शांता’ पर्व
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, जि.पुणे.
‘शांता’ पर्व
त्यांच्या कविता म्हणजे बकुळफुलांच्या गंधाने वारा बेधुंद व्हावा.. प्राजक्तफुलांनी भरभरून गंध पेरत टपटपत रहावे. आकाशात पक्ष्याने उंच भरारी घ्यावी.. सागरात लाटांनी मनमौजी वागावे.. रात्रीस चांदण्याने उजळून टाकावे.. आभाळाने पाऊस देऊन समृद्ध रितेपण घ्यावे… अन् रसिक मनाच्या काळजाचा ठाव घेऊन ओठातून आपोआप ‘वाह’ बाहेर पडावे. ‘खोडी माझी काढाल तर अशी देईन फाईट’, घटकेमध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट..ही खरोखरच खोडकर वाटणारी बालकविता.. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती.. ही मनात जोश आणणारी कविता. जय शारदे वागेश्वरी ही देवीला केलेली आळवणी. टपटप टपटप टाकीत टापा, किलबिल किलबिल पक्षी बोलती.. ही बालगीते. गजानना श्री गणराया, गणराज रंगी नाचतो.. ही भक्तीगीते.. यांसारख्या त्यांच्या अनेक कविता व गीतांनी बालपण समृद्ध केलं.
वागेश्वरीला इतके गोड शब्ददान अर्पण करणारी तीही एक शब्दशारदाच.. रसिक मनाला हवीहवीशी वाटणारी भावगीते, प्रेमगीते, विरहगीते, निसर्गगीते, बालगीते, देशभक्तीपर गीते, चित्रपट गीते, कथा, कादंबरी, बालसाहित्य लिहिणारी ही शब्दशारदा म्हणजे कवयित्री ‘शांता शेळके.’ त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ ला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. काटा रूते कुणाला आक्रंदतात कोणी मज फूलही रूतावे हा दैवयोग आहे… वाह.. काय ती कल्पना.. मज फूलही रूतावे.. अस्वस्थ अंतरीची व्यथा हळुवारपणे उलगडत नेली अन् वाचकालाही हळुवार त्या विचारात अलगद ओढून घेतले. तोच चंद्रमा नभात.. तीच चैत्र यामिनी.. हे गीत कधीही ऐकले तरी पुन्हा नव्यानेच ऐकतोय असेच वाटते. शब्दांची अवीट गोडी तुम्ही चाखायला दिलीत.
ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे जिवलगा राहिले रे दूर घर माझे.. जिवलगा हा शब्द वाचताच आर्त साद ऐकू येते. जसजशी रचना वाचावी त्यातील गूढ गहनता मनाला अधिकाधिक स्पर्श करते. शब्दाशब्दातील आर्तता हृदयाला कातर न करेल तर नवलच. एका ‘पैठणी’तून सांगितलेली आजीची आठवण वाचताना जणू आपणच तो अनुभव घेतलाय हा भास होतो. अन् आजीच्या मऊ मुलायम पैठणीसारख्या आठवणीत मन रमून जातं.. रेशमाच्या रेघांनी.. लाल काळ्या धाग्यांनी सजलेली दुसरी पैठणी ठेका धरुनच वाचायला लावणारी.. अन् तेव्हाच शालू हिरवा पाचू नि मरवा हेसुद्धा आठवतेच आठवते.. खरेतर चाल ऐकूनही त्याप्रमाणे त्यात चपलख बसतील अशी गीते तुम्ही लिहिली. एखादा शब्द मागेपुढे करताना कधी अडेलतट्टूपणाही डोकावला नाही तुमच्या मनात. सहजसुंदर.. सोपे शब्दही काळजाचा कसा ठाव घेतात हेच तुम्ही दाखवून दिले. जणू निरभ्र आकाशाने पुढ्यात उभे रहावे.
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा…हे तर मनाशी केलेले गुज वाटते.. दूर कुठे चंदनाचे बन जळते..किती अर्थगर्भित रचना.. अर्थघन असणे हा तर तुमच्या सर्वच काव्याचा आत्मा जणू. ‘माझे राणी माझे मोगा..’ राजा सारंगा माझ्या सारंगा..मी डोलकर डोलकर.. वादलवार सुटलंं गं, वल्हव रे नाखवा..यासारखी दर्यावरील गाणी.. प्रत्यक्ष समुद्र न पाहता केवळ कवीकल्पनेवर साकारताना तुमचं मन त्या गोष्टीशी किती तादात्म्य पावत असेल ना…! दिसते मजला सुखचित्र नवे.. जीवनगाणे गातच रहावे..आशा पल्लवित करून जाणारे हे शब्द.. जगण्याची उर्मी देणारेच. चांदणेही उन्हात हसते.. तुमच्या या शब्दांमुळे.
कातरवेळची हुरहूर, विरहवेदनेचे काहूर, शब्दातून ईश्वरभक्ती, प्रेमिकांच्या नजरेतून प्रिती.. अल्लड अवखळपणाचा साज, दर्याची गाज, बालगोपाळांचे रंजन, तर कुठे कुणाच्या व्यथेचं आक्रंदन.. किती किती शब्दवैभव नेमकेपणाने टिपले..या शब्दवैभवाला विविध मानसन्मान, पुरस्कार वाट्याला तर येणारच.१९९६ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे.. ही जणू त्यांची शब्द भैरवी…हे ‘शांता’पर्व २००२ मध्ये शांत झाले. पण हे मात्र निश्चित.. तुमचे गीतरूपी .. काव्यरूपी शब्द कायम मराठी मनात घर करून राहतील. “जोवर असतील सूर्य चंद्र तारे.. तोवरी गुंजतील या शब्दशारदेचे बोल रे”. तुमचा हा अमूल्य ठेवा मराठी भाषिक प्राणपणाने जपतील यात शंकाच नाही.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे.
मुख्य सहसंपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’



