0
4
8
3
0
0
उसनवारी
आभाळच फाटलंय तर
लावू कुठं तरी ठिगळं
भुकेनं व्याकूळ लेकरं
संपल्यागत वाटे सगळं
भुकेची आग मस्तकाला
जाताच होते म्हणे क्रांती
पोटात अन्न रे नसताना
कशी लाभेल रे मनःशांती
उसनवारी करून पैशाची
कर्जाचा वाढलाय डोंगर
कोरभरच भाकर पिठाची
त्यातही मिसळून गोंडर
गोंडराला फाकडून सुपानं
स्वप्नं सुखाची रंगवी माय
तारेवरची कसरत करून
मुखात कशी भरवी साय ?
कष्टाला मधुर लागली फळं
प्रज्ञासूर्याने केलाय रे उद्धार
निर्धन,दुर्बलांचे वाढवा बळ
बा भीमाशी रे न होता गद्दार
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========
0
4
8
3
0
0



