Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

सखोल अभ्यास आणि कठोर उपासना यांचा सुरेख संगम: संत नामदेव आध्यासन

लेखिका: अमृता खाकुर्डीकर, पुणे

0 4 8 2 9 3

सखोल अभ्यास आणि कठोर उपासना यांचा सुरेख संगम: संत नामदेव आध्यासन

संत वाड्.मयाचे अस्सल संशोधन

लेखिका: अमृता खाकुर्डीकर, पुणे

संत नामदेवांची ७५७ वी जयंती नुकतीच साजरी झाली. त्यानिमित विशेष लेख

भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन “ज्ञानदीप लावू जगी” या उद्देशाने देशाच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भ्रमण करणारे संत नामदेव हे वारकरी संप्रदायातले असामान्य संतमणी. भाषेच्या व प्रांतांच्या सीमा ओलांडून ही ज्ञानज्योत अखेरी पंजाबला पोहचली. तिथल्या भक्ती प्रवाहात आधिकच तेजाळून निघाली. पवित्र गुरूवाणीत नामदेवांच्या हिंदी रचना समाविष्ट झाल्या. पंजाब आणि महाराष्ट्र एका धाग्यात बांधले गेले. त्याचा परीणाम म्हणून पंजाबात नामदेवांचे भक्त निर्माण झाले. त्यापैकीच एक निस्सीम नामदेव भक्त माजी राष्ट्रपती स्व.ग्यानी झैलसिंग यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळात विद्येच्या माहेरघरी ‘संत नामदेव आध्यासन’ स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्वरीत कार्यवाहीतून पुणे विद्यापीठात नामदेव आध्यासनाची स्थापना झाली. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. अशोक कामत यांच्या साक्षेपी मार्गदर्शनात ‘सखोल अभ्यास आणि कठोर उपासना यांचा सुरेख संगम’ साधणारे हे आध्यासन आजही संत वाड्.मयाच्या संशोधनाचा मौलिक वारसा जपण्याचे ‘दायित्वं’ मोठ्या कसोशीने निभावते आहे.

सध्या हा पुण्यवारसा डाॅ. कामत यांच्या परम शिष्या विदुषी डाॅ श्यामा घोणसे समर्थपणे सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनात नविन उपक्रम आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प आकाराला येत आहेत. नामदेव रायांची ७५७ वी जयंती हा हृद्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थित विद्यापीठात नुकताच साजरा झाला. हेच औचित्य साधून नामदेव आध्यासनाच्या चैतन्यमयी कार्याचा मागोवा वाचकांसाठी खास सादर*

“नाचू कीर्तनाचे रंगी” असे म्हणणारे संत नामदेव स्वतः इतके रसाळ कीर्तन करीत असत की, प्रत्यक्ष पाडुरंग त्यांच्या कीर्तनात येऊन नाचत असे, याचे वर्णन करणारा संत जनाबाईचा अभंग प्रसिध्द आहे.

नामदेव कीर्तन करी । पुढें नाचे सखा पांडुरंग ।
जनी म्हणे बोला आता । ज्ञानदेवा अभंग ॥
अभंग बोलतां । रंग कीर्तनीं भरिला ।
प्रेमाचेनि छंदें । विठ्‌ठल नाचु लागला ॥

पांडुरंगाशी तादात्म्य पावलेल्या नामदेवांची भक्ती किती निर्व्याज्य होती याच्या अनेक कथा आहेत. देवाला नैवेद्य दाखवून त्याचे खाणे होईपर्यंत थांबून राहणारे लहानगे नामदेव, नैवेद्य पळवणा-या श्वानामागे तूपाची वाटी घेऊन धावणारे निरागस नामदेव, पुढे मुक्ताईने गुरूविना ‘कच्चे मडके’ ही जाणीव दिल्यावर विसोबा खेचरांकडून अनुग्रह मिळवणारे नामदेव, ते थेट भक्तांच्या मांदीआळीतले प्रमुख संत म्हणून अढळ स्थान प्राप्त केलेले नामदेव. कीर्तनाप्रमाणेच संत नामदेवांची भावपूर्ण अभंग लोकप्रिय होते.

ज्ञानेश्वर माऊलींवरचे त्यांचे असीम प्रेम आणि संत जनाईची त्यांच्यावरील अतूट भक्ती, सर्व संतमंडळींवरची त्यांची माया सर्वश्रुत आहे. नामदेवांच्या आयुष्याचा हा पूर्वार्ध जितका विलक्षण, त्याहीपेक्षा त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध अलौकीक म्हणावा लागेल! प्रिय ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर नामदेव व्याकूळ-उदास झाले, मन कुठेच रमेना म्हणून ते भारत भ्रमणाला निघाले. या भ्रमंतीत त्यांनी केलेला भागवत धर्माचा प्रसार आणि त्यास मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. या सा-या व्यापक कार्याच्या पार्श्वभूमीवर; संत नामदेवांच्या नावे स्वतंत्र आध्यासन स्थापन होणे ही घटना फारच मोलाची आहे. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी शैलसिंग यांच्या तीव्र ईच्छेने पुणे विद्यापीठात सुरू झालेले ‘नामदेव अध्यासन’ हे संपूर्ण देशात सरकारने अधिकृत जी. आर. काढून स्थापन झालेले एकमेव आध्यासन आहे. मराठी भाषेतील एक विद्वान, नामदेव वंशातील एक व्यक्ती, अनुसूचित जाती जमातीमधील एक व्यक्ती अशी कमिटी गठीत करण्यात आली. पहिले आध्यासन प्रमुख म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. अशोक कामत यांची नेमणुक झाली. मराठी आणि हिंदी भाषेत संत साहित्यावर पी. एच डी. केलेले डाॅ. कामत यांनी ही नेमणुक सार्थ ठरवली. विविध धर्म पंथांची तत्त्वचर्चा, प्रकल्प, कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद अशा उपक्रमांनी आध्यासन गजबजून गेले. एखादे पवित्र अभियान चालवावे, तसे हे व्यासपीठ पुण्यप्रद ठरले.

मराठी सोबत हिंदीतही संशोधन होत असल्याने आध्यासनाचा पैस विस्तारत गेला. देशभरातल्या अभ्यासकांसोबत विदेशी अभ्यासकही मोठ्या औत्स्युक्याने इथे ज्ञानोपासना करू लागले. यातून प्राचीन आणि आधुनिक संत, त्यांचे कार्य व चरित्र, विविध धर्म- पंथ, संप्रदाय यांचे सांगोपांग संशोधन प्रबंधांच्या रूपात सिद्ध झाले. यात संत काव्याचे वाङ्मयीन मूल्य उलगडतानाच तत्कालीन सामाजिक वास्तवही तपासले जाते. काही ऐतिहासिक पैलू समोर येतात. काही संशोधक समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करतात. एकूणच, सद्य वर्तमानातील आधुनिक जीवनमूल्ये आणि गतकालीन संतांची शिकवण यांचा धागा इथे हळूवारपणे गुंफला जातो.

हा सगळा ज्ञानयज्ञ बघितल्यावर लक्षात येते, एकूणच संत वाड्.मय हा विषय अथांग सागर आहे. यातून संशोधकांच्या ओंजळीत जेव्हा चिंतनाचे चमकदार निष्कर्ष मोती होऊन हाती येतात, तेव्हा हे ज्ञानपीठ त्या प्रभावळीत झळाळून उठते. वेळोवेळी आयोजित होणारे अभ्यासकांचे मेळावे आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संत वाड्.मयाचे अभ्यासक आणि संप्रदायातील उपासक प्रेमाने एकत्र येतात, तेव्हा आध्यासनाचा उद्देश ख-या अर्थाने सफल होतो. भक्तीमार्गे समाजाची वैचारिक जडणघडण करणा-या संतांच्या नावे अध्यासने स्थापन होण्याचे महत्त्वं मोठे आहे, याची प्रचिती येते. या अनुषंगानेच पुणे विद्यापीठात १९८५ साली स्थापन झालेल्या ‘संत नामदेव अध्यासना’ची ४० वर्षाची ही वाटचाल वाड्.मयाच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याजोगी आहे

ज्ञान आणि भक्तीचे संचित जपणारे विशेषतः संतवाङ्मयाबद्दल कमालीची आस्था असलेले डॉ. कामत यांनी आपल्या कार्यकाळात इथे खरोखर एक सुवर्णयुगच निर्माण केले. आध्यासनाची कार्यपध्दती कशी असावी, त्याची नियमावली कशी आचरणात आणावी, विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्या मदतीसाठी पूरक साहित्य कसे उपलब्ध करावे, संशोधनाला दिशा व उंची कशी द्यावी याचा आदर्श स्थापन करणारे संत नामदेव आध्यासन देशभरातील आध्यासनांसाठी पथदर्शी दीपस्तंभ आहे. विविध स्तरातील अभ्यासक, संशोधक यांना संत-साहित्याकडे आकर्षित करण्यात डाॅ. कामत कमालीचे यशस्वी ठरले.

मध्ययुगीन संतांबरोबरच आधुनिक संतांचे जीवनकार्य, त्यांचे प्रभाव क्षेत्र, विविध पंथ , संप्रदाय यांची ज्ञान परंपरा, असे बहुमुखी संशोधन इथे ८०० प्रबंधात
संग्रहीत झाले आहे. विषयांची निवड, त्यानुसार अभ्यासकांनी केलेल्या क्षेत्रभेटी , संबंधित पूरक सामग्री, विषयांचा पाठपुराव, संदर्भ शोध, छायाचित्रे अशी भरीव जोड देण्याची शिस्त यामुळे नामदेव आध्यासनात एक बहुमोल ‘अभ्यास-पर्व’ उदयाला आले. यात तन्मयतेने सखोल संशोधन करणारे डॉ. हे. वि. इनामदार, सौ. सुमती देशपांडे, श्री. ॐ. गो. दत्तोपासक, डॉ. पद्मावती श्रोत्रीय असे कितीतरी नामवंत आहेत. हिंदी प्रबंधातही विषयांचे वैविध्य असून मराठी संतपरंपरा आणि शीख गुरुपंरपरा यांच्यातील अनुबंध शोधणारा प्रा. वीणा मनचंदा यांचा प्रबंध महत्वपूर्ण आहे. प्रा. मनचंदा व सतीश बडवे यांना अनुदान आयोगाची फेलोशिप मिळाली होती.

अशाच विचक्षण अभ्यासकांची परंपरा आता डाॅ. श्यामा घोणसे यांच्या कुशल मार्गदर्शनात पुन्हा झळाळून उठते आहे. गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून गाठीशी असलेला अनुभव, ३०-३५ शोध निबंध आणि १२-१५ प्रकाशित ग्रंथ अशी संपदा नावावर असलेल्या श्यामाताईंचा पी एचडी चा विषय होता, “वीरशैवांचे मराठी व हिंदी वाड्.मय- एक अभ्यास”. याशिवाय, अनेक संस्थांवर त्यांनी महत्वपूर्ण
पदे भूषविली आहेत. संशोधनात्मक कामाचा भरपूर अनुभव आहे. म्हणूनच त्या आध्यासनाच्या उपक्रमांचे उत्तम संयोजन करतात. मुख्यतः अनेक दुर्मिळ विषयांवर विद्वानांची व्याख्याने आयोजित करताना त्यातून होणा-या चिंतनाचे मंथन विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी पर्वणी ठरावे, हा त्यांचा उद्देश असतो. यातूनच पुढील अभ्यास चर्चा व कार्यक्रम ठरतात.

वैचारिक उपक्रमांच्या निमित्ताने विद्यापीठात अनेक अभ्यासक आणि नामवंतांची ऊठबस आता वाढली आहे. नामदेव समाज , शिख समाज, संत तुकाराम आध्यासन, विद्यापीठातील इतर आध्यासने, तत्त्वज्ञान विभाग, हिंदी – मराठी – संस्कृत भाषा विभाग, या सा-यांना सोबत घेऊन समन्वयाने कार्यक्रमांची आखणी होते. यातील प्रत्येक अभ्यासकाचा सहभाग कार्यक्रमाची व्याप्ती वाढवतो. काही महत्त्वपूर्ण ‘संशोधन प्रकल्प’ आध्यासनाची अभ्यास दिशा आधोरेखित करीत आहेत. यापैकी मनीषा बाठे यांचा ” विठ्ठल नामाचा भारत संचार – गुजरात,” अनिल स्वामी यांचा “संत नामदेवरायांच्या मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पाऊलखूणा”, डाॅ. तनप्रीत कौर मेहता यांचे “गुरू ग्रंथसाहिब और संत नामदेव अनुबंध” हे प्रदीर्घ हिदी संशोधन आणि डाॅ. अंजली जोशी यांचा “भारतीय अभिजात संगीत व नामदेवांच्या हिंदी रचना ” असे काही महत्वपूर्ण प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. यात संशोधकांची मेहनत, विषयाचा घेतलेला धांडोळा आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी यातून उलगडणारे सत्याचे कवडसे आध्यसनाचे व्यासपीठ नक्कीच प्रकाशमान करतील.

स्वामी सावरूपानंद पुरस्कार’ हा नामदेव आध्यासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा संत वाड्.मयात अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. गेल्या ३०वर्षापासून सुरू असलेल्या या पुरस्काराने आजवर वि. रा. करंदीकर, राम शेवाळकर अशा अनेक थोर अभ्यासकांना गौरवण्यात आले आहे. यंदा डाॅ. अशोक कामत यांना हा पुरस्कार मरणोत्तर समर्पित करण्यात आला.

डॉ. अशोक कामत यांनी लावलेला संशोधन कार्याचा मोग-याचा “वेलू” आता डाॅ. श्यामाताईंनी प्रेमाची शिंपण घालून मांडवावर चढवला आहे. त्याचा “बहरू” सुखावतो आहे, तथापी; डाॅ. कामत यांनी पदभार सोडल्यानंतर मधली काही वर्ष आध्यासनाला एक कुलूपबंद आवस्था बघावी लागली. अंधा-या बोगद्यातून काही काळ झालेला हा प्रवास फार वेदनादायी होता. मौलिक संशोधन, महत्वाची कागदपत्रे, फायली, संदर्भग्रंथ, प्रवंध संग्रह हा सारा सोन्यासारखा ठेवा आडगळीत पडला. कोरोना काळात सर्वच जग थांबले होते, पण नामदेव आध्यासनावर या सावल्या जरा जास्त काळ रेंगाळल्या. हा अंधार धोडाफार दूर करणा-या काही चांगल्या व्यक्तींचा पायरव इथे अधून मधून उमटला..पण वाईट गोष्टी दूर ठेवण्यासाठी समार्थ्य आणि बळ जरा जास्तच वापरावं लागतं! डाॅ. अशोक कामतांच्या तालमीत तयार झालेल्या डाॅ. श्यामाताईंच्या रूपात अशी धुरंधर ताकद प्रकट झाली. आता संत नामदेवांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने ते घसरलेलं गाडं पुन्हा रूळावर आलं ! गत वैभवाची शिदोरी घेऊन आध्यासन पुन्हा प्रफुल्ल आणि पल्लवित झालं. नवागतांची उत्सुक पावलं आणि जुन्या जाणत्यांची ज्ञानसाधना यांचा मनोरम संगम माता सरस्वती आणि आई सावित्री आनंदाने बघत असतील! संतांचे बहुमोल कार्य भागवत धर्माच्या उपासकांसाठी मोठ्या अस्मितेचा विषय आहे. ही अस्मिता संत नामदेव आध्यासनाच्या व्यासपीठावर अधिकच फुलते आहे.

डाॅ श्यामा घोणसे यांनी आध्यासन प्रमुख म्हणून जबादारी सांभाळण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, हा भाग्ययोग माझ्या भाळावर आधीच लिहिला असावा. एवढी मोठी जबाबदारी घ्यावी की नाही, याबद्दल मी साशंक असताना माझे अत्यंत आदरणीय गुरू,पी एचडीचे गाईड,आणि नामदेव आध्यासनाचे अर्ध्वयू डाॅ. अशोक कामत यांनी मला त्यावेळी तशी आज्ञाच दिली. हे आज्ञा पालन करणे, माझे कर्तव्यच होते. कारण नामदेव आध्यासन उभारताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि झपाटून केलेले काम मी स्वतः पाहिले आहे. एखादे भरीव कार्य विधायक मार्गाने कसे विस्तारत जाते, त्याचीही मी साक्षीदार आहे. विद्यार्थी दशेतच मी आध्यासनाशी जोडली गेले. सूत्रसंचालन, पाहुण्यांचा परिचय, पेपर रिडींग अशा विविध प्रकारे मी कार्यक्रमात सहभागी होत असे. तेव्हाचा बांधलेला हा अनुबंध आज प्रमुख पदाच्या जबाबदारीपर्यंत येऊन पोहचला.

संत वाड्.मयावर प्रेम करणारी सर्व मंडळी, नामदेव समाजोन्नती परिषद, नामदेवांचे अनेक भक्त, कमलजीत कौर व सौ. कौर , मनजित सिंग, डाॅ कृष्णा मुंडे असे समाजातील विविध स्तरातील मान्यवर व्यक्ती व संस्था, विद्यापीठातील सर्व सहकारी, विभाग प्रमुख, विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रशासन, स्वतः मा. कुलगुरू, उप कुलगुरू या सर्वांचे मिळणारे पाठबळ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हे काम पुढे नेण्यासाठी अनेक संकल्पना आहेत. त्यापैकी ८०० संशोधन प्रबंधाचे डिजीटायझेशन प्राधान्याने करण्याचा संकल्प आहे. कारण अलिकडे आपल्या समाजात मतभेद पराकोटीला पोहचलेले दिसतात! पण हे वेळीच थांबून निदान मनभेद तरी वाढू नयेत म्हणून राष्ट्रऐक्य आणि समरसता यांचे मूर्तीमंत प्रतिक असलेले नामदेवराय यांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे. त्यांच्यावर झालेले बहुविध संशोधन देशाच्या विविध प्रांतात नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असून अभ्यासकांसाठी सोयी सुविधा यांची व्यवस्था उभारणे, संशोधन सहायक नेमणे , संत नामदेव अध्ययन व संशोधन केंद्र कार्यान्वीत करणे असे आणखी काही संकल्प त्यांनी आवर्जून सांगितले.

डाॅ. श्यामा घोणसे यांच्या या मुलाखती नंतर मनात हेच ठसले की, पाश्चात्य प्रबोधन युगाच्याही आधी आपल्याकडची ज्ञान परंपरा समृध्द होती. मध्ययुगीन कालखंडात हे वेद-उपनिषदातील ज्ञान संतांनी साध्या सोप्या अभंगरचनेतून सामान्यांपर्यंत आणले. वाड्.मयाचा हा सगळा ईतिहास अतिशय गौरवशाली आणि समाजाभिमुख आहे. हाच दैदीप्यमान वारसा संशोधन, संवाद, सहवास आणि समन्वय यातून आधोरेखित करणारे ‘संत नामदेव आध्यासन’ हे ज्योतिर्मयी स्थान अनेकांसाठी दिशा दर्शक आहे. राम, कृष्ण, शिव या तीन शक्तीशाली तत्त्वांना जोडणारे संत नामदेव, जणु या शक्तीचा चौथा स्तंभ होऊन जीवनभर कार्यरत राहिले. तसेच हे आध्यासनही अखंड कार्यरत राहो, हिच श्रध्दा मनोमन जागी झाली !

अमृता खाकुर्डीकर,पुणे.
amruta.khakurdikar@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे