थापी आणि ओळंबा
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

थापी आणि ओळंबा
संघर्ष, संस्कार आणि जिद्दीने उभी राहिलेली जीवनभिंत
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
‘संघर्षाच्या मातीतून उभी राहिली जीवनभिंत,’
‘जिद्दीच्या घामाने घडली प्रत्येक वीट’
‘थापी-ओळंब्याच्या आधाराने सरळ झाला प्रवास,’
‘अनुभवांच्या शब्दांनी उजळला आयुष्याचा श्वास.’
‘अनुभव हा माणसाचा खरा गुरू असतो,’ आणि त्या अनुभवांना जेव्हा शब्दांची जोड मिळते तेव्हा साहित्य जन्माला येते. अशाच अनुभवांच्या पायावर उभे राहिलेले आत्मचरित्र म्हणजे,माजी मुख्याध्यापक, शिक्षक आणि वकील हरिश्चंद्र नाईक यांचे ‘थापी आणि ओळंबा’. जीवनाच्या प्रवासात प्रत्येक माणूस संघर्ष, जिद्द, कष्ट आणि माणुसकी यांच्या संगमातून घडत असतो. अशा अनुभवांना जेव्हा शब्दांचे रूप मिळते, तेव्हा त्या आठवणी केवळ वैयक्तिक राहत नाहीत; त्या समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. ‘थापी आणि ओळंबा’ हे असेच अनुभवसमृद्ध आत्मचरित्र आहे.
अत्यंत साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या नाईक सरांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आणि आपल्या जिद्दीच्या बळावर समाजात मानाचे स्थान मिळवले. “देतो तो देव” या भावनेने जगणारा त्यांचा स्वभाव. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. शिक्षण ही केवळ ज्ञान देण्याची प्रक्रिया नसून ती संस्कार घडवण्याची जबाबदारी आहे, ही जाणीव त्यांनी आपल्या कार्यातून जपली. शिक्षणाची ओढ त्यांच्या आयुष्यात कधीच कमी झाली नाही. वयाच्या ६७व्या वर्षी एल.एल.बी. ची पदवी संपादन करून “शिक्षणाला वय आडवे येत नाही” हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. त्यानंतर वकील म्हणून न्यायाच्या बाजूने उभे राहत त्यांनी समाजाशी असलेले नाते अधिक दृढ केले. कोर्टात जाण्यासाठी त्यांनी वयाच्या ६८व्या वर्षी चार चाकी वाहन चालवायला शिकले, यातून त्यांचा स्वावलंबी स्वभाव आणि जिद्द स्पष्ट दिसते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी त्यांना अपार श्रद्धा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीतून त्यांनी स्वावलंबन, श्रमसंस्कार आणि समाजाभिमुख शिक्षण यांची प्रेरणा घेतली. त्यांच्याविषयी बोलताना नाईक सर नेहमी म्हणतात
“दिव्यत्वाची जेथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती.”
शिक्षक म्हणून त्यांनी केलेले कार्य जितके उल्लेखनीय आहे, तितकेच संस्थेच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले. ज्या समाजात आपण जन्मलो, त्या समाजाचे देणे आपण लागतो, या भावनेतून त्यांनी समाजकार्यालाही हातभार लावला. या आत्मचरित्रात त्यांनी आयुष्यातील विविध टप्पे अत्यंत साध्या, सरळ आणि प्रांजळ भाषेत मांडले आहेत. बालपणातील संघर्ष, शिक्षणासाठी केलेले कष्ट, शिक्षक म्हणून आलेले अनुभव, समाजातील नाती आणि आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींच्या आठवणी…हे सर्व या पुस्तकातून जिवंतपणे समोर येते.
आईविषयी बोलताना ते अत्यंत भावुक होतात. “आईने अपार कष्ट उपसले नसते, अपमान आणि उपमर्द सहन केला नसता तर हा जीवनप्रवास शक्य झाला नसता,” असे ते नम्रपणे सांगतात. म्हणूनच ते आईचा उल्लेख “देव्हाऱ्यातील नंदादीप” असा करतात. तर पत्नीबद्दल ते प्रेमाने म्हणतात,“परमेश्वराने दिलेली ‘परीस देणगी’.” या पुस्तकातील लेखनात कुठेही अवडंबर नाही; उलट अनुभवांची प्रामाणिक मांडणी वाचकाला अंतर्मुख करते.
या आत्मचरित्राचे शीर्षकही अत्यंत अर्थपूर्ण आहे. बांधकाम करताना ‘थापी आणि ओळंबा’ या साधनांच्या साहाय्याने भिंत मजबूत आणि सरळ उभी राहते. त्याचप्रमाणे आयुष्य घडवताना माणसाला संस्कार, अनुभव आणि मूल्यांचा आधार मिळाला तर जीवनाची वाटही भक्कम आणि योग्य दिशेने जाते.हीच प्रतीकात्मक जाणीव या आत्मचरित्रातून प्रकर्षाने जाणवते. नाईक सरांच्या लेखनात ग्रामीण संस्कारांची ओल, माणुसकीची जाणीव आणि शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्मियता स्पष्टपणे दिसून येते. समाजातील साध्या माणसांचे संघर्ष आणि त्यांच्या जीवनातील छोट्या-मोठ्या घटना या लेखनाला वास्तवतेची आणि आत्मीयतेची ऊब देतात.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनात संघर्षाला सामोरे जाण्याची ताकद कमी होत चालली आहे. अशा वेळी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने उभे राहून आयुष्य घडवता येते, हा आशावादी संदेश हे आत्मचरित्र देऊन जाते. म्हणूनच ‘थापी आणि ओळंबा’ हे केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याची कहाणी नसून संघर्ष, संस्कार आणि माणुसकी यांची प्रेरणादायी जीवनगाथा ठरते. आठवणींच्या वीटांनी उभी राहिली जीवनकथा, संघर्षाच्या घामाने मजबूत झाला पाया; थापी-ओळंब्याने दाखवली जगण्याची सरळ वाट,
म्हणूनच हे आत्मचरित्र वाचकांच्या मनात घर करून राहते.
हे आत्मचरित्र वाचताना आणि आज त्याबद्दल लिहिताना मला विशेष अभिमान वाटतो, कारण या पुस्तकाचे लेखक नाईक सर आणि नाईक मॅडम हे माझे गुरुजन आहेत. त्यांच्या ‘या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी त्यांनी मला दिली. हा माझ्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. हे गुरु ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही, ही जाणीव मनात कायम राहील.
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
========



