‘…तर पारतंत्र्याचा पिंजरा सोडावाच लागतो.’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘…तर पारतंत्र्याचा पिंजरा सोडावाच लागतो.’; स्वाती मराडे
गुरूवारीय चित्रकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’
आजचे चित्र चारोळी स्पर्धेचे चित्र पाहताच या ओळी आठवल्या. पिंजरा.. मग तो सोन्याचा असला तरी पिंजराच. स्वातंत्र्य हिरावणारा, गुलामी करायला लावणारा. अज्ञान अंधकारात ठेवणारा. असा हा सोन्याचा पिंजरा कोणाला आवडेल? पंखांची ताकद ओळखून आकाशाला गवसणी घालायची असेल.. केवळ इतर दाखवतील ते नव्हे तर स्वनजरेने जग अनुभवायचे असेल.. आकाशी झेप घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर पारतंत्र्याचा पिंजरा सोडावाच लागतो.
हाच पारतंत्र्याचा पिंजरा जित्या जागत्या माणसांनी अनुभवला १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी. केवळ नि केवळ गुलामगिरीचे जगणे. जणू कळसुत्री बाहुल्याप्रमाणे. वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, वैचारिक, मानसिक, अभिव्यक्ती.. यापैकी कुठलेच स्वातंत्र्य न अनुभवलेल्या लोकांना कुणीतरी जागे करत होते.. अन् स्वातंत्र्य मिळावे म्हणून इंग्रजांशी लढत होते. एकाचवेळी दोन्ही बाजू सांभाळत स्वातंत्र्य चळवळीतील नेते स्वातंत्र्यासाठी झगडत होते. वैचारिक सुस्तता नि अज्ञानाने व्यापलेल्या लोकांमध्ये स्वतंत्रतेचे भान आले नि सुरू झाला स्वातंत्र्याचा प्रवास. त्याग, बलिदान, एकता यांच्या पायावर तो ध्वज पाय रोवून उभारत होता..नि आपला देश स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होता.
स्वातंत्र्याचे हे स्वप्न पूर्ण झाले १५ ऑगस्ट १९४७ ला. तो स्वातंत्र्यदिन.. आम्हा भारतीयांचा अभिमान. स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांचा त्याग स्मरून नतमस्तक होण्याचा.. त्यांचे बलिदान आठवून आपले हे स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून कर्तव्याप्रती सजग होण्याचा. एकतेचा मंत्र हृदयात भरून घेण्याचा. हाच तो स्वातंत्र्य महोत्सव..! स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आपण सर्वांनी केलेल्या रचना अप्रतिमच. स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ ते सद्यस्थिती शब्दबद्ध झाली. देशप्रेम, अभिमान, तिरंग्याचा सन्मान, मार्मिक टिप्पणी साधत वैविध्यता जपली. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक लेखिका कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह



