Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

जुनं फर्निचर…. की घराचा आत्मा?

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

0 5 1 6 5 2

जुनं फर्निचर…. की घराचा आत्मा?

दोन वर्षांपूर्वी मी सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर ‘सिनिअर सिटीझन’ ही पदवीही मिळाली. आतापर्यंत मिळालेल्या पदव्या कागद, मेडल किंवा शो पीस पुरत्या मर्यादित होत्या. पण ही पदवी मात्र ‘२४ तास सोबत घेऊनच मिरवावी लागते!’ घरात, बाहेर, कार्यक्रमात ‘आजी, दादी नानी’ अशा हाका… त्यातला आदर, आपुलकी मनाला सुखावतो. पण कधी ‘नकळत येणारी सहानुभूती’ मात्र मनाला चुटपुट लावून जाते. काम काहीच नाही… मग दिनक्रमही ठरलेलाच..! लवकर निजा, लवकर उठा, योगा करा. चहा-नाश्त्यापूर्वी गोळ्या घ्या, देवपूजा उरका… आणि मग टीव्हीकडे मोर्चा!

अशाच एका दिवशी टीव्हीवर चॅनेल बदलताना ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट दिसला. नावच इतकं बोलकं की पाहण्याचा मोह आवरला नाही… आणि खरंच, हा चित्रपट मनाला भिडून गेला. ‘जुनं फर्निचर’ हा ‘महेश मांजरेकर’ लिखित व दिग्दर्शित कौटुंबिक आणि भावनिक चित्रपट आहे. त्यांच्यासोबत मेघा मांजरेकर, भूषण प्रधान, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये यांसारख्या दमदार कलाकारांची फळी आहे. “७० वर्षांचे गोविंद पाठक… साधं, निवांत आयुष्य जगणारे गृहस्थ. पण पत्नीच्या आजारपणात मुलाच्या निष्काळजीपणामुळे तिचं निधन होतं…” आणि ‘इथून सुरू होतो एका बापाचा वेदनादायक पण ठाम प्रवास.’

स्वतःच्या मुलाविरुद्धच ते कोर्टात खटला भरतात. सूडासाठी नाही, तर स्वतःच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी!’ समाजाची टीका, नात्यांची गुंतागुंत आणि वृद्धापकाळातील एकाकीपणा. या सगळ्यांवर प्रकाश टाकत हा चित्रपट पुढे सरकतो. पुढे काय होतं…? हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहणंच योग्य! जुनं म्हणताय आम्हाला, पण अनुभवांचीच शिदोरी, आयुष्यभर जपली नाती, तीच आमची खरी संपत्ती भारी…!! आज अडगळ वाटतो आम्ही, उद्या आठवणीत राहू,
जुनं फर्निचर नाही आम्ही घराचं मूळच आहोत, हेच सांगू…!

या चित्रपटातील अनेक प्रसंग आपल्याच आयुष्याशी मिळतेजुळते वाटतात. “जुनं फर्निचर” हे नाव जरी साधं असलं, तरी त्यामागचा अर्थ फार गहिरा आहे. आजची पिढी ज्या गोष्टींना ‘जुनं’ म्हणून बाजूला करते. त्याच गोष्टींमध्ये अनुभव, मूल्य आणि आयुष्याचं सार दडलेलं असतं….!

‘जुनं असलं तरी सोनं असतं’
‘आठवणींचं ते माणिक असतं…’
‘नाती जपा, माणसं जपा’
‘त्यातच आयुष्याचं खरं धन असतं…’

हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर विचार करायला भाग पाडतो. आपण आपल्या घरातल्या ‘जुन्या फर्निचर’कडे कसं पाहतो? नव्या पिढीनेही हा चित्रपट नक्की पाहावा. कारण “Old is Gold” ही केवळ म्हण नाही, तर ‘जगण्याची जाणीव आहे.’ आज आपण ज्यांना ‘जुनं फर्निचर’ म्हणून कोपऱ्यात ठेवतो, तेच कधीकाळी या घराचा आधारस्तंभ होते…हेच विसरतो. त्यांच्या कष्टांनी, त्यागाने आणि अनुभवांनीच हे घर उभं राहिलं आहे. हे ही विसरतो. काळ बदलतो, पिढ्या बदलतात…; पण नात्यांची ऊब आणि माणुसकीची किंमत कधीच बदलू नये. ‘आज ते आपल्या आधाराला आसुसलेले आहेत, उद्या हीच वेळ आपल्यावर येणार आहे’. हा साधा विचार जरी मनात ठेवला, तरी ‘अनेक नाती तुटण्यापासून वाचतील.’

‘जुनं’ म्हणून जे बाजूला सारलं जातं, ‘त्यातच आयुष्याचा खरा गाभा दडलेला असतो’. कारण, जुनं फर्निचर कधीच अडगळ नसतं, ते घराच्या इतिहासाचं, आठवणींचं आणि प्रेमाचं जिवंत प्रतीक असतं! आणि हे तुम्हांला तो चित्रपट पहिल्यावर नक्की समजेल.. आणि “Old is Gold” ही केवळ म्हण नाही तर ती ‘जगण्याची जाणीव’ आहे.. ‘मी पाहिला तुम्ही पण नक्की पहा…!’

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे