संयम हवाच…!
अनिता व्यवहारे
संयम हवाच…!
सामर्थ्य आहे संयमाचे जो जो पाळील तयाचे,
परंतु तेथे पाहीजे अधिष्ठान विवेकाचे ||
या ओळी वाचनात आल्या आणि मन ही विचार करू लागले की, खरंच संयमात एवढे सामर्थ्य असते का? आणि मग आठवलं, लहानपणी आजीने सांगितलेली गोष्ट. मी लहान असताना आजीबरोबर देवळात जायचे, तेव्हा गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी तिथे बाहेरच एक कासवाची मूर्ती असायची. अगोदर कासवाचे दर्शन घ्यायचं आणि मग देवाचं…! त्यावेळी मी आजीला विचारलं होतं,’ आजी देवळात कासव का असते? तेव्हा आजीने सांगितलं होतं की, कासव हे शांततेच प्रतिक मानलं जातं. ते जसे आपले सर्व अवयव आत घेऊन बाह्य गोष्टीपासून स्वतःचे रक्षण करतं, तसेच माणसाने देवासमोर जाताना राग, क्रोध,लोभ, मोह, मद या विकारांना दूर सारून मंदिरात प्रवेश करावा. याचा अर्थ आज कळू लागला की, ‘कासव हे संयमाचे प्रतीक आहे’.
‘संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे’. संयम आणि त्या जोडीला सहनशीलता ही मनुष्याची कमजोरी नाही; तर ती मनाची खरी ताकद असते. त्यामुळेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संयमाला महत्त्वाचे स्थान आहे. हल्लीच्या काळात आपले मनच आपल्या ताब्यात नसते. त्यावर दुसरेच अधिराज्य गाजवत असतात. याला कारण आपला उतावीळपणा… बंधन मुक्त जीवन जगण्याची आपली आसक्ती. हीच आसक्ती आपल्याला नैराश्य व अपयशाकडे नेत असते. उतावीळपणा मनातला क्लेश वाढवतो. आपण दैनंदिन जीवन जगत असताना बघतो की काही माणसंही मितभाषी,मित आहारी असतात. आणि ते कायम प्रसन्न राहतात. इतरांनाही आनंदी ठेवतात… लोभी, वाचाळ माणसं यांच्यामुळे मात्र स्वतःला आणि इतरांनाही दुःख, त्रास सहन करावा लागतो. अशा माणसांपासून दूर राहायचं असेल तर संयम बाळगलाच पाहिजे…! संयमाच्या कसोटीला उतरला तर जीवन यशस्वी कराल..!
जगात जेवढे महान पुरुष, संत मंडळी होऊन गेले त्यांच्याकडे सुद्धा संयम होताच. त्यामुळेच तर ते क्रोधावर नियंत्रण ठेवून शांती, सौख्याचे साम्राज्य उभा करू शकले.महात्मा गांधीजी, विवेकानंद संत एकनाथ,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशी अनेक नाव सांगता येतील की, ती संयमी होती.
आजच्या या कलियुगात संयम म्हणजे शरणागती, भित्रेपणा वाटतो. त्यामुळे जिकडे तिकडे अराजकता पाहायला मिळते. हिंसाचार, दहशतवाद, खून, मारामाऱ्या, दरोडा, अत्याचार, आत्महत्या या सगळ्या बाबी म्हणजे संयमाचा अभाव. माणसातली पशुवृत्ती बळावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ढासळत चाललेला संयमाचा अभाव..! म्हणूनच तर ‘संयमाचे प्रशिक्षण घेतलं की, जीवनातील अनेक युद्ध जिंकता येतील. तसेच तुमच्या स्वप्नांची उंची हिमालयाशी स्पर्धा करू शकेल व ध्येय सागराच्या खोलीत लपल्याप्रमाणे अनमोल ठरतील….!
अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहिल्या नगर



