तंत्रयुगीन प्रेम
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे
तंत्रयुगीन प्रेम
आज-काल इंस्टाग्राम, व्हाट्सअप,फेसबुक, ट्वीटर या आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये अनेक नव्याने ओळखी होत आहेत. अनेक समूह असतात या समूहातून एखादा एखादीला ‘तू छान दिसते’ असा पर्सनल मेसेज पाठवला जातो. मग तो मेसेज जर एखादीला आवडला तर तिथून पुढे बोलणे सुरू होते. मग पुढे जेवली का?काय जेवलीस? आज काय विशेष केलं. आज दिवसभर काय केलं? अशा प्रकारचे सिम्पल प्रश्न चालू होतात. या प्रत्येक प्रश्नाला जर आपण उत्तर देत गेलो तर आपण फसलो म्हणून समजायचे.
समोरच्या माणसाला आपण उत्तरे का द्यावीत? तो कोण आहे? हे प्रथम आपल्याला कळत नाही. मग त्यातून सुरुवात होते एकतर्फी प्रेमाला. समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नांना उत्तरं केलं की त्याला असं वाटते की हिला पण आपल्याशी बोलण्याची इच्छा आहे. कदाचित समोरची स्त्री अथवा मुलगी त्या माणसाशी बोलताना आदरपूर्वक सुद्धा बोलत असते विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असते. पण समोरचा व्यक्ती त्याला आपल्यावर तिचे प्रेम आहे असे समजू लागतो.
मग तुझा एक फोटो पाठव, लाईव्ह फोटो पाठव, ड्रेस मधला, साडी मधला असे वेगवेगळे फोटो पाठव असे बिनधास्तपणे समोरचा व्यक्ती बोलायला लागतो. त्यावेळी त्या स्त्रीने किंवा मुलींने समजून जावं की हा माणूस चांगला नाही. याच्या प्रश्नांना उत्तर देऊ नयेत.याच्या मनात वेगळेच काही चालू आहे. त्यांनी फोटो पाठवायला सांगितले फोटो पाठवू नयेत. हल्ली आपले फोटो सोशल मीडियावर कुठेही व्हायरल होतात. सोशल मीडिया जितका चांगला तितकाच वाईट आहे. सोशल मीडियातून आपण सामाजिक कार्यातून आपली छाप पाडावी. आपल्या कार्यातून आपण किती फेमस आहोत हे कळलं पाहिजे. तर सोशल मीडिया खरंच छान आहे.
पण ह्या सोशल मीडियातून आपल्याला जे नको ते आपल्या बरोबर घडत असेल तर आपण कुठेतरी थांबावं हे प्रत्येकीला समजलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याशी कोण कसा हसी मजाक करतो हे आपल्याला कळतं. आपल्याला कोण नावे ठेवतो हे ही आपल्याला कळतं. आणि नाव का ठेवतात हे सुद्धा आपल्याला कळतं. कोणामुळे असं होतंय हे सुद्धा आपल्याला समजतं. तर माझं एक वैयक्तिक मत अस आहे की आपण पुढच्या माणसाला जर का काही बोलण्याची संधी दिली तर तो 100% त्या संधीचा फायदा घेतो आणि बाईचं चरित्र जे उत्तम आहे ते चारित्रहीन व्हायला वेळ लागत नाही. समाजातलं स्टेटस दोन क्षणात नाहीसं होतं. हा पण सर्वच माणसं चांगली नसतात असे नाही. काही बोटांवर मोजण्या इतकी माणस आहेत की खरच आपण त्यांच्याशी चांगलं वागतो, चांगलं बोलतो, त्यांच्याशी संपर्क वाढवून आपण कार्यामध्ये त्या माणसांचा उपयोग करून घेऊ शकतो. एकमेकांच्या साथीने आपण पुढचा टप्पा गाठू शकतो. पण त्यासाठी योग्य व्यक्ती कोण हे आपल्याला समजलं पाहिजे.
एकतर नाव कमवायला खूप कष्ट लागलेलं असतं, पण कष्टाने कमवलेल्या या नावाला जर का चारित्र्यहिनतेची झालर लागली तर अक्षरशः दोन मिनिटात आपली स्वच्छ प्रतिमा खाली यायला अवधी लागत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की समोरची व्यक्ती जरी साथ देत नसेल मेसेजला किंवा कोणत्याही प्रश्नांना तरीसुद्धा दुसरी व्यक्ती जी आहे ज्याला मेसेज करते ती व्यक्ती मात्र एकतर्फी त्या बाई वर अथवा मुलीवर प्रेम करत असते असे बऱ्याच अंशी निदर्शनास येत असते. आणि मग एकतर्फी प्रेम असेल तर मात्र मग अनेक चुका त्या व्यक्तीच्या हातून आपोआप घडत राहतात. उदा- जिच्यावर तो प्रेम करत आहे तिचे प्रेम नाही हे माहीत असूनही तो आपल्या मित्रांबरोबर तिच्या बद्दल बोलतो. मनातल्या मनात शब्दांचा आनंद घेत चाखतो.
एकतर्फी प्रेमातून कदाचित आत्महत्या सुद्धा केली जावू शकते. किंवा त्या व्यक्तीला सुद्धा त्रास दिला जातो.खून सुद्धा केला जावू शकतो. या शक्यता सांगता येत नाहीत. अशी सोशल मीडियावरील अनेक उदाहरणे आपण समाजात पाहिलेली आहेत ऐकलेली आहेत दूरदर्शनवर पाहिलेली आहेत. तर हे मानवा आपल्याला संधी आणि जीवन एकदाच मिळालेला आहे. जीवनात आलेली संधी परत येत नाही. त्या संधीचे सोनं करावे. निस्वार्थ प्रेम करावे, प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. मनात कोणतीही आशा बाळगू नये. निर्मळ मनाने मैत्री करावी. त्या मैत्रीला समाजात मान्यता असते. संकट समयी त्याबरोबर राहून संकट सोडवण्याचा प्रयत्न करावा. जगासमोर आपले मैत्री अर्थपूर्ण आहे निस्वार्थ आहे हे दाखवता यायला पाहिजे. त्याला कुठेही लाज नको.” कर नाही त्याला डर कशाला? “
असे म्हणून आलेल्या संधीचा योग्य वापर करून निस्वार्थ मैत्री करून जीवन जगावे इतकेच मला म्हणायचे आहे आणि सोशल मीडियाचा वापर करताना योग्य तो करावा एकतर्फी प्रेमासाठी करू नये किंवा नुसताच प्रेमासाठी सुद्धा करू नये जो करायचा आहे तो निस्वार्थ मैत्रीसाठी करावा आणि खात्री करून मगच मैत्री करावी हे मात्र शंभर टक्के खरे आहे समोरचा माणूस कोण आहे बोलण्यातनं तो गोड बोलतोय पण समोर आल्यानंतर तो कसा आहे आपल्याला सर्व समजलं पाहिजे तरच मैत्रीचा हात पुढे करावा.
आता तंत्र युगामध्ये माणसं हाताळायला शिकावीत. ओळखायला शिकावीत. निस्वार्थ मैत्रीचे मोल जाणावे. मगच मैत्रीचा हात पुढे द्यावा आणि मागावा देखील. आपली काळजी आपणच घ्यावी.कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. आणि जर आपण बळी पडलो तर, ती सर्वस्वी जबाबदारी आपली आहे दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही.
‘दिले एकदाच जीवन देवाने
याचा सदुपयोग छान करूया,
कशालाही बळी न पडता
जगाला प्रेम अर्पूया…..’!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे



