Breaking
नागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

माणूसकी जीवंत आहे का?; उर्मिला राऊत

उर्मिला राऊत नागपूर

0 4 8 2 9 7

माणुसकी जिवंत आहे का?

अडलेल्याला देई आधार,
हाच माणुसकीचा सार..’

या जगात सर्वात सुंदर काय असेल? तर ते माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं! दैनंदिन जीवनात अनेक प्रसंग घडतात, आजूबाजूला आपण बघतो. काही प्रसंग आपल्या सोबत घडतात, तर काही प्रसंग दुसऱ्यांसोबत. तेव्हा माणसांतली माणुसकी संपत चालल्याची खंत आपण सारेच व्यक्त करतो. परंतु माणूस हाच पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे हेदेखील मांडतो. मग माणूसपण आणि माणुसकी आपल्यापासून वेगळी कशी झाली यावर विचार मंथन व्हायलाच हवे.

आजच्या काळात कुटुंब म्हणजे नवरा, बायको व त्यांची मुले एवढेच मर्यादित आहे. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानत होतो. पण आज पैसा, स्टेटस या आहेत. आयुष्य जगतांना प्रत्येकजण स्वतः प्रती संवेदनशीलता जपत स्वअस्तित्वाचे जग स्वतःभोवती तयार करतो. साचेबद्ध पद्धतीने जीवन जगणाऱ्या माणसांनी आपण घेरलेले असतो. प्रत्येक व्यक्ती समाजात माणूस म्हणून जगत असतो. परंतु, आजही आपल्या समाजात व्यवस्थेच्या चौकटी बाहेर जगणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या बरोबरीचे स्थान दिलं जात नाही. म्हणूनच मनाला प्रश्न पडतो की, आजही माणुसकी जिवंत आहे का? या प्रश्नाचे उत्तर खरे तर, आजही अनुत्तरीत आहे.

आज प्रत्येक व्यक्ती भरपूर पैसा कमावण्याच्या नादात स्वतःला विसरत चाललेला आहे. अहंपणाची त्याला बाधा झालेली आहे. पैसा, वैभव असूनही त्यांच्याकडे शांतता मात्र नाही. दुसऱ्यांशी स्पर्धा, द्वेष, मत्सर वाढत आहे. वैभव आहे पण झोप मात्र नाही. त्यासाठी खातो रोज बी.पी. शुगर, हायपर टेन्शन व झोपेच्या गोळ्या. रोज वर्तमानपत्र उघडून बघा, टीव्हीवरील बातम्या बघा.. माणसाने माणुसकीची निर्घृण हत्या केलेली दिसते. तेव्हा मन बुद्धीच्या विचारातून शब्द ओठी येतात की,

ऊठ! माणसा जागा हो ,
माणूसकीचा धागा हो//

अगोदर माणसं माणसांसोबत माणसासारखी राहायची. दिलेल्या दानाचा दुस-या हातालाही पत्ता लागायचा नाही. परंतु आज इतरांना मदत करताना ज्याने पहिला सेल्फी काढला तेव्हापासूनच माणुसकी काय असते हे लोकांना समजून सांगायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आजकाल मदत करण्याची छायाचित्र जपून ठेवून मीडियावर पोस्ट करणाराच खरा माणूस ठरलाय.

शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. तेव्हा प्रत्येकाने स्वतःच ठरवले तर विवेक, माणुसकी, वागण्यात शिस्त आणू शकतो. सद्सदविवेकबुद्धी ही देणगी प्रत्येक सजीवाला जन्मत:च निसर्गातून मिळालेली आहे. पण तिचा वापर व्यवहारात करणे यालाच ‘माणुसकी’ म्हणतात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे म्हणजेच माणुसकी. पण या स्वार्थी जगात कधीकधी माणुसकी चुकीच्या माणसाला दाखवली गेली तर आपल्यालाच त्रास होतो. आणि म्हणूनच प्रत्येक माणूस माणुसकी जपताना थोडा मागे सरताना दिसतो.

दुनिया ही पैशाची,
पैशांसम दुजा नाही कोणी,
नातेही फक्त पैशांसाठी,
पण पैसा असतो जीवासाठी,
जीव नाही पैशासाठी,
माणुसकी जप,
स्वतःच्या उद्धारासाठी//
हे माणसाला कळायलाच हवे.

उर्मिला राऊत.
फ्रेंड्स कॉलनी, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे