चैत्र चैतन्य तेजाळताना
वृंदा (चित्रा) करमरकर ता. जिल्हा सांगली

चैत्र चैतन्य तेजाळताना
“चैत्र मास हा आला आला
रंग बसंती उधळीत आला.”
खरंच चैत्राचं चैतन्य काही आगळंच असतं नाही? नवी पालवी, नवा मोहोर, नवी फुलं आणि साऱ्या सृष्टीलाच नवेपणाचा भरजरी शेला पांघरतच चैत्रमास पृथ्वीवर पदार्पण करतो. शिशिरातील पानगळीचा शाप विदग्धपणे सोसून सृष्टी राणी कोमेजलेली असते. पाना-पानांचा पांघरलेला शेला या शिशिराच्या दाहक फटकाऱ्यानं छिन्नभिन्न झालेला असतो. साऱ्या सृष्टीचा अगदी थरकाप उडालेला असतो. पण, ‘चैत्र येतो आणि येताना ऋतुराज वसंताला घेऊन येतो’. वसंतराजा चैतन्याच्या उर्मींनी सृष्टीराणीला कवेत घेतो. तिच्या आरस्पानी देहलतेवर पर्णपिसाऱ्यांचे, फुलांचे तुरे खोवत हा वसंत राजा येतो. सारी सृष्टी जणू कात टाकते. कोकिळ आलापांवर आलाप घेत असतो.
लाल चुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर डुलत असते. उन्हात चमकताना जणू फुलांचे लाल लाल मणी झळकत असल्यासारखे वाटते. चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते. आजून जरा वेळ असतो फुलं फुलायला पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात. बहावा सोनपिवळ्या फुलांचे गुच्छ अंगभर लपेटून सजलेला असतो. पळस, पांगार, लाल केशरी फुले ल्यायलेले असतात. फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.! केशरी देठांची प्राजक्त फुले,जाई जुई चमेली, मोगरा, मदनबाण, नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करीत असतात.
या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीची झुडपं, लाललाल आणि पिवळ्या,केशरी व पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्या छटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात. आपण हिला घाणेरी म्हणतो, पण गुजरात, राजस्थानमध्ये या फुलांना “चुनडी” म्हणतात. तिथल्या स्त्री पुरुषांचे कपडेही असेच चटकदार रंगांचे असतात. हिरव्या रंगांच्या तर किती छटा. जणू त्या अनामिक चित्रकाराने मनापासून निसर्गदेवीला रंगगंधानी सजवले आहे. त्यासाठी नानाविध रंग आणि मदहोश सुगंधाचा मुक्तहस्ते वापर केला आहे.
ऋतुराजानं येतानाच वृक्षवेली, फुलाफुलांवर, पर्णसंभारावर , मेहेरनजर फिरवल्यानं निसर्गाचा नूरच पालटतो. आंब्याचा मोहोर, कडुलिंबाची इवलाली फुलं, त्यांचा गोड वास वातावरणात भरून राहतो. म्हणूनच हा मधुमास असतो. निसर्गातली रंगपंचमी अगदी भरास येते. या रंगबावऱ्या बसंती रंगांनी स्त्री मनं रंगली नाहीत तरच नवल..! त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. दारी चैत्रांगणं रेखली जातात. निसर्गातल्या रंगपंचमीचे उरलेले रंग या रंगवल्या रंगवून सोडतात.
घरोघरी “ चैत्रागौरी” देवघरात झुल्यावर विराजमान होतात. मग सुवासिनींची हळदीकुंकवाची गडबड सुरु होते. गौरीपुढे आकर्षक आरास मांडली जाते. कैरीचं पन्हं, कैरीची डाळ, कधी ऊसाचा रस, त्याबरोबर मटकीची उसळ, चकली, लाडू , करंज्या केल्या जातात.आलेल्या सुवासिनींना ते देऊन अत्तर लावतात, गुलाबपाणी शिंपडतात. खाणं झालं कि ओल्या हरभऱ्यानं ओटी भरतात.
वसंतोत्सवाचा रंगच न्यारा! त्यामुळं माणसांची निसर्गाशी नाळ घट्ट जुळते. मनामनातील “हिरवाई” जपण्यासाठी या वनराईची जपणूक करायला हवी. हाच महामंत्र हा चैत्रमास सर्वांना देतो. खरंच साऱ्या सृष्टीत ही रंगोत्सवाची अदाकारी करणारा हा चैत्रमास महान कलाकारच आहे. मनातली तरुणाई जपता जपता निसर्गातील हिरवाई जपण्यासाठी, निसर्गात आनंदाची उधळण करण्यासाठीच सर्वजण वर्षाच्या गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत करतात. निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याची वीण आणखी घट्ट करत कडुनिंबाच्या अमृतरसाचं महत्व अधोरेखित करतच नववर्ष सुरु होतं.
“चैत्रचैतन्य तेजाळताना
कोकिळकंठी मदमस्त ताना,
गुलमोहोर मोहोरताना
येई आनंद दर्या उधाणा..”
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
========



