutrons) ]
३३. आत्मशक्ती, कृतज्ञता म्हणून त्यांच्यात ईश्वरी अंश आहे हा विचार :- परमात्मा , जीवात्मा.
माझ्या चिंतनानुसार, उपरी निर्देशीत तेहतीस प्रकारांमधील ज्या ज्या प्रकारातील, ज्या ज्या स्वरूपाचे अस्तित्व निरनिरळ्या व्यक्तींना ज्या ज्या ठिकाणी अनुभवास आले किंवा त्याची जाणीव संवेदना अनुभवता आली , त्याला त्या त्या स्वरूपाचा दैवी साक्षात्कार झाला असे वाटून त्या त्या व्यक्तींनी ते ते स्वरूप आणि ठिकाणा बाबत इतरांस सांगून प्रसिध्दी पसरविण्याचे आरंभिले. तसेच त्या त्या स्वरूपास स्वतःचे आवडीच्या नावाने संबोधले. या व्यक्तीस आलेला प्रत्यय आपणासही यावा म्हणून इतर मंडळी त्या त्या स्थळी जाऊन आपणासही साक्षात्कार व्हावा म्हणून आराधना करू लागली. या प्रकारे संपूर्ण भारत खंडात अनेकानेक देवस्थाने, तीर्थस्थाने, मंदिरे, निर्माण झाली. तसेच साधू, बाबा , महंत, वगैरे खऱ्या खोट्या लोकांची रेलचेल सुरु झाली.
यातील क्रमांक १४, १८,२० व 3० मध्ये उल्लेखलेल्या प्रकारांचे पुढे मूर्तीपूजेत रुपांतर होऊन तद्नंतर मूर्तीपूजाच हाच धर्म आहे असे मानले जाऊ लागले असे माझे मत आहे. तसेच क्रमांक ५ , ६ ,१४ यां मध्ये उल्लेखलेल्या प्रकारांचे परिवर्तन पुढे व्य्क्तीपुजेत झाले.या व्यक्तीपुजेचे स्वरूप आणखी पथभ्रष्ट होत होत भोंदू बाबागिरी,भोंदू साधूगीरी मध्ये होऊन, माझ्या मते संपूर्ण तर्कशास्त्रावर, तात्विक व वैज्ञानिक संशोधनावर व कृतज्ञता तत्वावर योजलेला कर्तव्या वर श्रद्धाधारित हिंदुधर्म हा सद्य घडीला अंधश्रद्धा युक्त बजबजल्या स्वरुपात ईतर धर्मियांच्या समोर उभाठकालेला आजमितीस दिसत आहे.
आपण जरा व्यापक प्रमाणावर या ‘ मूर्तिपूजा ’ नावाच्या मानसिकतेवर विचार केला आणि माहिती गोळा केली तर आपल्याला आढळेल की ‘दक्षिण आशिया ‘ खंडातील जनसमूहाची मानसिकता ही “ निर्गुण – निराकार ” या प्रकारच्या परमेश्वरी स्वरुपाच्या बाबतीत जरा न- कारात्मकच आहे. या भू-भागातील लोकांना ईश्वराची प्रार्थना करण्या पूर्वी, डोळ्यांसमोर काहीतरी आकृती लागतेच लागते. मग तो जन समूह कोणत्याही धर्म, पंथ,सेमिटीक रिलीजनचा असो. आता बघाना, मूर्तिपूजा न मानता स्वत:ला “मूर्तीभंजक” किंवा “बुत शिकन” समजणारे मुस्लिम समाजातील काही लोक, नुसत्या मशिदीतील सपाट भिंतीपुढे प्रार्थना/ नमाज पढणे, या मध्ये अल्लाहचे दर्शन होत नाही, अल्लाह दिसत नाही,कदाचित यामुळे , निदान डोळ्यासमोर ‘अल्लाह चे नेक बंदे’ यांच्या दिसणार्या मृत व्यक्तीच्या थडग्यालाच “दरगाह, “मझार” मानून त्यावर चादर चढविणे, या सारखे ईश्वराचे लाड करण्याची तहान भागवतात.
तसेच ख्रिस्ती धर्माचे काही लोक मूर्तिपूजा न मानणारे असून, चर्चमध्ये कृसावर चढवलेल्या भगवान येशूची प्रतिमा मात्र डोळ्यासमोर आवश्यक मानतात. आयुष्यभर मूर्तिपूजेस विरोध करणार्या भगवान गौतमबुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच पुतळे, मूर्ती, प्रतिमा, बनवून त्याचीच पूजा करणारे बौद्ध धर्मीय बघा. या भू-भागातील लोकांना ईश्वराची प्रार्थना करण्या पूर्वी, डोळ्यांसमोर काहीतरी आकृती लागतेच लागते. ही मानसिकता या भागातील सर्वधर्मीय लोकांचीच आहे हे नक्कीच पटते. असे विचारांती वाटू लागते.
डॉ. अविनाश प . परांजपे.
वानाडोंगरी, जि.नागपूर
========



