अवदसा
डोक्याला हात लावून..
मी माझ्याच पश्चातापात..
ती ही जवळच..
जणू जिंकल्याच्या आवेगात..
मनात एकच विचार सुरू..
प्रश्न विचारू तरी कसा.?
तीच म्हणाली मी “अवदसा”..!
तुझ्या पाठी लागलेली…
मी तरी काय करणार..
आरसा विचारांचा दाखवणार..
म्हणून मी नावाने इथे बदनाम..
कर्माचा पाढा वाचणे माझे काम..
उगाच नाही माझं
कुणाच्या जीवनात येणं..
एकनंतर एक घटना,
तुमच्या ताटात वाढत राहणं..
केलेले कर्म इथेच भोगावे..
चांगल्याचे चांगले,
वाईटाचे वाईट मी दाखवावे..
पण तुम्ही मात्र….
दुःखाचे चटके सहन होत नाही,
सुखात अहंकारात लुप्त राही..
मती तुमचीच माती खाते..अन..
माझीच अवदसा होत जाते..
मला कुठे आवडतेय ग..
अस कोणाला दुःखात बघायला..
देवानेच केलीय माझी नेमणूक
अवदसा बनून वावरायला…
करीत रहावे सदा पुण्यकर्म,
हाच खरा जीवनाचा मर्म..
कुणा न कधी तू दुखावणार..
बदल्यात देव ही सुखावणार..
यावा दिवस असाही एक.. की
मीही कुणाच्या पाठी नाही लागणार..
मीही कुणाच्या पाठी नाही लागणार..!
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
========



