“सुखाच्या वाटा शोधण्या अंतरी हवा प्रेम, आपुलकीचा नकाशा….!”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
“सुखाच्या वाटा शोधण्या अंतरी हवा प्रेम, आपुलकीचा नकाशा….!”; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
दुःखाचा गाव सोडून जायचे मला दूर दूर… सुखाच्या वाटा शोधण्या उडायचे मज भुर्र भुर्र…याल का माझ्या सोबतीला तुम्ही…जिथे नांदते सौख्य न्यारे …मौजमजेच्या गावात विसरू या दुःख सारे… आणि याच आशेने आपले मानवी जीवन पुढे पुढे चालले आहे…!
खरे तर आपल्या जन्माची सुरुवातच होते रडण्यातून…न रडलो तर दाई माई डॉक्टर तळपायावर, कमरेच्या खालील भागावर हलके थोपटून बाळाला रडविण्याचा प्रयत्न करतात, कारण रडल्याशिवाय मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही. ज्यामुळे बाळाला गंभीर आजार होऊ शकतो किंवा जीव पण धोक्यात येऊ शकतो असे वैद्यकीय भाषेत सांगितले जाते. अर्थातच रडणे म्हणजे दुःखच नव्हे तर कधी कधी नवजीवनही ठरते. तरीपण माणूस नेहमी दुःखाऐवजी सुखाच्या वाटा शोधत असतो. त्या इप्सितापर्यंत जाण्यासाठी तो नानाविध उपाययोजना करतो.
या सुखाच्या वाटा कुणी शोधतो पैशाअडक्यामध्ये, कुणी सोने-चांदी, बंगला, गाडी, नोकर-चाकर यांसारख्या सुखासिनतेमध्ये. पण खरंच असतो का आपण समाधानी… आणि सापडतो आपल्याला सुखाचा गाव त्या वाटांनी…? माझ्या मते तरी नाही… मला वाटते सुखाच्या वाटा शोधायच्या असतील तर अंतरी नक्कीच प्रेम, आपुलकीचा नकाशा हवा. मग बघा कशा पटापट सापडतील सुखाच्या वाटा.
या नकाशातील सूचीमध्ये असावी आपली नातीगोती, आपली मित्रमंडळी, आपल्या अवतीभवतीची प्राणीमात्र, निसर्गातील झाडे-वेली, आकाशातील सूर्य चंद्र तारे आणि घट्ट पाय रोवून जिच्यावर आपण उभे राहतो ती जमीन, धरती, धरित्री…या नकाशात आपण म्हणू ती पूर्व दिशा नसावी तर सर्व दिशांना अधोरेखित करणारी समंजस उत्तर दिशा असावी. प्रमाणबद्धता असावी शिस्तीची पण कधीतरी मोकळीकही असावी मस्तीची…मग बघा सुखाच्या वाटा शोधण्या कसली येईल अडचण…खात्री आहे या लेखणीला आनंदलहरीच दाखवेल मनःदर्पण….खरंय ना….?
मराठीचे शिलेदार समूहात शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुलदादा पाटील यांनी ‘सुखाच्या वाटा’, विषय दिला. मन शोधू लागले सुखाच्या वाटा कुठे आणि कशा मिळतील ? पण प्रकृतीच्या कुरबुरीने आठ दिवसांच्या रजेनंतर आज शाळेत रूजू झाले आणि या प्रश्नाचे उत्तर सापडले. आठवड्यानंतर मला बघून छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी माझ्याभोवती गराडा घातला. शाळेत न येण्याबद्दल प्रश्नांचा भडीमार केला. कशामुळे हे सर्व घडत होते…तर मीही माझ्याजवळ मोडकातोडका का असेना प्रेम आपुलकीचा नकाशा मनात ठेवत असावी…म्हणूनच ह्या सुखाच्या वाटा मला आज गवसल्यात…!
मला वाटते तुम्हाला पण त्या गवसल्या कारण वसुधाताई नाईकांनी कुटुंबात सुखाच्या वाटा शोधल्यात, सुनिताताई पाटील यांनी सिंधूताई सपकाळांच्या मायेत सुखाच्या वाट शोधली, बळवंतदादा डावकरेंनी ऐहिक सुखाच्या पळवाटा सोडण्याची साद घातली तर काहींनी सुखाच्या वाटा शोधताना येणाऱ्या अनंत अडचणींवर मात करण्याची हिंमत शब्दांतून अधोरेखित केली. बाकी सर्वच शिलेदारांनी आपल्या लेखणीतून विषयाला यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



