बालदिनानिमित्त बाल साहित्य संमेलन
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम

बालदिनानिमित्त बाल साहित्य संमेलन
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागात आगळ्या वेगळ्या पद्धतीने ‘बालदिन’ साजरा करायचा असे ठरले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.गजानन पाटील व शिक्षणाधिकारी नाईकडे साहेब यांनी ही कल्पना मांडली. महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद शाळांना तशा सूचना आल्या. विद्यार्थी साहित्यिक व शिक्षक साहित्यिक असे ग्रुप तयार झाले. याअंतर्गत ‘माझी गोष्ट माझे पुस्तक’ हा उपक्रम राबविला. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता बच्छाव मॅडम यांनी यासाठी प्रत्येक तालुक्यातील काही निवडक शाळांचा ग्रुप तयार केला. इच्छुक शाळांसाठी लिंक पाठवली. खरेतर उपक्रम सुरू झाला आणि प्रथम सत्र परीक्षा व दिवाळी सुट्टी असा कालावधी आला. त्यातच शिक्षक बदल्यांमुळे उपक्रमाशी जोडलेले शिक्षक इतर शाळेत गेले. तरीही सर्व अडचणींवर मात करण्यासाठी मॅडम गुगल मीट घेऊन मार्गदर्शन करत होत्या.
पहिल्या मिटींगमध्ये अगदी बारीकसारीक तपशील त्यांनी लक्षात आणून दिले. प्रत्येकाचे वेगवेगळे हस्तलिखित पुस्तक तयार करायचे होते. खरी अडचण होती ती बदलून दुसऱ्या शाळेत गेलेल्या शिक्षकांची. प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे आवश्यक असतानाही फोनवर करावे लागत होते. तरीही शिक्षकांनी हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले व त्याची यशस्वीता पहायला मिळाली. अनेक विद्यार्थ्यांनी आकर्षक मुखपृष्ठ, मलपृष्ठ, विविध चित्रांचा वापर करून पुस्तके तयार केली. यातील सर्वात आनंदाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःची गोष्ट तयार केली व स्वलेखनाचा पाया घातला गेला.
दिनांक १३ नोव्हेंबरपासूनच बालगंधर्व नाट्यमंदिर येथे प्रदर्शनास सुरूवात झाली. यादिवशी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत कार्यक्रम अप्रतिम आहे याची साक्ष देत होती. मुख्य हाॅलमध्ये बाल साहित्यिकांच्या हस्तलिखित पुस्तकांचे प्रदर्शन, कार्यक्रमाचे आकर्षक बोर्ड, प्रदर्शनास आलेल्या मुलांची मनोगते दर्शनी भागावर प्रदर्शित केलेली, ते पाहून मुलांच्या चेहऱ्यावर स्वनिर्मितीचा आनंद झळकत होता.
या दोन दिवसांच्या Young Authors’ कार्यक्रमादरम्यान विविध प्रशासकीय अधिकारी व साहित्यिक मान्यवरांशी अर्थपूर्ण चर्चा घडून आल्या. त्यात प्रमुखपणे मा.अतिरिक्त पोलिस महासंचालक श्री विश्वास नांगरे पाटील, पुणे विभागीय आयुक्त मा. श्री. चंद्रकांत पुलकुंदवार, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील, जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र डुडी, शिक्षणाधिकारी मा. श्री. संजयजी नाईकडे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा. श्री. शेंडकर साहेब, चिंटूचे निर्माते चारूहास पंडित, बालसाहित्यिक आबा महाजन व संगिता बर्वे, वरिष्ठ साहित्यिका सौ. माधुरी पुरंदरे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांशी विविध प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांनी संवाद साधला. यावेळी तोत्तोचान नाटक सादर करण्यात आले. शिक्षक साहित्यिकांची मनोगते, स्वलिखित गोष्ट लिहितानाचे विद्यार्थी साहित्यिकांचे अनुभव अशी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दोन दिवस लाभली. खऱ्या अर्थाने आगळावेगळा बालदिन साजरा झाला.
जिल्हा परिषद, पुणे व ओपन लिंक्स फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिले बालसाहित्य संमेलन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरली. चिमुकल्यांसाठी बौद्धिक मेजवानी देऊन खऱ्या अर्थाने त्यांची कल्पकता, सुप्त गुणांना उत्कृष्ट व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे प्राचार्य मा. शेंडकर साहेब यांनी सदर उपक्रमाच्या अनुषंगाने वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या अधिव्याख्याता भाषा विभागप्रमुख मा. बच्छाव मॅडम, तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनचे समन्वयक, सातत्याने सोबत असणारे व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले श्री. भैरव गायकवाड सर आणि संपूर्ण टीम यांनी खूप परिश्रम घेतले. हा उपक्रम दरवर्षी घ्यावा अशी विद्यार्थी व शिक्षकांनी आशा व्यक्त केली.
स्वाती मराडे
इंदापूर जि पुणे
========





