नागपूर विभागीय तंत्र प्रदर्शनी 2026 यशस्वी उद्घाटन सोहळा
नागपूर शहर प्रतिनिधी
नागपूर विभागीय तंत्र प्रदर्शनी 2026 यशस्वी उद्घाटन सोहळा
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि २८) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली राज्यभर जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या तंत्र प्रदर्शनी उपक्रमाचा एक भाग म्हणून आज नागपूर विभागीय तंत्र प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या प्रदर्शनीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून एकूण ४८ मॉडेल्सचा सहभाग होता. इंजिनिअरिंग, नॉन- इंजिनिअरिंग आणि इनोव्हेटिव्ह या विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांनी “इंडस्ट्री बेस्ट चॅलेंज” या संकल्पनेवर आधारित उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण मॉडेल्स सादर केले मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली तांत्रिक कौशल्ये आणि नवकल्पना सादर केल्या. या प्रदर्शनीचे उद्घाटन पी. मोहन अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन हिंगणा यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पि.टी. देवतळे सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय नागपूर हे होते. कार्यक्रमाला मोहित देशपांडे (STRIVE HR Head), अरुण लांजेवार, योगेश खेराडे, सुमित डबरासे, रुपेश माकडे तसेच संस्थेच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी, उपप्राचार्या श्रीमती पंडिले, जिल्हा व्यवसाय शिक्षण निरीक्षक लाकडे साहेब व शंभरकर (DVO वर्धा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व उत्कृष्ट मॉडेल्सचे कौतुक करत देशासमोरील सध्याच्या आव्हानांचा विचार करून इनोव्हेटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह आणि इंडस्ट्री-ओरिएंटेड प्रकल्प विकसित करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी स्टार्टअप, स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प उभारून देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. या स्पर्धेतून उत्कृष्ट नऊ मॉडेल्सची निवड करण्यात येणार असून ती राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व अधिकारी,सर्व गटनिदेशक NSS कार्यक्रमाधिकारी, शिल्पनिदेशक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच विभागातील विविध संस्थांमधून आलेल्या शिल्पनिदेशक व विद्यार्थ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. नागपूर विभागीय तंत्र प्रदर्शनीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य, सर्जनशीलता आणि नवोन्मेषी विचारसरणीचा उत्कृष्ट प्रत्यय देत भविष्यातील तंत्रज्ञ भारताची झलक साकारली. सहदेव चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.



